आगरी समाज विकास मंडळाचा ३६ वा स्नेहसंमेलन व वार्षिक बक्षीस समारंभ थाटात संपन्न

वसई (प्रतिनिधी) : दिनांक १२ जानेवारी २०२० रोजी आगरी समाज विकास मंडळ वसई तालुका पश्चिम विभागाचा ३६ वा वार्षिक बक्षीस समारंभ व स्नेहसंमेलन उमेळमान, वसई रोड (पश्चिम) येथील आगरी समाज विकास शिक्षण संस्था वसई यांच्या प्रांगणात मोठया उत्साहात पार पडला.

आगरी समाज विकास मंडळ वसई तालुका (पश्चिम विभाग) हे मंडळ वसई, विरार व नायगाव या स्टेशनच्या पश्चिम पट्टयातील उमेळमान, दिवाणमान, अर्नाळा, आगाशी, बोळींज व पाणजू या गावांमधून ७ विभागामध्ये कार्यरत आहे. प्रत्येक विभागास वार्षिक स्नेहसंमेलनाच्या यजमानपदाचा मान ७ वर्षानंतर एकदा मिळतो. यावर्षी हा मान उमेळमान गावाला मिळाला होता. त्यासाठी उमेळमान गावातील सर्व संस्था, मंडळे, ग्रुप, लहान थोर आगरी बंधू-भगिनींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतत १ महिना विशेष मेहनत घेतली.

कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी आठ वाजता संपूर्ण उमेळमान गावात मिरवणुकीद्वारे प्राचीन आगरी संस्कृतीचे दर्शन घडवणारी शोभायात्रा काढण्यात आली. ‘न भूतो न भविष्यती’ अशा या शोभायात्रेतून आगरी परंपरा आगरी व्यवसाय, आगरी सण-उत्सव, भजन कीर्तन, ढोल, लेझीम बँड पथक तसेच आगरी लग्न वरात व वरातीला असलेले मेल-करी इत्यादी लुप्त होत असलेल्या प्राचीन आगरी संस्कृतींचे दर्शन घडवण्यात आले. त्याच दिवशी शोभायात्रेनंतर उमेळमान क्रिकेट मैदानावर धावणे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले व तदनंतर आगरी समाज विकास शिक्षण संस्थेमध्ये निबंध स्पर्धा कॅरम स्पर्धा बुध्दिबळ स्पर्धा रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा व महिलांसाठी संगीत खुर्ची इत्यादी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धांमधून संपूर्ण वसई तालुक्यातून २०० पेक्षा अधिक आगरी स्पर्धकांनी भाग घेतला. आदल्या दिवशी कै.सखाराम हरी घरात यांच्या स्मरणार्थ उमेळमान क्रिकेट मैदानावर ७ विभागांच्या क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले केले होते. या स्पर्धेत पाणजू संघ विजेता तर बोळींज संघ उपविजेता ठरला.

दुपारी ४ वाजता ३६ व्या वार्षिक बक्षीस समारंभास सुरुवात झाली. सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोईसर चे आमदार माननीय राजेश पाटील, माजी महापौर नारायण मानकर, वसई-विरार शहर महानगरपालिकेचे नगरसेवक सचिन घरत, नाबार्डचे निवृत्त उपमहाप्रबंधक विजय किणी, वसई प्रगती को-ऑॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड चे माजी संचालक मनोहर किणी तसेच महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री हरिश्चंद्र घरत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

बक्षीस समारंभाची सुरुवात दिपप्रज्वलन व सतीश पाटील आणि ग्रुप यांनी सादर केलेल्या ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी उमेळमान विभागाने आगरी परंपरेची व उमेळमान गावाच्या पूर्व इतिहासाची माहिती देण्यासाठी बनवलेली डॉक्युमेंटरीचे एलसीडीवर प्रक्षेपण करण्यात आले. या डॉक्यूमेंटरी मधून आगरी समाजात वापरल्या जाणाऱ्या पारंपारिक वस्तू व साधने तसेच आगरी लोकांचे व्यवसाय, सण, रूढी, परंपरा इत्यादींची उत्कृष्ट माहिती सादर करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंडळाचे अध्यक्ष श्री मदन किणी यांनी मंडळाचे प्रास्ताविक सादर केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी आगरी समाज स्थापनेपासून आतापर्यंत सर्व घडामोडींचा आढावा घेतला व समाजाच्या दोन संस्था वसई प्रगती को-ऑॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अर्नाळा व आगरी समाज विकास शिक्षण संस्था वसई विकास शिक्षण संस्था (वसई) यांच्या कार्याची माहिती दिली. समाजातील सर्व लोकांनी एकत्रित राहून समाजाचा विकास करण्याचे त्यांनी आवाहन केले.

