अनेक व्हीलन असलेले राणेंचं आत्मचरित्र – जयंत करंजवकर

महाराष्ट्रात लोकसभेची रंगतसंगत धूळ खाली पडली असताना माजी मुख्यमंत्री आणि आताचे भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध होण्यापूर्वीच चर्चेत आले आहे. एका इंग्रजी लेखिकेने  इंग्रजीत त्यांचं आत्मचरित्र लिहिले आहे. त्या आत्मचरित्रात काय दडलंय ? हा गोंधळात टाकणारा प्रश्न मराठी मनात घोळतोय…  मराठी माणसावर अन्याय होतोय म्हणून ते शिवसेनेत गेले, मात्र त्यांनी स्वतःचं आत्मचरित्र प्रसिद्ध प्रसिद्ध करत आहेत तेही इंग्रजीत ? त्यामुळे राणेंची खास मराठी रांगडी भाषा, त्याला कोकणी फोडणीचा वास त्या आत्मचरित्रात नसणार…  मराठी बाणाची ही व्यथा राणेंना कळतेय पण ते त्याची मराठी आवृत्तीही प्रसिद्ध करत आहेत. पंचतारांकित हॉटेलात जेवायला गेलो आणि मालवणी कालवण नसेल तर खाणा-याची कशी बोळवण होते तशी अवस्था वाचकांची असते, असो.
   वृत्तपत्रात आत्मचरित्रातील काही उतारे प्रसिद्ध होत आहेत, तोच वाचकांना तात्पुरता उतारा मिळाला आहे. नाहीतर राणे समर्थक व अधिकपटीने विरोधकांच्या अंगात देव किंवा देवी घुमल्या असत्या आणि राणेंसमोर देवांचा धुडगूस दिसला असता,  मीना वहिनींची धावपळ बघण्यासारखी झाली असती. गमतीचा भाग सोडून द्या, पण नारायण राणेंचा भाव आणि प्रभाव तसा आहे. त्यांनी एका चॅनेलवर आत्मचरित्रातील काही त्यातील भाग सांगून वाचकांची उत्सुकता वाढवली आहे. त्याला प्रोमो म्हणा वाटल्यास… महत्वाच्या मुद्द्याला हात न लावता आत्मचरित्रावर उड्या कशा पडतील याची त्यांनी काळजी घेतली आहे, या मुलाखतीत. ऑक्टोबरमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीकडे पाहूनच त्यांनी ही खबरदारी घेतली असावी. या आत्मचरित्रातील एका प्रसंगाचा वृत्तपत्रात गौप्यस्फोट प्रसिद्ध झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्यामुळे नारायण राणेंनी शिवसेना सोडली अशी बातमी प्रसिद्ध करून महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे.  मात्र राणे यांनी चॅनेल्सही बोलताना अतिशय आपली वेदना स्पष्ट करताना पुस्तकात काय लिहिले आहे हे सांगितले आहे…  ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांच्यात वाद नको तसेच मोठ्या साहेबांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून मी शिवसेना सोडली’, असे स्पष्टीकरण देऊन त्यांनी वृत्तपत्रातील गौप्यस्फोटाची पोलखोल केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे माझे गुरू, मला शिवसेनेत राहणे कठीण झाले असून सेना मी सोडतो… असे बाळासाहेबांना सांगून मी शिवसेना सोडली, असे बाळासाहेबांना सांगून नारायण राणे यांनी आपली बाजू मांडली होती. यातून त्यांची बाळासाहेब आणि शिवसेना यांच्यातलं नाते कसे होते हे त्यांनी सांगितले. राणे शिवसेनेत असतील तर मी व रश्मी मातोश्री सोडून जातो हा आत्मचरित्रातला प्रसंग प्रसिध्द झाला.  पण त्यावेळी रश्मी मॅडम नव्हत्या हे त्यांनी सांगून रश्मी वहिनीची या वादातून सुटका झाली. नाहीतर  रश्मी वाहिनीचं शिवसेनेत सत्ताधीश असल्याची चर्चा आहे, त्याला दुजोरा मिळाला असता…  परंतु राणेंनी तसं केले नाही, त्यांनी मनमुराद सत्ता भोगली पण सत्याला बेरंग करण्याचं महापाप टाळले आहे, त्यामुळे हे पुस्तक जेव्हा हातात येईल तेव्हा खरी वस्तुस्थिती बाहेर येईल. शिवसेना सोडणार असे बाळासाहेबांना सांगून त्यांनी मातोश्री सोडली, दुस-या दिवशी राणेंना बाळासाहेबांचा फोन आला ‘राग शांत झाला का? ‘ फोन वरून बाळासाहेबांनी विचारले आणि बाळासाहेबांचं त्यांच्याशी  पिता पुत्राचं नातं होतं, हे आत्मचरित्रातून उलगडलं. शिवसेना सोडलीस तर मी शिवसेना बरखास्त करीन, असे बाळासाहेबांनी राणेंना सांगितलं होतं, पण राणेंनी ते ऐकले नाही. बाळासाहेबांचा त्यांच्यावरचे प्रेम, पण प्रेम बोलण्यापेक्षा जीव होता हे लक्षात येतं. परंतु प्रश्न पडतो तो माँसाहेब असत्या तर या वादावर पडदा पडला असता, असा शिवसैनिकांच्या मनात हे पुस्तक वाचताना विचार येईल. कारण नारायण राणे हे माँ साहेबांचा अतिशय लाडके होते. उद्धव व राणेंतील वाद त्यांनी मिटविला असता. असा हा प्रसंग वाचतांना अनेकांना हा प्रश्न भेडसावणारा आहे.
