अंक सूचित करताना : एक संकलन

शब्दांनी अंक सूचित करण्याची पध्दती लोकप्रिय झाल्यावर शब्दांचा संक्षेप करण्याची पध्दती अस्तित्वात आली. शब्दांच्या जागी अक्षरे आली. पाचव्या शतकामध्ये पहिल्या आर्यभटाने आपल्या आर्यसिद्धांत या ग्रंथात अंकांसाठी उपयोगात आणलेल्या अक्षरांचे कोष्टक उपलब्ध आहे. या अंकलेखनाच्या पध्दतीत स्वरांमध्ये हस्व दीर्घ भेद नाहीत. व्यंजनांमध्ये जो स्वर असेल त्या ठिकाणी व्यंजनसूचक अंकाला स्वरसुचक अंकाने गुणावे. व्यंजनाला जोडलेला स्वर व्यंजनाच्या संस्थेची आपल्या संखेइतकी पट दर्शवित असून संयुक्त व्यंजनांतील स्वर त्याच्या अवयवीभूत प्रत्येक व्यंजनाबरोबर घ्यायचा असतो. दुसऱ्या आर्यभटाने ११ व्या शतकात आपल्या ग्रंथामध्ये अंकांचे व दर्शक अक्षरांचे कोष्टक दिलेले आहे. त्या पद्धतीला कटपयादि क्रम असे संबोधतात. यांत स्वरांना कोणताच अर्थ नाही. यांतील संख्यालेखनपध्दती “अंकानां वामतो गति” या सर्व साधारण नियमाच्या उलट आहे. या पद्धतीप्रमाणे एकमचे अक्षर सर्वांत शेवटी, दहमचे अक्षर त्याच्या पूर्वी, शतमचे अक्षर दहमच्याही आधी असा क्रम पाळलेला आहे. राजवाडे यांच्या मते, संस्कृतात तीन वचने व त्यांचे प्रत्यय दिसतात, ते त्या कोणत्या तरी काळी आपल्या पूर्वजांना केवळ तीनच आकडे मोजता येत होते, अशा अवस्थेची स्मारके आहेत. माणसाच्या बोटांना प्रत्येकी तीन पेरे आहेत, यावरून तिनांच्या गटांनी हिशेब करण्याची त्रिमान पध्दती सुचली असावी. अंगठा सोडून चार बोटांवर हिशेब करणाऱ्यांनी चतुर्मानपध्दती बसविली. चार बोटे व प्रत्येकाची तीन पेरे या सर्वांचा उपयोग करून द्वादशमान पध्दती उदयास आली. एका हाताच्या सर्व बोटांचा उपयोग करणाऱ्याना पंचमानपध्दती व दोन्ही हातांच्या बोटांना एकदम उपयोग दशमानपध्दती सुचली असावी. अशाप्रकारे हिशोब करण्याच्या कामी हातांच्या बोटांचा उपयोग करण्याची वहिवाट सर्व देशांत पुरातन काळापासून चालत आलेली आहे. भारतीय संस्कृतीकोश खंड १ संदर्भाप्रमाणे संस्कृतात ज्योतिष व गणित या शास्त्रावरचे ग्रंथ छंदोबद्ध असल्यामुळे त्या ग्रंथांतल्या मोठमोठ्या संख्या श्लोकात ग्रथित करण्यासाठी ही शब्दांकांची पध्दती बरीच विकास पावली. या सर्व ग्रंथकार आचार्यांनी अंकांना स्थानीय किंमत देऊन शून्य व नऊ अंक अशा दहा चिन्हांवर बसविलेली संख्या लेखनपध्दतीच वापरली. त्यांच्या संख्यांमध्ये एकमचा आकडा प्रथम देऊन नंतर दहम, शतम इत्यादी आकडे यथानूक्रम सांकेतिक शब्दांनी दिलेले असतात. उदाहरण आकाश पंच वसु पक्ष यात आकाश पंच वसु पक्ष हे शब्द अनुक्रमे शून्य, पाच, आठ, दोन या अंकांचे सूचक असून ती संख्या आकड्यांनी २८५० अशी येते. निरनिराळ्या अंकांसाठी रूढ असलेले शब्द उदाहरण : ५ यास बाण, शर, पांडव, महाभूत, तत्व, इंद्रिय, रत्न, भूत, पर्व, प्राण, अर्थ इत्यादी. ६ यास रस, अंग, काय, ऋतू, दर्शन, तर्क, रिपू इत्यादी. ७ यास पर्वतवाचक शब्द गिरी, वार, स्वर, धातू, अश्व, तुरग, नग, ऋषी, छंद. ८ यास वसु, अहि, नाग, अनुष्टभ, गुण, गज, सिद्धी, भूती, मंगल इत्यादी. ९ यास अंक, नंद, द्वार, निधी, ग्रह, गो, पवन इत्यादी. १० यास दिश, दिशा, अंगुली, अवतार इत्यादी. ११ यास रुद्र, ईश्वर, भर्ग इत्यादी. १२ यास आदित्य वगैरे सूर्याची नावे, मास, राशी, युग, रवी, व्यय इत्यादी. १३ यास विश्वेदेवा, काम, अतिजगती, अघोष इत्यादी. १४ यास मनु, विद्या, इंद्र, लोक इत्यादी. १५ यास तिथी, पक्ष, घस्त्र इत्यादी. १६ यास नृप, कला, अष्टी. १७ यास अत्य अत्यष्टी इत्यादी. १८ यास धृति. १९ यास अतिधृति. २० यास नख, कृति इत्यादी. २१ उत्कृती, प्रकृती, स्वर्ग इत्यादी. २२ यास कृति, जाती इत्यादी. २३ यास विकृती. २४ यास गायत्री, जिन, अर्हत, सिद्ध इत्यादी. २५ यास तत्व. २७ यास नक्षत्र, भसमूह, उडू, भ इत्यादी. ३२ यास दंत, रद इत्यादी. ३३ यास देव, त्रिदश इत्यादी. ४० यास नरक. ४८ यास जगती. ४९ यास तान इत्यादी. अशा तर्हेने अंक सूचित करण्याची पध्दती शतपथ आणि तैतिरिय ब्राम्हणांमध्ये दिसून येते. इत्यादी क्रमशः संकलन लेखनसीमा : संदर्भ मराठी विश्वकोश खंड १ व भारतीय संस्कृती कोश खंड १.

श्री श्रीदत्त राऊत किल्ले वसई मोहीम परिवार : ९७६४३१६६७८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!