आजीबाईचा बटवा पुन्हा बहरायला हवा ! निसर्गप्रेमींचे आवाहन

हजारो वर्षांची परंपरा आस्थेने जपण्यासाठी पुढाकार वनौषधींच्या लागवडीसाठी नैसर्गिक खतेच हवीत

मुंबई (प्रतिनिधी) : आजार आधीही होते, आजही आहेत. पण पूर्वी औषधांवर इतका खर्च व्हायचा नाही, जेवढा आज होतो. कारण तेव्हा  आपल्याला परिसरातील अनेक वनस्पतींचे गुणधर्म माहीत होते. सर्दी तापापासून दाढदुखीपर्यंत अनेक औषधं आपल्या अंगणात होती. आज आरोग्य व्यवस्था कोलमडून पडत असताना, आपल्या त्या पारंपरिक ज्ञानसंपदेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. तेव्हा आतातरी या वनौषधींचा आपण गांभीर्याने विचार करायला हवा. असे आवाहन कॉस्मिक इकॉलॉजिकल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. उदयकुमार पाध्ये यांनी केले. ट्रस्ट व मैत्री फाउंडेशन यांनी संयुक्तरित्या प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून त्यांनी वनौषधींवर विचार मांडले.

आज अनेक प्रॉडक्ट्स हर्बल म्हणून मिरवतात. कारण हर्बल म्हटले की साईड इफेक्ट्स कमी, हे जवळपास प्रत्येकाला माहित आहे. शिवाय गुणही येणारच. पण मग त्यासाठी आपण बाजारपेठेवर विसंबून राहायला नको. किमान सामान्य आजारांवरची औषधे तरी घरच्या घरी तयार व्हायला हवीत. आज आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुष काढा घेत आहोत. अगदी तसेच अनेक लहान मोठ्या आजारांवरची औषधे घरी तयार करता येतील. आज दातांचे दवाखाने बंद आहेत. अशावेळी दातांच्या ठणक्यावर पेरूच्या पानांच्या काढ्याची गुळणी आपण करूच शकतो. त्यासाठी कुणी बाजारात प्रॉडक्ट आणायची गरज नाही. आपल्या पारंपरिक ज्ञानावर आपण थोडा विश्वास दाखवायला हवा. काही शंका असतील तर माहितीच्या महाजाळात शोध घ्यायलाही हरकत नाही. पण आजीबाईंचा बटवा पुन्हा एकदा बहरायला हवा. अशी अपेक्षा मैत्री फाउंडेशनच्या अध्यक्षा सृष्टी गुजराथी यांनी व्यक्त केली.

पावसाळ्यात वृक्षलागवडीचे अनेक कार्यक्रम होतात. अशा ठिकाणी उगीचच शोभेचे गुलमोहोर, रेन ट्री, कॅशिया, ग्लिरिसिडिया लावण्याऐवजी कडुलिंब, आंबा, वड, औदुंबर, बकुळ, आपटा, देवदार यांसारख्या वृक्षांचे रोपण करायला हवे. एकतर हे वृक्ष स्थानिक असल्याने इथल्या नैसर्गिक परिसंस्थेला उपयुक्त आहेत. पक्ष्यांचा निवारा आहेत. शिवाय ज्याला गरज पडेल त्याला अशा वृक्षांचे औषधी अंग सहज उपलब्ध होऊ शकेल. जिथे फार मोठी झाडे लावणे शक्य नाही अशा ठिकाणी, विशेषतः सोसायट्यांच्या कंपाऊंडमध्ये पेरू, चिकू, कण्हेर, मधुमालती, निर्गुडी, डाळिंब, रुई, लिंबू, बेल, बोर, अडुळसा, कढीपत्ता, यांसारखे पर्याय उपलब्ध आहेत. कम्पाऊंडसाठी उगीच सगळीकडे कागदी लिंबू लावण्यापेक्षा मेंदी, करवंद अशा पारंपरिक पर्यायांचा पुन्हा एकदा विचार व्हायला हवा. ही झाडे आपल्याला प्राणवायू, सावली तर देतीलच. शिवाय यांचे गुणधर्म समजून घेतले तर डॉक्टरांकडे आणि पार्लरमध्ये फेऱ्या मारण्याची गरजच उरणार नाही. आरोग्य आणि सौंदर्य दारातच उभे राहील. असा विश्वास वनौषधींचे अभ्यासक, निसर्गोपचार तज्ज्ञ सुधीर पाटील व सुनील देवरुखकर यांनी व्यक्त केला.

कुंडीतही फुलतात वनौषधी !
आज अनेकजण जागेच्या अडचणीमुळे घरच्या घरी कुंड्यांत रोपे वाढवून निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करत आहेत. हे नक्कीच कौतुकास्पद आहे. पण आपला हा प्रयत्नही सजग असायला हवा. बहुतेकांकडे परंपरा म्हणून तुळस असते. पण ती खुरटलेली. बाकी जास्तीत जास्त लक्ष शोभेच्या झाडांकडे असते. त्याऐवजी शतावरी, दुर्वा, जाई, माका, कोरफड, गुडमार, दमवेल, गुळवेल, कडूचिराईत, आघाडा, मधुपर्णी, गवती चहा, पानफुटी, पुदिना, हळद, आले, सब्जा, लाजाळू, वेखंड, मंजिष्ठ, मुसळी, माका, नीरब्राह्मी, ब्राह्मी, बावची, धोत्रा, नागरमोथा, गोखरू, अनंतमूळ, अडुळसा, अक्कलकाढा किंवा मग रोजच्या आहारात वापरता येतील अशा मायक्रोग्रीन्सकडे लक्ष द्यायला हवे. जेणेकरून अडीअडचणीला आपला वैद्य आपल्या सोबत असेल, अशी अपेक्षा ट्रस्टचे शैलेश जोशी व प्रसाद गायतोंडे यांनी बोलून दाखवली.