   नारायण राणेंना शिवसेनेने नगरसेवक, बेस्ट समितीचे अध्यक्ष पद, आमदार,  विरोधी पक्ष नेता, मंत्री आणि मुख्यमंत्री इथपर्यंत बाळासाहेबांनी त्यांना पदे दिलीत. तरीही शिवसेना सोडली म्हणून शिवसैनिकांनी त्यांच्यावर कायमचा राग मनात ठेवला. स्वतः काही न मागता शिवसेनेने भरभरून दिले तरी ते सेनेला मुळासकट उखडून टाकण्याचा प्रतिज्ञा करत होते. परंतु त्यांच्या प्रोमो मुलाखतीत ते विरोधी पक्षात असतांना त्यांना त्यांच्या सरकारी बंगल्यावर त्यावेळी सेनेत असलेले राज ठाकरे नारायण राणे यांना भेटण्यास गेले आणि आपण दोघांनी नवीन पक्ष काढून शिवसेनेला शह देण्यासंदर्भात प्रदीर्घ चर्चा कर्ली होती. हा आत्मचरित्रातला प्रसंग फार महत्वाचा तितकाच शिवसैनिकांना विचार करायला लावणारा आहे. शिवसैनिक राणेंकडे खलनायक म्हणून बघत होते, पण खरा खलनायकाच्या भूमिकेत राज ठाकरे होते, हे शिवसैनिकांच्या मनात रुजविण्यात राणे यशस्वी ठरतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंगाखांद्यावर खेळलेले, राजकीय धडे आणि काकांच्या जीवावर स्वतःची प्रतिमा तयार करून काकाचंच सिंहासन उखाडण्याचं पाप ते करत होते, हे दोघांच्या संवादातून स्पष्ट होत आहे. याचा उल्लेख नारायण राणे यांनी आत्मचरित्रात केला असेल तर राजकारणाला एक वेगळे वळण लागेल. लोकसभा निवडणुकीत  भाजपाबरोबर शिवसेनेच्या विरोधात राज ठाकरे यांनी प्रचार केला होता. तो विरोधी प्रचार सेनेला संपविण्यासाठीच. आता लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्याशी राज ठाकरे यांनी करार केला, विधानसभा निवडणुकीतही शिवसेने विरोधात राजकारण ते करतील आणि  कोणी सुज्ञ ते नाकारू शकत नाही. राणेंनी बाळासाहेबांना सागून सेेेना सोडली, पण राज ठाकरे  यांनी तसं केले नाही.
   शिवसेनेवर टीका करताना नारायण राणे यांनी कॉंग्रेसलाही टार्गेट केले आहे. काँग्रेस पक्ष श्रेष्ठीनी सहा महिन्यात मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले होते. १२ वर्षात आश्वासनाची बोळवण केली. भाजपात जायाचा विचार केला पण तिथेही आडकाठी आली, परंतु प्रोमो मुलाखतीत कोण आडवे आले हे सांगण्याचे त्यांनी कटाक्षाने टाळले. सगळं गुपित सांगितलं तर लोक माझं आत्मचरित्र वाचणार नाहीत, असे ते म्हणाले. मात्र माझ्या आत्मचरित्रात खलनायक अनेक असतील असे संकेत देऊन पुस्तकाची त्यांनी उत्सुकता वाढवली.  माजी खासदार निलेश राणे आणि नितेश राणे हे राजकारणात आहेत पण माझी नातवंडे राजकारणात नसतील. ते त्यांच्या व्यवसायात दिसतील, तसा आम्ही सर्वांनी निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. हा टोला शरद पवारांना लागू पडतो,
   नवीन पिढीला मी मेहनत व अभ्यास करून कशी पदे मिळवली. पदावर काम करतांना लोकांची कशी सेवा करत होतो. राजकारणातील चढउताराला कसा एकटा सामोरे गेलो याची माहिती आत्मचरित्रात असणार आहे. विधानसभेत स्वपक्षातील आमदार आवाज करू लागले तर नारायण राणे यांनी त्यांच्या कडे नजर फिरवतात पिन ड्रॉप शांतता सभागृहात दिसायची. परंतु वडिलांसमोर काही न बोलता घाबरणारे नारायण राणे या पुस्तकात दिसणार आहेत. तरुणांना मार्गदर्शन व्हावे म्हणून आत्मचरित्र लिहिले असल्याचे राणे सांगतात, परंतु आजचा तरुण व्यवहारी आहे. तुम्ही राजकारणात काय काय कोलांट्या मारल्या  हा करमणुकीचा भाग असेल. पण राणेंना त्यांच्या मुलांकरिता व्यवसाय उभारण्यासाठी काय करावे आणि कशी मेहनत करावी लागली, याची तरुणांना सविस्तर माहिती त्यात मिळाली तर निदान कोकणातील तरुणांना या आत्मचरित्राचा लाभ होईल. बघू या, पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर कळेल. तसा उल्लेख झाला तर राणे यांना आजची तरुण पिढी डोक्यावर घेईल.

जयंत करंजवकर (ज्येष्ठ पत्रकार)
(jayant.s.karanjavkar@gmail.com/8369696639).                     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!