अमृततुल्य दादासाहेब शिंदे ! – योगेश वसंत त्रिवेदी

    अशोक महादेव शिंदे उर्फ दादासाहेब शिंदे ! एक अफलातून अमृततुल्य व्यक्तीमत्व !! महाराष्ट्राच्या वृत्तपत्रसृष्टीला मिळालेली ही एक `अमृताहुनी गोड’ अशी देणगी. वृत्तपत्रांत विविध व्यक्तींची भूमिका असते. काही व्यक्ती या संस्थांमधून (त्याच) जबाबदाऱ्या सांभाळत असतात तर काही संस्थेत नसलेले मान्यवर या वृत्तपत्रांना `सोन्याचा साज’ चढवीत असतात. स्तंभलेखक असतात तसेच पत्रलेखकही असतात. या पत्रलेखकांची भूमिका वृत्तपत्रांसाठी महत्त्वाची असते. समाजाला दिशा देणाऱ्या वृत्तपत्रांतील अग्रलेख, व्यंगचित्रे याप्रमाणेच पत्रलेखकांचेही स्थान महत्त्वाचे असते. पत्रलेखकांच्या विविध पत्रांमधून निरनिराळ्या समस्या, अडचणी, प्रश्न यांना वाचा फुटणे, तद्वतच अनेक पत्रांमधून विविध योजनाही समोर येत असतात. समाजापासून सरकारला मार्गदर्शन अशा पत्रांमधून होत असते. असेच एक दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहेत, अशोक महादेव उर्फ दादासाहेब शिंदे ! आज हे दादासाहेब शिंदे हे वयाची ७५ वर्षे पूर्ण करुन ७६ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. लाघवी आणि अमृताहुनी गोड अशा स्वभावाचे दादासाहेब शिंदे यांच्यावर लिखाण करायचे असल्यास त्यांची कारकीर्द, कामगिरी एवढी प्रचंड मोठी आहे की त्याची लेखन सीमा एका लेखात सीमित ठेवता येणार नाही. वाङमय कोषाएवढे बरेच ग्रंथ लिहावे लागतील. पण छोट्याशा प्रस्तावनासम लेखात दादासाहेबांची ओळख करुन देण्याचा हा प्रयत्न आहे. दादासाहेबांची ओळख नाही, असा कोणी शोधून सापडणार नाही. समाजसेवेचे बाळकडू घेऊन जन्माला आलेल्या अशोक महादेव उर्फ दादासाहेब शिंदे यांच्यावर महात्मा जोतिबा फुले, राजर्षि शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा आहे. सामाजिक समस्यांचा उहापोह करुन त्यांची सोडवणूक करण्यासाठी वृत्तपत्रांतून पाठपुरावा करणे हे त्यांचे नियमित काम आहेच पण त्यांचा केवळ वृत्तपत्रांतून पत्रलेखन करुन जो पाठपुरावा असतो, तद्वतच त्यांचा प्रत्येक गोष्टींसाठी घोरपडीसारखी चिकाटी ठेवून पाठपुरावा असतो. त्यामुळे मी गंमतीने दादासाहेब शिंदे हे दादासाहेब शिंदे नाहीत तर ते दादासाहेब घोरपडे आहेत असेच म्हणत असतो. अर्थात ही माझी भावना त्यांच्या एका अभिष्टचिंतन सोहोळ्यात माझ्या छोटेखानी वक्तव्यात बोलूनही दाखविली होती ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांच्या साक्षीने.
    १९६२ या वर्षापासून अशोक महादेव उर्फ दादासाहेब शिंदे यांनी पत्रलेखनाला सुरुवात केली. या पत्रलेखनाला पंचावन्न वर्षे पूर्ण झाली असून या पत्रांची संख्या दहा हजारांवर गेली असल्यामुळे त्यांना मी पाच वर्षापूर्वीच ‘दस हजारी मनसबदार’ या शब्दांत त्याचं वर्णन केलं होतं. दादासाहेबांचे वडील महादेवराव आणि त्यांच्या मातोश्री नलिनीताई या दोघांची सुध्दा समाजात स्वतंत्र ओळख आहे. नलिनी ताई या महापालिका शाळेत शिक्षिका होत्या आणि त्यांना महापौर आदर्श शिक्षक पुरस्कार सुध्दा प्राप्त झाला आहे. त्यामुळे अशोक या मुलाच्या पर्यायाने दादासाहेब शिंदे यांच्यात समाजसेवेचे बाळकडू भिनले नसते तरच नवल. महादेवराव शिंदे यांच्या सर्वोत्कृष्ट समाजसेवेची दखल घेऊन माहिम मध्ये एका चौकाला त्यांचे नाव महापालिकेने दिले आहे. समाजसेवेचे बाळकडू घेतलेल्या अशोक महादेव शिंदे म्हणजेच दादासाहेब शिंदे यांच्या सर्वोत्तम सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांचा ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला आहे.
