आधी फेरीवाल्यांची सोय करा मगच कारवाईचा बडगा उगारा – वीरपाल कश्यप

विरार (वार्ताहर) : मागील अनेक वर्षांपासून सुरु असलेले स्वाद गल्ली भाजी मार्केट, विरार पश्चिम येथील फेरीवाल्यांना हटवायचे असेल तर नियमानुसार आधी त्यांची बसण्याची योग्य ती व्यवस्था करावी आणि मगच तेथे बासणाऱ्यांवर करवाई करावी अशा आशयाचे पत्र वसई विरार फेरीवाला सामाजिक संघाचे अध्यक्ष वीरपाल कश्यप यांनी महापालिकेचे आयुक्त सतीश लोखंडे यांना दिले आहे.
सन 2016 पासून आम्ही ही लेखी पत्र व्यवहाराद्वारे करीत आहोत तरीही महापालिकेचे अधिकारी कारवाई करण्यासाठी धडकतात असे कश्यप यांनी म्हटले आहे.  काल सोम. दि. 11 रोजी सायंकाळी प्रभाग समिती अ चे सहा. आयुक्त रतेश किणी आपल्या सहकाऱ्यांसह लवाजमा घेऊन तेथे कारवाईसाठी पोहचले आणि फेरीवाल्यांना दमदाटी करुन तेथून हुसकावुन लावण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र तेथे उपस्थित असलेले कश्यप यांनी आपली रास्त मागणी पुढे करत त्यास कडाडून विरोध केला आणि त्यांना आल्या पावली रिकामे परतावे लागले. वीरपाल कश्यप यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात असेही म्हटले आहे की, या गरिबांना असेच रोजगारापासून वंचीत ठेवले तर ते त्यांच्या परिवाराचे उदरभरण करू शकणार नाहीत. केंद्र व राज्य सरकारांनी फेरिवाल्यांच्या उपजीविका संरक्षणासाठी कायदे बनवले असताना जर वसई विरार मनपाच्या सहा. आयुक्त व  अतिक्रमण अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर दादागिरी व मनमानी करू नये असे करणाऱ्या महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आम्ही न्यायालयातून दाद मागु असा इशारा वीरपाल कश्यप यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!