तदनंतर आपल्या मार्गदर्शनपर भाषणात माजी महापौर व आगरी समाजाचे ज्येष्ठ नेते नारायण मानकर यांनी उपस्थित समाजबांधव व विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शन करताना आपण कोणते शिक्षण घेणार आहात त्यात विशेष नैपुण्य मिळवणे गरजेचे असल्याचे सांगितले तसेच आजचे युग हे स्पर्धेचे युग असल्याने तरुणांनी एम.पी.एस.सी, यू.पी.एस.सी तसेच विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपला रोजगार उपलब्ध करावा किंवा स्वत:चा व्यवसाय सुरु करावा जेणेकरून रोजगार निर्मितीस चालना मिळेल उमेळमान विभागाने तयार केलेल्या डॉक्युमेंटरीचे त्यांनी कौतुक केले व आगरी समाजाचे सर्व सण, उत्सव, चालीरीती, उद्योग धंदे, व्यवसाय याची सखोल माहिती असलेली आगरी समाजाचे संस्कृती घडवणारी उत्तम व परिपूर्ण डॉक्युमेंटरी बनवावी अशी सूचना केली व त्यासाठी होणार संपूर्ण खर्च देण्याचे त्यांनी जाहीर केले.

आमदार राजेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना उमेळमान गावाचा व त्यांचा असलेला ऋ णानुबंध सांगितला व भविष्यात होणाऱ्या आगरी जनगणनेबाबत त्यांनी माहिती दिली व सर्वांच्या उत्कर्षासाठी व इथल्या प्रत्येक नागरिकांच्या विकासाच्या प्रती कटिबध्द असल्याचे नमूद केले. व प्रत्येकांनी आपल्या रूढी परंपरा यांचे जतन करावे जेणेकरून भावी पिढीपुढे आपल्याला त्याचा आदर्श ठेवता येईल. व समाजाच्या सर्व परंपरा अबाधित राहतील.

तदनंतर झालेल्या बक्षीस समारंभातून सुरुवातीस उमेळमान विभागातील २५० पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांचा भेटवस्तू श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला या समारंभातुन इयत्ता पहिली ते पदवीधर गुणवंत विद्यार्थी तसेच विविध कला क्रीडा स्पर्धातून तालुका व जिल्हा, राज्य पातळीवर गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या क्रीडापटू, नाटयकलावंत, संगीत क्षेत्रातील कलावंत तसेच समाजात झालेले डॉक्टर इंजिनियर विशेष पदवी व पदविका प्राप्त २०० पेक्षा अधिक विद्यार्थी व नागरिकांचा गुणगौरव करण्यात आला व मंडळाच्या रोख शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उमेळमान गावातील महिला व मुलींनी विविध करमणुकीचे कार्यक्रम सादर केले व सर्वांची शाबासकी मिळवली. या संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रमाची जबाबदारी उमेळमान गावातील सर्व नागरिकांनी आपापसात वाटून घेतल्यामुळे कार्यक्रम शिस्तबध्द, उत्कृष्ट तसेच कायमचा स्मरणात राहील असा दैदिप्यमान झाला.

उमेळमान गावातील संदेश पाटील व त्यांचे सहकारी यांनी अल्पोपहार आणि आणि दुपारच्या भोजनाची व्यवस्था पाहिली. प्रदर्शन, जाहिरात, प्रसिध्दी व ध्वनिचित्रफीत, डॉक्युमेंटरी इत्यादी निर्मितीसाठी नंदू किणी, मनीष घरत व त्यांचे सहकारी यांनी विशेष मेहनत घेतली. मंडळाच्या विविध स्पर्धासाठी सहकार्य करणारे आगरी बांधव, सर्व सदस्य मंडळ, सर्व विभागातील कार्यकर्ते तसेच मुख्य बक्षीस समारंभाचे संचलन व निवेदन मधुकर घरत, हितेश पाटील व मकरंद घरत यांनी केले. अमोल डेकोरेटर्स संजय पाटील यांनी मुख्य सभामंडप प्रदर्शनी स्पर्धांसाठी वेगवेगळे मंडप इत्यादी सर्वस्वी उपलब्ध करून दिल्याने समारंभ अविस्मरणीय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: