अमृता फडणवीस यांच्या हस्ते ‘सीएम चषक’चे उदघाटन

तरुणी-गृहिणींचा जोरदार प्रतिसाद

मुंबई, १५ : एकीकडे मुंबईसह महाराष्ट्रात सीएम चषकसाठी जोरदार प्रतिसाद मिळत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही आज सीएम चषक स्पर्धेत भाग घेतला. अमृता फडणवीस यांनी आज मुंबईतील खेतवाडी स्थित भगिनी सभागृह येथे सीएम चषक स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी स्वतः हातात बॅडमिंटन रॅकेट घेत मैदानात उतरल्या आणि उपस्थित महिला खेळाडूंमध्ये उत्साह भरला. या कार्यक्रमाला स्पर्धेतील सहभागी गृहिणी आणि तरुणींचा मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी कार्यक्रमाला मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगलप्रभात लोढा, गिरगावच्या नगरसेविका अनुराधा पोतदार-झवेरी, वाळकेश्वरच्या नगरसेविका ज्योत्स्नाबेन मेहता, ताडदेवच्या नगरसेविका सरिता पाटील, मलबार हिल भाजपा अध्यक्षा श्वेता मांजरेकर आणि भाजप तसेच भाजयुमोचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मलबार हिल विधानसभा मतदार संघातील महिलांनी काढलेल्या आकर्षक आणि भव्य अशा विविध रांगोळ्यांना भेट देत स्पर्धकांचे अमृता फडणवीस यांनी कौतुक केले तसेच स्वतः रांगोळीही काढली . ‘सीएम चषकच्या निमित्ताने अनेक युवा खेळाडूंना आणि मुख्यत्वे तरुणी आणि गृहिणींना हक्काचे क्रीडा-कला व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. अनेक खेळाडू या स्पर्धेशी जोडले गेल्याचे चित्र महाराष्ट्राकरता आशादायी आहे’, असे अमृता फडणवीस म्हणाल्या. अमृता फडणवीस या स्वतः राज्यस्तरीय टेनिसपटू राहिल्या असून त्यांच्या उपस्थितीने सीएम चषकमधील सहभागी महिलांचा आत्मविश्वास आणखी दुणावला असल्याचे यावेळी भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
महाराष्ट्रभरातून सीएम चषकला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत एकूण ३५ लाखांहून अधिक खेळाडूंनी यात सहभागी घेतला आहे. महिलाही यात मागे नसून आतापर्यंत ५ लाखांहून जास्त महिलांनी सीएम चषकमध्ये सहभाग घेतला आहे. १२ जानेवारी रोजी मुंबईत भव्य कार्यक्रमरूपाने या स्पर्धेची समाप्ती होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!