आगाशीच्या लखोबावर सर्जिकल स्ट्राईक

विरार (वार्ताहर) : माजी महसूलमंत्री, पद्मश्री हरी गोविंद उर्फ भाऊसाहेब वर्तक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे असलेली करोडो रुपयांची जमिन बनावट दस्त आणि खोटया सह्या करून हडप केले प्रकरणात आगाशी येथील महेश यशवंत भोईर व त्याचे दोन साथीदार विजय अनंत पाटील, राजेश पी. कामत यांचेवर अर्नाळा सागरी पोलिस स्टेशन येथे दिनांक 26/01/2019 रोजी गुन्हा रजि. क्रमांक20/2019, भा.द.वि.स. कलम 420, 463, 464, 465, 467, 468, 471, 474 ,34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

मौजे आगाशी येथील सर्वे क्रमांक 233/1अ ह्या जागेचे मुळ मालक हरी गोविंद उर्फ भाऊसाहेब वर्तक, नरसिंग गोविंद वर्तक, रघुनंदन गोविंद वर्तक,हरीहर गोविंद वर्तक, परशुराम गोविंद वर्तक, महादेव गोविंद वर्तक, पुरुषोत्तम मनोहरदास शहा,अमृतलाल मनोहरदास शहा व कांतीलाल मनोहरदास शहा हे सर्व मयत असताना ते जिवंत आहेत असे दाखवून बनावट कुळमुखत्यार पत्र तयार करून त्यावर महेश  भोईर यांनी मयत व्यक्तींच्या खोटया सह्या केल्या. आणि ह्या कुळमुखत्यार पत्राच्या आधारे महेश भोईर यांनी बनावट खरेदीखत तयार करून हि जमिन विकत घेतल्याचे दाखवून सदर जागेचा सात बारा स्वत:च्या नावे केला होता.

आगाशी येथील दक्ष नागरीक अनिकेत वाडीवकर यांनी मागील वर्षी हे प्रकरण उघडकीस आणले होते. ह्या गंभीर गुन्हे कृत्याबाबत अनिकेत वाडीवकर ह्यांनी पोलिस महानिरीक्षक (कोंकण विभाग) व पोलिस अधिक्षक (पालघर) ह्यांना तक्रारी दिल्या होत्या. तसेच त्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू होता. मात्र जमिनीचे मुळ मालक मयत असले कारणामुळे गुन्हा दाखल होण्यास वेळ लागला होता.

मात्र सरते शेवटी पद्मश्री हरी गोविंद उर्फ भाऊसाहेब वर्तक यांचे पुतणे विकास नरसिंग वर्तक उर्फ विकास बंधु यांनी ‘वर्तक कुटुंबियांची फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांना शासन झालेच पाहिजे’ अशी खंबीर भूमिका घेतली आणि भूमाफिया महेश भोईर याच्या दबावाला न जुमानता अर्नाळा सागरी पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली.

बोळींज येथिल सर्वे क्रमांक 416 हि वर्तक कुटुंबियांच्या मालकीची जमिन बनावट दस्तऐवज तयार करून परस्पर विकले प्रकरणी वर्तक कुटुंबियांनी याआगोदरच संबधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केलेला आहे. लागोपाठ गुन्हे दाखल झाल्यामुळे अश्या प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांचे धाबे निश्चितपणे दणाणले असणार यात शंका नाही.

महेशभोईर व त्याच्या साथीदारांनी बनावट कुळमुखत्यार पत्राच्या आधारे मयत व्यक्ति जिवंत आहेत असे भासवून बनावट खरेदीखताची दस्त नोंदणी केल्याचे, तसेच खोटे सरकारी शिक्के वापरुन, नकली मुद्रांक व नकली शासकीय मोहोर बनवून सार्वजनिक नोंद पुस्तकाचे बनावटीकरण करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या कब्ज्यात बाळगून,तसेच दस्तऐवज अधिप्रमाणित करण्याकरिता वापरले जाणारे बोधचिन्ह नकली तयार करून त्याचा वापर केल्यामुळे त्यांचावर गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.

महेश भोईर ह्याच्यावर याआधी बारीवाडा गावातील तिवरांच्या झाडांच्या बेसुमार कत्तली प्रकरणी अर्नाळा सागरी पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजि. क्रमांक 19/2016 नोंद आहे. त्याच प्रमाणे बोळींज येथील सर्वे नं. 392 ह्या म्हाडाच्या जागेचे बनावट दस्त तयार करून, त्या जागेत अतिक्रमण करून तेथे अवैध बांधकाम करून जागा हडप केले प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात यावा म्हणून म्हाडाचा पाठपुरावा सुरू आहे. महेश भोईर यांच्या गुन्हेगारीचा आलेख आतापर्यंत चढता राहीला आहे. मात्र हा चलाख गुन्हेगार आजपर्यंत पोलिसांच्या तावडीत सापडत नव्हता.

माजी महसूलमंत्री, पद्मश्री हरी गोविंद उर्फ भाऊसाहेब वर्तक आणि कुटुंबियांच्या फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर ह्या प्रकरणातील प्रमुख सुत्रधार महेश भोईर सध्या फरारी असून त्याचा शोध घेण्याकरीता पोलिस पथके रवाना करण्यात आलेली आहेत. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलिस स्टेशन येथे संपर्क साधला असता लवकरच महेश भोईर आणि त्याच्या साथीदारांना लवकरच पकडण्यात येईल असे उत्तर मिळाले.

पुष्कराज वर्तक ह्यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता ‘पोलिस खात्याने सदर गुन्हा दाखल करण्यात दाखवलेल्या तत्परते बद्दल त्यांचे आभार मानले. तसेच अशीच तत्परता इतर गुन्ह्यांबाबत व गुन्हेगारांच्या बाबत दाखवल्यास सर्व सामान्य जनतेचा कायद्यावरचा आणि पोलिसांवरचा विश्वास कायम राहील असे मत व्यक्त केले. या वेळी बोलताना त्यांनी पोलिस दलाचे मनापासून आभार मानले तर या प्रकरणी गेली दोन वर्षे सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या अनिकेत वाडिवकर ह्यांचे देखिल अभिनंदन केले.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!