अरविंद इनामदार म्हणजे गीते मधील ‘कर्मयोगी योध्दा’

पुणे, दि. १९ (प्रतिनिधी) :”सज्जनांचे पाठीराखे आणि दुर्जनांचा कर्दनकाळ असलेले स्पष्ट वक्ते, प्रामाणिक, सत्यप्रिय आणि सामान्य पोलिस व लोकांसाठी अखेरपर्यंत संघर्ष करणारे महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार म्हणजे साक्षात भगवद्गीते मधील ‘कर्मयोग जगणारा योध्दा’च होते. त्यांच्या निधनाने पोलिस दलातील इनामदार पर्व संपले” अशा शब्दांत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या भावना येथे व्यक्त केल्या. अलिकडेच निधन पावलेल्या अरविंद इनामदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुण्यात आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी इनामदार यांच्या विषयीच्या आठवणी जागवल्या. माजी पोलिस महासंचालक वसंतराव सराफ सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी व्यासपीठावर पुण्याचे पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम्, सी.आय.डी.चे प्रमुख आणि अप्पर पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई, वायरलेस विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक रितेशकुमार, भैय्यासाहेब इनामदार, जयंत इनामदार आणि अरविंद इनामदार फाऊंडेशचे विश्वस्त डॉ.सागरदेशपांडे हे उपस्थित होते.

पुण्याचे पोलिस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांच्या प्रास्ताविकानंतर अरविंद इनामदार यांच्या वैशिष्टयपूर्ण भाषणा विषयी एक छोटीशी ध्वनी चित्रफित दाखवण्यात आली. त्यानंतर माजी पोलिस महासंचालक श्री.कृष्णन्, अतुलचंद्र कुलकर्णी, डॉ.वेंकटेशम्, डॉ.सागर देशपांडे, संस्कृततज्ज्ञ डॉ.श्रीकांत बहुलकर, निवृत्त पोलिस अधिकारी-कर्मचारी संघटनेचे विद्याधर दडके, सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक मोहन यादव, हिम्मतराव देशभ्रतार, राजेंद्र ढमाळ, रमेशपंढरपूर यांनी इनामदार यांच्या विषयीच्या आठवणींना उजाळा दिला.

गेल्या तीनवर्षांपासून अरविंद इनामदार फाऊंडेशन तर्फे कर्तृत्ववान सेवानिवृत्त पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. ख्यातनाम उद्योगपती रतन टाटा, नारायण मूर्ती, ज्येष्ट शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकरहे दिग्गज या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. अशा स्वरुपात पोलिसांचा सन्मान करणारा हा देश भरातील पहिलाच उपक्रम असल्याचे फाऊंडेशनचे विश्वस्त डॉ.सागर देशपांडे यांनी यावेळी सांगितले.

अध्यक्षीय समारोप करताना माजीपोलिस महासंचालक श्री.सराफ यांनी अरविंद इनामदार यांच्या वैशिष्टयपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू सांगितले. स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा प्रॉब्लेम होता असे सांगून त्याबाबतची आठवण सांगताना श्री. सराफ म्हणाले, ”एकदा शरद पवार यांनी मला विचारले की, इनामदार असे का बोलतात ? तेव्हा मी पवार यांना सांगितले होते की, जे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी बोलू शकत नाहीत, त्यांच्या मनातले इनामदार बोलतात.”

यावेळी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी इनामदार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना आदरांजली वाहली. पोलिस दलातील अनेक वरिष्ठआजी-माजी अधिकारी आणि कर्मचारी मोठया संस्थेने आदरांजली सभेस उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!