अदृश्य शक्तींनी पोखरला वालीवचा डोंगर !

वसई (वार्ताहर) : दिवसरात्र काम करून पाच दिवसांत वालीवचा डोंगर पोखरणार्‍या भुमाफियांची नावेही महसुल विभागाला निष्पन्न न करता आल्यामुळे अदृश्य शक्तींनी डोंगर पोखरला की काय ? असा संताप ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. वालीव येथील सर्वे क्र.२६ मधील शासकिय गुरचरण जागेत दगडखाणीचा डोंगर होता. तो गेल्या आठवड्यात जेसीबी, पोकलॅन अशा अत्याधुनिक यंत्रांच्या सहाय्याने दिवसरात्र काम करून पाच दिवसांत पोखरण्यात आला. पोखरलेल्या जागेत भलामोठा रस्ता तयार करण्यात येवून,त्यावर डांबरीकरण करण्याचा घाटही भुमाफियांनी केला होता. या पोखरलेल्या डोंगरातील दगड, माती चोरून नेण्यात आली होती.पाच दिवस डोळ्यादेखत आपला डोंगर पोखरला जात असतानाही महसुल विभागाने डोळे घट्ट बंद करून ठेवले होते.येथील तलाठी आणि मंडळ अधिकारी या पाच दिवसांत गायब झाले होते.मात्र, येथील राजा मोहिते या जागरुक नागरिकाने याप्रकरणी महसुल विभागाला जाग आणण्याचा प्रयत्न केला.वर्तमान पत्रातून वालीवचा डोंगर पोखरल्याची बातमी झळकल्यावर महसुल विभागाने कारवाईचा आव आणत,डोंगर पोखरण्याचे काम जागेवर जाऊन थांबवल्याचा गवगवा केला. गुरुवारी जागेवर जावून तलाठी आणि मंडळ अधिकार्‍याने पंचनामा केला. तयार झालेल्या रस्त्यावर मोठे दगड टाकून तो बंद केला. हा पंचनामा तहसिलदारांकडे त्याच रात्री सुर्पुद करण्यात आला.तसा दुजोराही तहसिलदार उज्वला भगत यांनी देवून डोंगर पोखरणार्‍यांवर कारवाईचे संकेत दिले होते.मात्र,त्यानंतर कोणतीच हालचाल झाली नाही.डोंगर फोडून सर्वे क्र.५१ मधील धानीव औद्योगिक वसाहतीकडे जाण्याचा मार्ग तयार करण्यात आला होता. तरिही डोंगर पोखरणार्‍यांची नावे निष्पन्न झाली नाहीत असे महसुल विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे अदृश्य शक्तींनी डोंगर पोखरला का ? अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. डोंगर पोखरण्यासाठी जेसीबी, पोकलॅन, डम्पर अशा वाहनांचा वापर करण्यात आला होता. या वाहनांचा शोध घेतल्यावर पोखरणार्‍यांची नावे सहज उघड होतील.त्यासाठी महसुल विभागाने पोलीसांत गुन्हा दाखल करणे आवश्यक होते.मात्र, गेल्या चार दिवसांत अहवाल साधी तक्रारही दाखल करण्यात आली नाही. शासनाचा डोंगर पोखरण्यात येवून कोट्यावधी रुपयांची दगड-माती चोरण्यात आली. तरिही या कारस्थानाकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

जागेवर जाऊन रस्ता बंद करण्यात आला,तसा पंचनामा तहसिलदरांना सादर केला आहे.डोंगर पोखरणार्‍यांची नावे स्थानिकांनाविचारली पण कोणी सांगण्यास तयार नाहीत – रिना दळवी (तलाठी-वालीव)


आजुबाजुला चौकशी केली तरी डोंगर पोखरणार्‍याची नावे सहज निष्पन्न होतील.मात्र,महसुल अधिकार्‍यांना नैर्सगिक संपत्तीऐवजी हितसंबध महत्वाचे वाटत आहेत. – राजा मोहिते (तक्रारदार)


तलाठी आणि सर्कल यांचा अहवाल आला आहे.तो पाहून पुढील कारवाई करण्यात येईल – उज्वला भगत (तहसिलदार-वसई)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!