आदीवासी महिलांनी बनविलेल्या कंदिलांनी राजभवन लखलखणार

वसई : आदीवासी भागात सामाजिक, शैक्षणिक व रोजगार निर्मितीसाठी कार्यरत असणार्‍या पालघर जिल्हातील ‘विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर’च्या आदीवासी भगिनींनी तयार केलेल्या पर्यावरण पूरक बांबूंच्या आकर्षक कंदीलांनी यंदाचे राजभवन लखलखणार आहे.
 
यंदाच्या दिवाळीत राजभवनात ४८० कंदील राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी त्यांच्या सर्व कर्मचार्‍यांना भेट म्हणून देणार आहेत. पर्यावरणपूरक शेकडो बांबूंच्या आकर्षक कंदीलांनी राजभवन लखलखणार असल्याने ‘विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर’च्या आदीवासी भगिनींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ‘विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर’च्या आदीवासी भगिनींनी तयार केलेले पर्यावरण पूरक बांबूंचे आकर्षक कंदील २० ऑक्टोबर रोजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना भेट म्हणून देण्यात आले होते. यावेळी विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरचे व्यवस्थापक लुकेश वासुदेव बंड, प्रशिक्षण व विकास अधिकारी प्रगती सचिन भोईर, श्रीशिवराजाभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड व सदस्य,रायगड विकास प्राधिकरण कार्याध्यक्ष पांडुरंग ताठेले व सामाजिक कार्यकर्ते भगवान कोंडलेकर उपस्थित होते.
यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ‘विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर’च्या आदीवासी भगिनींनी बनविलेल्या बांबूच्या वस्तूंचे कौतुक केले होते. तसेच रक्षाबंधन सणाच्यावेळी बांबूनिर्मित राख्यांना नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत या आदीवासी महिलांचा उत्साह वाढविला होता. याबद्दल आभार मानत यंदाच्या दिवाळीत पर्यावरण पूरक आकर्षक आदिवासी महिलांनी बनविलेल्या बांबू कंदिलांचा जास्तीत जास्त वापर जनतेने करावा व या महिलांना सन्मानजनक रोजगार मिळवून देण्यात हातभार लावावा असे आवाहन देखील केले होते.
‘विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर’च्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून महिला सक्षमीकरणा करिता पालघर जिल्हातील आदीवासी, गरजू महिलांना घरकाम सांभाळून आर्थिक हातभार लाभावा व त्यांना सन्मानजनक रोजगार प्राप्त व्हावा या हेतूने विवेक या संस्थेने पुढाकार घेत अशा महिलांना बांबू हस्तकलेचे मोफत प्रशिक्षण देत आहे. त्यांचाकडून पर्यावरणपूरक बांबू हस्तकलेच्या बहुउपयोगी निरनिराळ्या वस्तू तयार करतात. यामध्ये बांबू हस्तकलेचा समावेश असून प्रशिक्षित महिला २१ प्रकारची आकर्षक उत्पादने तयार करत आहेत.
याचाच एक भाग या संस्थमार्फत स्वदेशी आकाशकंदीलची निर्मिती करण्यात आली आहे. हे आकाशकंदील पूर्णतः स्वदेशी व पर्यावरण पूरक बांबूनिर्मित आहेत. यात पाच प्रकारचे आकाशकंदील बनविण्यात आले आहे. यात बुध, गुरु आकाशकंदील, शुक्र आकाशकंदील, सप्तर्षी आकाशकंदील, ध्रुव आकाशकंदील याचा समावेश आहे. सर्व प्रकारच्या रंगांमध्ये बनविण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!