अरे ! तू कसला विठ्ठल, खरा विठ्ठल तर मीच-बाळासाहेब ठाकरे आणि शाहीर उमप यांची जुगलबंदी – योगेश वसंत त्रिवेदी

२० जानेवारी २०१० चा दिवस ! सकाळी साडेअकरा ची वेळ. मित्रवर्य जयंत करंजवकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित पोवाड्याच्या  ध्वनीमुद्रिकेचे (सीडी) प्रकाशन दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री वर करण्यात आले. ध्वनीमुद्रिका तयार होती आणि तिचे प्रकाशन बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्तेच करण्याची इच्छा ज्येष्ठ पत्रकार  आणि या ध्वनीमुद्रिकेची संकल्पना मांडणारे मित्रवर्य जयंत करंजवकर यांची होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करायचंय ना ? आमच्या वर सोडा, आम्ही घडवून आणतो, अशा गमजा काहींनी मारल्या होत्या. अखेर माझ्या कानावर जयंतरावांनी ही बाब घातली. शिवसेना उपनेत्या, प्रवक्त्या डॉ. नीलमताई गोऱ्हे यांचा मातोश्रीवर चांगला वावर असल्याने मी नीलमताईंच्या कानी ही बाब घातली. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची वेळ मिळवून दिली. इतकेंच नव्हे तर त्याही या कार्यक्रमात उपस्थित राहिल्या. वेळ सकाळी साडेअकरा ची आणि केवळ दहाच मिनिटे मिळाली होती. दहा तर दहा  मिनिटे, मातोश्रीवर जाणे महत्त्वाचे होते.

जयंतराव, शाहीर विठ्ठल उमप, त्यांचे चिरंजीव नंदेश आणि संदेश हेही सोबत होते. ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र कोठेकर आणि बरेच जण आले होते. ध्वनीमुद्रिकेचे प्रायोजक सुनील माने होते. शाहीर विठ्ठल उमप यांनी खड्या आवाजात बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित पोवाडा साक्षात बाळासाहेब ठाकरे यांच्या समोरच गाऊन दाखविला आणि तिथे वातावरण एकदम पालटले. पोवाडा झाला आणि शाहीर उमप व बाळासाहेब यांच्या गप्पांचा फड रंगला. “अरे, तू कसला विठ्ठल ? तू तर नांवाचा विठ्ठल आहेस. खरा विठ्ठल तर मीच आहे,” आपल्या खास ठाकरी शैलीत बाळासाहेब ठाकरे यांनी शाहीरांना म्हटले. त्यानंतर बऱ्याच इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या आणि बोला, शाहीर काय काम आहे कां ? त्यावर चेहरा टाकून शाहीर बसलेले पाहून बाळासाहेबच बोलले. काय झालं ? शाहीर उमप म्हणाले, “साहेब, घराचं काम झालेलं नाहीये.” बाळासाहेब कडाडले, अरे, ते आबांचे पीआरओ कुठायत ? जयंत करंजवकर हे कडवे/कट्टर शिवसैनिक असले तरी मंत्रालयात ते नऊ वर्षे उपमुख्यमंत्री रावसाहेब रामराव उर्फ आर.आर. पाटील यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत होते. वसंतराव पिटके आणि जयंत करंजवकर ही माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांमधली प्रख्यात जोडी आबांकडे होती. तो संदर्भ बाळासाहेब ठाकरे यांना माहित होता. म्हणून मुद्दाम ते म्हणाले. पण लगेचच बाळासाहेबांनी पुढे सांगितले कीं, ते काम शाहीर माझ्याकडे द्या. आपलं सरकार नसलं तरी आपली चालते बरं कां ? आणि मग शाहीर विठ्ठल उमप यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छाधिकारातून दहा टक्के कोट्यातून सदनिका साठीची कागदपत्रे बाळासाहेब ठाकरे यांना सोपविली.

काही दिवसांनी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी शाहीरांना सदनिका मिळण्याबाबतची कार्यवाही पूर्ण झाली असल्याचा ‘संदेश’ मला दिला. एका चांगल्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे भाग्य जयंतरावांमुळे मला लाभले. याच कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरे यांनी, मी हिंदुत्व का घेतले हे मला बाजूला घेऊन सविस्तरपणे सांगितले. अर्थात बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची व्याख्या मुंबई उच्च न्यायालयात डॉ. मनोहर जोशी विरुद्ध भाऊराव पाटील या खटल्यात माझ्या साक्षीत सविस्तरपणे मी मांडली होती आणि ११ डिसेंबर १९९५ रोजी जस्टिस जे. एस. वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात डॉ. मनोहर जोशी यांना त्यांनी धर्माच्या आधारे निवडणूक लढविली नसल्याचा निर्वाळा दिला आणि त्यांची निर्दोष मुक्तता केली. महाराष्ट्रात राहतो तो मराठी, गुजरात मध्ये राहतो तो गुजराती, बंगालमध्ये राहतो तो बंगाली या न्यायाने हिंदुस्थानात राहतो तो हिंदू. आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आमचे हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे हिंदुत्व नव्हे, ही बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची व्याख्या. केवळ मराठी मराठी म्हणून आपण पाकिस्तान बरोबर लढू शकत नाही म्हणून मी हिंदुत्वाचा स्वीकार केला, असे साक्षात बाळासाहेब ठाकरे यांनी २० जानेवारी २०१० रोजी मला स्पष्टपणे सांगितले. जयंत करंजवकर यांच्या संकल्पनेतील ही ध्वनीमुद्रिका एक वर्षापूर्वी निघाली असती आणि तिचा प्रसार प्रचार सर्वत्र झाला असता तर निवडणुकीत चित्र आणखी बदलले असते, इतका तो प्रभावशाली पोवाडा आहे. अर्थात, काळाच्या उदरात काय दडलेेे हे कोण सांगणार ? केवळ दहाच मिनिटे वेळ देणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर तब्बल तास दीडतास कसा गेला हे  कुणाला कळलेच नाही. लोकशाहीर विठ्ठल उमप मंत्रालयात येत तेंव्हा त्यांची हमखास भेट होत असे. अतिशय हसतमुख अशी त्यांची भावमुद्रा असे. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांच्या वसंत व्याख्यानमालेत संदेश/नंदेश उमप यांची हजेरी असे. लोकशाहीर विठ्ठल उमप यांचा वारसा ते चांगला चालवीत आहेत. पंढरीच्या पांडुरंगासह या दोन्ही विठ्ठलाच्या चरणी साष्टांग प्रणिपात !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!