आचोळ्यातील वादग्रस्त ‘गुरुकुल’ शाळा अखेर पालिकेकडून भुईसपाट 

वसई (वार्ताहर)  : नालासोपारा पूर्वेकडील अग्रवाल नगरी परिसरातील डंपिंग ग्राऊंड आणि मलनिस्सारणासाठी आरक्षित असलेल्या जमिनीवर सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाने उभारलेली अनधिकृत चार मजली इमारत अखेर पालिकेने भुईसपाट केली आहे.

मंगळवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात पालिकेने बेकायदा चार मजली इमारत भुईसपाट केली. प्रभाग ‘डी’च्या प्रभारी सहाय्यक आयुक्त मनाली शिंदे यांच्या या धडक कारवाईमुळे भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. अग्रवाल नगरी परिसरात  मौजे आचोळे सर्वे नंबर २३, २४, २५, २६, २७, २८, २९, ३०, ३१, ३२ यावर साधारण ३० एकर क्षेत्रफळाची जमीन कचराभूमीसाठी वसई-विरार उपप्रदेशाच्या विकास आराखड्यात आरक्षित करण्यात आली आहे. यातील सर्व्हे क्रमांक २४ मध्ये अतिक्रमण करून बहुजन विकास आघाडीचे तत्कालीन नगरसेवक सीताराम गुप्ता यांनी पदाचा गैरवापर करून ‘गुरुकुल’ नामक एका शाळचे अनधिकृत बांधकाम केले होतेे. 
या शाळेच्या बांधकामांबाबत वारंवार तक्रारी आल्यानंतर पालिकेने बांधकामधारकास नोटीस बजावली होती. मात्रपालिकेच्या नोटीसेला न जुमानता बांधकाम सुरूच ठेवल्याने पालिकेचे पथक ४ जुलै रोजी कारवाईसाठी गेले होते.
कारवाईदरम्यान सदर बेकायदा बांधकामाच्या तळमजल्यावर अनेक देव-देवतांच्या मुर्त्या असल्याने कारवाईत अडचण येत असल्याने पालिकेचे पथक कारवाई थांबवून या मुर्त्या हटविण्यासाठी बांधकामधारकास एका दिवसाच्या मुदतीचे पत्र देऊन माघारी परतले होते. या अर्धवट कारवाईनंतर सहाय्यक आयुक्त मनाली शिंदे यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यानंतर सिताराम गुप्ता यांनी या बेकायदा शाळेचे बांधकाम वाचविण्यासाठी एका शिवसेना पदाधिकारी यांच्याकडेही मदत मागितल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. या अनधिकृत शाळेचे बांधकाम गाजत असताना तसेच देवांच्या मुर्त्या हटविण्यासाठी मुदत देऊनही त्या न हटविल्यामुळे अखेर सोमवारी पालिकेनेच मुर्त्या बाजूस हटविल्या. त्यानंतर कारवाईस कोणतीही अडचण नसल्याने अखेर पालिकेचे पथक मंगळवारी पुन्हा कारवाईसाठी धडकले.आयुक्त डी. गंगाथरन यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे, नगररचना विभागाचे उपसंचालक रेड्डी यांच्या उपस्थितीत प्रभाग ‘डी’च्या प्रभारी सहाय्यक आयुक्त मनाली शिंदे, ‘आय’प्रभागाचे सहाय्यक आयुक्त सुभाष जाधव, अतिक्रमण इंजिनिअर दिलीप बुक्कन,थॉमस रोड्रिक्स यांनी पोकलेनच्या सहाय्याने सदर चार मजली इमारत भुईसपाट केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!