आधुनिकतेची सांगड घालून चालणारे ऋषीतुल्य पत्रकार “मधु उपासनी” ! – योगेश वसंत त्रिवेदी

 मधुकर श्रीधर उपासनी उर्फ मधु उपासनी ! एक अफलातून व्यक्तीमत्व !! माझे वडील श्री. वसंतराव त्रिवेदी यांचे एक घनिष्ठ मित्र. अहो मित्र कसले ? जणू सख्खे भाऊच  म्हणायला हवेत. कारण आहुति परिवार हा मधु उपासनी यांच्या शिवाय पूर्ण होऊच शकणार नाही. बाळकृष्ण भट्ट, जगदीश दामले, विजय वैद्य, रवींद्र वैद्य, प्र. ना. उर्फ बाबा बेटावदकर, वि. प्र. उर्फ अण्णा बेटावदकर, दामुभाई ठक्कर, राजाराम माने ही वसंतराव त्रिवेदी यांची मित्रमंडळी. तसा तोच आहुति चा परिवार. या परिवारातले एक अग्रगण्य नांव म्हणजे मधु उपासनी. मग त्यात शांताराम नाईक, भाऊसाहेब केतकर, काका पाटणकर ही मंडळी पण जोडली गेली. पण मधु उपासनी आणि वसंतराव त्रिवेदी हे ठाणे जिल्हा पत्रकार संघात स. पां. जोशी, नाना पेठे, भय्यासाहेब सहस्रबुद्धे, श्रीकांत नेर्लेकर, अप्पा भडकमकर, गोपाळराव फडके, सलमान माहिमी, राजाराम माने, सदानंद शिवलकर, विजय वैद्य, नरेंद्र बल्लाळ, एस. रामकृष्णन् अशा अनेकांसमवेत सक्रीय कार्यरत असत. पत्रकार संघाच्या कार्यक्रमात ही मंडळी हिरीरीने भाग घेत असत. मधु उपासनी हे जुने जकातघर म्हणजे ओल्ड कस्टम हाऊस येथे जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत होते नायब तहसीलदार या पदावर ते सेवानिवृत्त झाले.

पण लेखन आणि वाचन याचा दांडगा व्यासंग पर्यायाने तेवढाच दांडगा अनुभव यामुळे त्यांना खरेतर पत्रकारिता पूर्णवेळ करायची होती. अर्थात सरकारी सेवेमुळे ते करु शकले नाहीत. पण राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात ते वरिष्ठ पदावर म्हणजेच उपसंचालक, संचालक पदावर काम करुन आता जसं अजय अंबेकर, सुरेश वांदिले आदी टीम लोकराज्य, आपले मंत्रालय आणि अन्य प्रकाशने प्रसिद्ध करताहेत तद्वत मधु उपासनी हे साधारण सत्तर ते ऐंशीच्या दशकात सर्वोत्कृष्ट सेवा बजावू शकले असते पण अंतर्गत राजकारणातल्या अडथळ्यांनी या सर्वोत्तम व्यासंगी व्यक्तीमत्वाला महासंचालनालय पारखे झाले असंच म्हणावे लागेल. असो, पण मधु उपासनी यांनी आपल्या मनात तशी खंत कधी बाळगली नाही. मी माझ्या पत्रकारितेत काम करतांना अपेक्षाभंगाचं दुःख नको म्हणून अपेक्षा बाळगायची नाही कारण शरीराला झालेली जखम बरी होऊ शकते पण मनाला झालेली जखम बरी होऊ शकत नाही आणि अपेक्षाभंगाचं दुःख हे असंच असतं. कदाचित मधु उपासनी यांच्या यशस्वी जीवनाचं हे गमक असू शकेल. भारतीय विद्या भवनात पत्रकारिता अभ्यासक्रम श्री. रा. टिकेकर हे शिकवीत असत हे टिकेकर ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर यांचे काका. या श्री. रा. टिकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मधु उपासनी यांनी पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केले. त्या जोरावर त्यांनी आपला एक जबरदस्त असा ठसा पत्रकारितेत उमटविला. मग सन्मित्र असो, आहुति असो, कोकण सकाळ असो मधु उपासनी सर्वांना आपल्या लेखणीतून साकार झालेल्या आणि समाजोपयोगी अशा लेखांची रसद पुरवीत असत. संस्था, संघटना यांच्या कामात ते अहोरात्र परीश्रम घेत. त्यामुळे धुळ्याहून ठाण्याला आलेले मधु उपासनी हे ठाण्याच्या मो. ह. विद्यालयात स. वि. कुलकर्णी यांचे लाडके विद्यार्थी ठरले आणि याच मो. ह. विद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून मधु उपासनी यांनी माजी विद्यार्थ्यांना विधायक कामासाठी एका माळेत गुंफण्याचे काम केले. गेल्या काही वर्षात समाज माध्यम फार मोठ्या प्रमाणावर फोफावले आहे. फेसबुक, वॉट्सअप, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा विविध प्रकारच्या बाबी आपल्याला या समाज माध्यमातून पहायला मिळतात. जिज्ञासूवृत्तीचे मधु उपासनी मग या समाज माध्यमापासून दूर बरे कसे राहतील ?