फाउंडेशन व ट्रस्टतर्फे प्रतिवर्षी शेकडो वनौषधींची लागवड करण्यात येते. या कार्यात निर्मला पाध्ये, मृणाल इनामदार, सुरेखा अभ्यंकर, रेश्मा अग्निहोत्री, ईश्वर पटेल, गौरव देव, डॉ. अशोक जैन, अजय गांधी, ज्ञानेश्वर परब, संजय  हिरासकर, पूजा पटेल, डॉ. विजयकुमार पोंक्षे, डॉ. मनोहर अकोले, प्रा. सायली फणसे, राजेंद्र पाटील, विश्वास पाटील यांचे मोलाचे सहकार्य असते. .

१. मधुमालती (Hiptage benghalensis)
पानांचा वापर जखम, सूज, कुष्ठरोग, कफ, संधिवात यावर गुणकारी

२. माका (Eclipta Alba)
यकृताची सूज, कावीळ, मूळव्याध, सांधेदुखी व त्वचेचे जुनाट आजार यावर माका उपयुक्त. केसांच्या आरोग्यासाठी याचे तेल उपयुक्त.

३. बेल Aegle Marmelos
बेलफळ अतिसार, आतड्यांचे विवकार यावर गुणकारी. पानांचा रस मधुमेहावर उपयुक्त.

४. दुर्वा (Cynodon Dactylon)
बुद्धीवर्धक , शक्तीवर्धन , थडं गुणाच्या आहेत. दुर्वाच्या रसाने, लेपनाने त्वचेचा दाह कमी होतो. आम्लपित्तावरही दुर्वाचा रस उपयुक्त. डोळ्यांचे विकार, सर्दी-खोकला यावर गुणकारी.

५. बोर (Zizyphus Mauritiana)
फळे, बिया, पाने, खोड हे सर्व भाग औषधी. कफ, पित्त, ताप, त्वचारोग, अतिसार यावर उपयुक्त.

६. धोतरा (Datura metel)
त्वचारोग, डोळ्यांचे विकार, मूळव्याध, मूतखडा यावर गुणकारी

७. तुळस (Ocimum sanctum)
सर्दी-खोकल्यासाठी पानांचा काढा गुणकारी. अपचन, ढेकर, पोटदुखी, कानदुखी यावरही पानांचा रस उपयुक्त.

८. आघाडा (Achyranthes aspera)
मूळव्याध, पोटाचे विकार, अतिसार, बद्धकोष्ठ यावर उपयुक्त

९. शमी (Prosopis cineraria)
दाहशामक. दमा, ब्रॉन्कायिटस, कुष्ठरोग, अतिसार, जुलाब यावर गुणकारी.

१०. केवडा (Pandanus odoratissimus)
पाने व फुले औषधी. डोकेदुखी, पोटदुखी, जखमा यावर उपयुक्त

११. डोरली/रानवांगे (Solanum indicum)
कफ, सर्दी, दम्यावर गुणकारी, पानाचा रस पोटदुखीवर उपयुक्त. याच्या मुळांचा वापर दशमुळारीष्टात केला जातो.

१२. कण्हेर (Nerium indicum)
तेल विंचवाच्या चावण्यावर उपयुक्त. मूळव्याध, सूज यावर उपयुक्त

१३. आपटा (Bauhinia racemosa)
साल, पाने, शेंगा आणि बिया औषधी. पित्त आणि कफदोषांवर गुणकारी व दाहशामक. खोडाच्या सालीचा लेप जखमा व सूज यावर लावतात.

१४. रूई, मंदार (Calotropis gigantea)
कुष्ठरोग, कफ, पोटाचे विकार यावर गुणकारी. न्युमोनिआ, सायनसला, सूज येणे, दमा या विकारांमध्ये उपयुक्त.

१५. अजुर्न सादडा (Terminalia arjuna)
जखम भरून येण्यास सालीचा काढा उपयुक्त, ह्रदयाच्या शिथिलतेवर खोडाची साल अत्यंत गुणकारी, मोडलेले हाड सांधण्यास सालीचा वापर करतात. कानदुखीवर पानांचा ताजा रस कानात घालतात.

१६. विष्णुक्रांत (Evolvulus alsinoides)
अल्सर, कावीळ, मधुमेहावर उपयुक्त

१७. डाळींब (Punica granatum)
खोकल्यावर फळाची साल उपयुक्त, तोंडात धरून चघळल्यास खोकला बरा होतो.

१८. देवदार (Cedrus deodara)
डोकेदुखी, अंगदुखी, सर्दी, चर्मरोग, पोटदुखी यावर उपयुक्त.

१९. मरवा (Origanum marjorana)
चर्मरोग, पोटदुखी यावर गुणकारी.

२०. निर्गुडी (Vitex negundo )
सजू , संधीवात, डोकेदुखी यावर याची पाने अतिशय गुणकारी.

२१. पिंपळ (Ficus religiosa)
खोडाची साल त्वचाविकार व अल्सरवर उपयुक्त. पाने तोतरेपणा, तोंड येणे यावर उपयुक्त.

२२. जाई (Jasminum grandiflorum)
मूळ व फु ले आयुर्वेद,यूनानी औषधांमध्ये वापरतात. पित्त, तोंड येणे, त्वचारोग यावर गुणकारी

२३. अगस्ती, हादगा (Sesbania grandiflora)
ताप, सर्दी, खोकला, डोके दुखीवर गुणकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!