अनधिकृत जाधव मार्केटच्या मालकावर कारवाई करण्याची मागणी

वसई (वार्ताहर) : आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या अनधिकृत जाधव मार्केटच्या मालकावर कारवाई करण्यासाठी उपोषण करण्याचा इशारा भारतीय युवा काँग्रेसने दिला आहे.

२ तारखेला पहाटे नालासोपारा पुर्वेकडील जाधव मार्केटला आग लागली होती.रेल्वेस्थानकाला लागून असलेल्या या मार्केटमध्ये एकूण ३३ गाळे आहेत.दुतर्फा असलेल्या या गाळयांच्या मध्ये असलेल्या चिंचोळया बोळातून लाखो प्रवासी दररोज रेल्वे स्थानकात ये-जा करीत असतात.तसेच या मार्केटला लागूनच तीन रहिवासी इमारती आणि समरफिल्ड शाळा आहे.कोणतीही परवानगी न घेता हे मार्केट अनधिकृतपणे सुरु आहे.त्यात चहाच्या टपरीपासून चायनीज जेवणापर्यंत सर्व खाद्य पदार्थांच्या टपऱ्या आहेत.या टपऱ्यांमध्ये घरगुती सिलेंडरचा अनधिकृतपणे वापर केला जातो.तसेच मार्केटमध्ये लाखो प्रवाशांची वर्दळ असतानाही सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाही.

अशातच या मार्केटला दुसऱ्यांदा आग लागली.त्यात १०दुकाने जळून खाक झाली.सुदैवाने शाळेला सुट्टी होती.तसेच वर्दळीच्या वेळी आग लागली नाही.त्यामुळे कोणतीही जीवीतहानी झाली नाही.हे मार्केट बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक अरुण जाधव आणि त्यांचे सहकारी अनधिकृतपणे चालवत आहेत.त्यामुळे आगीच्या दुर्घटनेची जबाबदारी जाधव यांच्यावर निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि महापालिकेच्या वतीने तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा.अशी मागणी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संजय मीणा यांनी आयुक्त बी.जी.पवार यांच्याकडे केली आहे.जाधव यांच्यावर कारवाई न केल्यास उपोषण करण्याचा इशाराही मीणा यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!