१४ जून १९४४ रोजी जन्माला आलेल्या मधु उपासनी यांनी आपल्या वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण केली असली तरी त्यांचा उत्साह हा तरुणांनाही लाजवणारा आहे. ते समाज माध्यमावर अत्यंत सक्रीय असून सकाळी लवकर आपल्याला आपल्या भ्रमणध्वनीवर दैनंदिन पंचांग असो की गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन असो की गीता उपासनी यांचं अध्यात्मावरचं मार्गदर्शन असो नियमित पहायला हमखास मिळतेच. प्रासंगिक प्रतिक्रिया असो की कुणाला कशात यश प्राप्त झाले असो, त्यांना मधु उपासनी यांच्या आशीर्वादाचा लाभ हा मिळणारच. विजय वैद्यांशी गप्पा मारता मारता त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. वसंतराव त्रिवेदी यांचे १० एप्रिल १९९६ रोजी आणि मातोश्री मनोरमा यांचे २० जानेवारी २०१६ रोजी देहावसान झाले. आमच्या प्रत्येक सुखदुःखाच्या प्रसंगात मधु उपासनी धीर देण्यासाठी धावून आले आहेत. गेल्या वर्षी कोकण सकाळ चा वर्धापन दिन होता आणि संपादक राजाराम माने यांनी आवर्जून बोलावले होते त्यावेळी मधु उपासनी यांना बोलावून घेतले आणि ते तिथे आले तेंव्हा तर माने दांपत्याला जो आनंद झाला तो त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असलेला दिसत होता. विजय वैद्य यांच्या प्रत्येक लेखावर मधु उपासनी हे आपली प्रतिक्रिया समाज माध्यमातून माझ्या कडे आणि मग मी वैद्यांकडे द्यायची हा तर नियमित असा एक परिपाठ ठरला आहे. समाज माध्यमातून मधु उपासनी यांनी आपला क्रीयाशील असा  जोपासलेला व्यासंग हा त्यांच्या अप्रत्यक्षपणे वाढलेला एक चांगला परिवार झाला आहे आणि प्रत्येक जण आपली मधु उपासनी यांची कधी भेट होईल यासाठी आतूर झाला आहे. अशा आतूर ‘पत्रकार आणि हितचिंतक’ यांची नांवे घ्यायची झाल्यास जागाच पुरणार नाही. मधुकर श्रीधर उपासनी उर्फ मधुकाका यांना उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य मिळो आणि त्यांचे हे कार्य निर्मळ गंगेच्या पात्राप्रमाणे अखंड चालत राहो, या मनःपूर्वक शुभेच्छा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!