अनाहत साद.. – मृण्मयी नारद

अलगद साद घालतय कोणी , कोणाची तरी कानापर्यंत पोचतेय ,  मी कोणाला तरी साद घालत आहे, माझ्या आठवणीतून गजबजलेल्या या सभोवतालाच्या वातावरणात, हळुवार शिळ घालतय कोणी . पक्षांचा  किलबिलाट, कावळ्याचा कर्कश्य आवाज , कोवळ्या उन्हात मारलेली  चिऊताईची  चिवचिव, शांत प्रसन्न सकाळ अन येणारी तुझी आठवण, माझ्या दिवसाचा रंग ठरवते. 
खिडकी बाहेरून दिसणारा सोनेरी केशरी उन्हाचा कवडसा आत येताना हलकेच शुभ्र पांढरा होऊन येतो, दिवसाची सुरुवात जबाबदारी ची जाणीव करून देतो.
 या चंद्र चांदण्यांभोवती घुटमळताना  आज सूर्याची आभा कधी अवतरली कळलंच नाही.
आजूबाजूचे आवाज आज अजूनही थंड पडलेले वाटताहेत, वातावरण थंड नसलं तरी रखरखतं झालं नाहीये. हवेत शीतलता  आलेली जाणवतंय आणि अशा वेळी अंगणातल्या या चिमण्या चिवचिवाट करत बागडत आहेत, फुललेल्या पारिजातकाने रांगोळी घातली आहे. नुसत्या त्या कळ्या फुलल्याच नाहीत तर आपल्या मंद सुगंधाने मन प्रफुल्लित करताहेत. फुलल्यात तरी कशा? एक दोन नाही..तर एकदम भरभरुन… पटकन आकाशगंगेची आठवण व्हावी अशा..सुख आहे केवळ सुख…
वहात असतं एक काव्य प्रत्येक शांततेत आणि मग रंग बदलतो कधीतरी अर्थांसकट प्रत्येक शब्दाचाच, जमेल तसा .  प्रत्येकाच्या सोयीनुसार. कधी दाटून येतात मग डोळ्यात ढग आणि करतात मग जलप्रपात अखंड .तर कधी समजूतदारपणे अलगद घेतो  आपणच आपल्याला कुशीत, अन करत राहतो तापल्या मनावर थंड शिडकावा समजूतदारपणाचा. पण हे प्रत्येक वेळी जमतच अस नाही .
समजून घेणं जमायलाही मन स्थिर असतच असं नाही. निःशब्द शब्दांना प्रत्येक वेळेस, समजत नाहीत भावना अन मग उरफोड जीवाची होते उगीच. लावतो आपण त्यांचे अर्थ आपापल्या सोयीनुसार. होताना दिसतात मग अर्थाचे अनर्थ वारंवार. शून्यातूनही  नाद होतो  नकोस वाटणारा मग निर्माण.
तसा प्रयत्न करतो मनाशीच आपण आपल्या स्वतःला सावरण्याचा आणि  विनाकारण होते घुसमट अर्थ समजावून घेताना हलकेच आणि नकळतपणे . मग उतरतात कधी गूढ शब्द दडलेल्या अर्थासकट मनाच्या आत कधीतरी , कुठेतरी …  अलगद पणे, अनाहत, सावध…
© मृण्मयी…

मृण्मयी नारद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!