    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे रोज सकाळी वृत्तपत्रातील `वाचकांची पत्रे’ हे सदर नियमित वाचून पत्रलेखकांच्या पत्रांतून समोर येणाऱ्या समस्या, प्रश्न, भूमिका यांच्याकडे आवर्जुन लक्ष देत असत. अशाच चाणाक्ष नजरेतून बाळासाहेबांनी दादासाहेबांच्या पत्रांचीही आवर्जुन दखल घेतली असल्याचे दादासाहेबांनी अभिमानाने सांगितले.
    सामाजिक कार्याची परंपरा हे ‘असिधारा व्रत’ घेतलेल्या दादासाहेबांचा विविध पुरस्कार देऊन गौरव तर करण्यात आलेला आहेच. १९९६ साली एका अमेरिकन बायोग्राफिकल इन्स्टिट्युटने `मॅन ऑफ द इयर’ या पुरस्काराने दादासाहेबांचा गौरव केला आहे. `ज्येष्ठ नागरीक’ हा समाजातला एक उपेक्षित घटक. ज्येष्ठ नागरीकांसाठी सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. केंद्र सरकारने 60 वर्षाच्या व्यक्तीस ज्येष्ठ नागरीक म्हणून मान्यता दिली आहे पण महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय अजून `पाईप लाईन’ मध्येच आहे. अशा तमाम ज्येष्ठ नागरीकांना सातत्याने मार्गदर्शन करण्यासाठी दादासाहेब हे सदैव झटत असतात. वरिष्ठ नागरीकांच्या संघटना स्थापन करुन त्यांचे सारे `ज्येष्ठ नागरीक’ सवंगडी त्यांच्या हाकेला `ओ’ देत पुढे येतात. लहान मुलांसाठी सुध्दा त्यांची वेगवेगळी कार्यक्रमांची आखणी होत असते. वृत्तपत्रांतून प्रसिध्द झालेल्या लेखांच्या लेखकांना फोन करुन त्यांचे कौतुक करण्याची एक चांगली सवय दादासाहेबांची आहे आणि या त्यांच्या कौतुकाचा मी सुद्धा धनी ठरलो आहे.
    मी नेहमी म्हणतो की दादासाहेब दुरदृष्टीचे आहेत, धोरणी आहेत. दादासाहेबांच्या मोठ्या चिरंजीवांचे नाव सम्राट आणि धाकट्या चिरंजीवाचे नाव कीर्ति आहे. पत्नी राजश्रींनी दादासाहेबांचा संसार अगदी छान नीटनेटकेपणाने सांभाळला आहे. सम्राट सिमला येथे वास्तव्यास असून कीर्ति उर्फ कीर्तिकुमार शिंदे यांची कीर्ति तर मुंबईच्या वृत्तपत्र सृष्टी पासून तर राजकारण्यांपर्यंत कस्तुरीसारखी पसरली आहे. श्वेता ही सून सुध्दा दादासाहेबांना त्यांच्या परिवाराला साजेशीच आहे.  सम्राट अशोक शिंदे आणि कीर्ति अशोक शिंदे म्हटले तर दादासाहेबांच्या सुखी परिवाराच्या वटवृक्षाच्या समर्थ शाखा आहेत. दादासाहेब ७५ वर्षाचे आहेत, असं सांगितलं तर कुणालाही ते खरे वाटणार नाही. याच देहयष्टीत ते शंभरी सहज पार करतील. ती त्यांनी नक्कीच पूर्ण करावी आणि दादासाहेबांच्या अमृत महोत्सवाप्रमाणेच त्यांचा शतक महोत्सव सुध्दा धूमधडाक्यात साजरा होवो आणि त्यावेळीही असे शब्दपुष्प आणि त्या शब्दपुष्पांची माळा गुंफण्याची संधी आम्हाला मिळो हीच सदिच्छा व्यक्त करताना माझ्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे दादासाहेब, आपणांस उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य मिळो, हीच दादासाहेबांच्या श्रध्दास्थानांकडे विनम्र प्रार्थना!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!