आधुनिक ‛चाणक्य’ देवेंद्र फडणवीस बनले ‛विक्रमवीर’ ! – योगेश वसंत त्रिवेदी

भारतीय जनता पार्टीच्या घटना दुरुस्तीची मुंबई येथील नरीमन पॉईंटवरच्या यशवंतराव चव्हाण केंद्राच्या सभागृहात दोन दिवसांची बैठक होती. २०१३ हे साल होतं. नितीन जयराम गडकरी हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. तर महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष होते सुधीरभाऊ मुनगंटीवार. घटना दुरुस्तीच्या अधिवेशनात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या पदावर असलेल्या व्यक्तीला म्हणजेच नितीनभाऊ गडकरी यांना आणखी एक टर्म वाढवून देण्याची घटना दुरुस्ती मंजूर करण्यात आली. हीच दुरुस्ती प्रदेशाध्यक्षपदालाही लागू करण्यात आली. गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आणखी तीन वर्षे राहणार होते आणि सुधीरभाऊंनाही तीन वर्षे ओघानेच मिळणार होती. नितीन गडकरी यांनी त्यांच्यावर एक कपोलकल्पित आरोप झाल्यानं राजीनामा दिला आणि राजनाथ सिंह यांच्याकडे भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा आली. परंतु महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदावर सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना आणखी तीन वर्षे ठेवण्यास जेष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे यांनी विरोध केला. सुधीरभाऊंनी पक्षश्रेष्ठींना सांगितले की, तुम्ही मला प्रदेशाध्यक्ष पदावर ठेवा किंवा हटवा मी पक्षात एकनिष्ठेने राहीन पण मुंडे साहेबांचा मान राखा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे उत्तराधिकारी म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाचे आमदार देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाची शिफारस केली. मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव सुचविल्यामुळे राजकीय वर्तुळात फडणवीस हे गडकरी गटाचे, पण मुंडे यांनी कसे सुचविले? अशी चर्चा सुरु झाली. अर्थात इथेच देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकीर्दीला कलाटणी मिळाली. देवेंद्र हे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. ना ते गडकरी गटाचे की ना तर  ते मुंडे गटाचे. देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर वर्णी लागली आणि एक वेगळे वातावरण उत्साहात सुरु झाले. मुनगंटीवार आणि फडणवीस दोन्ही विदर्भातले तसेच पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते. त्यामुळे परस्पर सहकार्य, सामंजस्य आणि समन्वयाने कार्य सुरु झाले. तोवर भारतीय जनता पक्षाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा पंतप्रधान पदाचा  उमेदवार म्हणून नरेंद्र दामोदरदास मोदी यांचे नांव निश्चित केले होते. २०१३ ते २०१४ असे वर्षभर गुजरातचा हा धडाकेबाज मुख्यमंत्री प्रचार व प्रसारासाठी संपुर्ण देशभर झंझावात निर्माण करता जाहला. मार्च २०१४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या. महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांनी शिवसेना-भाजपा – रिपब्लिकन पार्टी – शिवसंग्राम – स्वाभिमानी शेतकरी संघटना – राष्ट्रीय समाज पार्टी अशा सहा पक्षांची महायुती तयार करीत रामदास आठवले, राजु शेट्टी, महादेव जानवर व विनायकराव मेटे यांना सोबत घेतले. एकनाथराव खडसे पाटील तेंव्हा विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. नितीन गडकरी यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपद सांभाळले असल्याने ओघानेच केंद्रीय नेतृत्वात गणले जात होते. लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. देशात ५४३ पैकी २८२ जागा भाजपाने पटकावल्या. महाराष्ट्रात ४८ पैकी तब्बल ४२ जागा जिंकल्या होत्या. २६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची शपथ घेणार होते आणि त्यांच्याबरोबर मंत्रीमंडळ पण अस्तित्त्वात येणार होते. गडकरी आणि मुंडे हे केंद्रात मंत्री होणार ही सर्वांनाच अपेक्षा होती. कारण गडकरी आणि मुंडे हे केंद्रात मंत्री होणार ही सर्वांनाच अपेक्षा होती, कारण गडकरी हे नागपुरात तर मुंडे हे बीड मधून जबरदस्त मताधिक्य घेऊन निवडून आले होते. पण २६ मे २०१४ रोजी शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये नितीन गडकरी यांचे नांव होते पण गोपीनाथ मुंडे यांचे नांव नव्हते. गोपीनाथरावांना हे कळताच २०-२२  मे  २०१४ च्या दरम्यान त्यांनी नवे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्ष नेते एकनाथराव खडसे यांना तातडीने नवी दिल्लीत बोलावून घेतले. मुंडे यांचा केंद्रात समावेश होत नसेल तर त्याचा महाराष्ट्रात योग्य संदेश जाणार नाही. मुंडे – फडणवीस – खडसे यांची चर्चा झाली. पण मोदींना सांगणार कोण ? ठरले प्रदेशाध्यक्ष या नात्याने देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदी यांची भेट घेणार ! ठरल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष भावी पंतप्रधान व भाजपा संसदीय पक्षाचे प्रमुख म्हणुन नरेंद्र मोदी यांना भेटले.
    काय कसं काय ? असा नमस्कार चमत्कार झाल्यावर मोदी फडणवीस यांच्यात जो समजला तो संवाद असा झाला.
फडणवीस : नमस्कार मोदी साहेब
मोदी : नमस्कार, बोला !
फडणवीस : मोदी साहेब, मंत्रीमंडळात तुमच्या समवेत गोपीनाथराव मुंडे ह्यांचे नाव असेल असं आम्हाला वाटलं होतं पण त्यांचे नाव नाहीये.
मोदी : हो, खरे आहे, मी त्यांचे नांव केंद्रीय मंत्रीमंडळात घेतलेले नाही.
फडणवीस : आमच्या अपेक्षा होत्या मुंडे साहेब केंद्रा येतील म्हणुन. ते चांगल्या मार्जिनने निवडुन आहेत.
मोदी : हो, अगदी खरं आहे. पण मी मुंडे साहेबांना जाणुनबुजून घेतलेले नाही. कारण त्यांच्यासारखे जेष्ठ नेते मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसवायचे आहेत. दोन दिवसांनी मी पार्लमेंटरी बोर्डाची बैठक बोलावतोय आणि त्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणुन भाजपातर्फे गोपीनाथराव मुंडे यांचे नाव जाहीर करतोय.
फडणवीस : हे चांगलेच आहे. पण
मोदी : पण काय?
फडणवीस : त्यांना जर आता केंद्रात घेतले तर ?
मोदी : हे पहा देवेंद्र, मुंडे साहेबांना आता केंद्रात घेतले तर त्यांचे महाराष्ट्राकडे दुर्लक्ष होईल. मला ते नकोय. मला बाय हुक अँड क्रूक कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात मला भाजपाची सत्ता आणायची आहे.
फडणवीस : आपण म्हणताय ते बरोबर आहे, पण माझं म्हणणं असे आहे.
मोदी : काय?
फडणवीस : आता आपण मुंडे साहेबांना केंद्रात घेऊन त्यांना जे खाते द्याल, त्या खात्यामार्फत येत्या सहा महिन्यात केंद्राचा निधी महाराष्ट्राकडे वळविता येईल आणि त्याचा फायदा आपल्याला सहा महिन्यानंतर होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाला होईल.
मोदी : तुम्ही म्हणताय ते मला पटतंय देवेंद्रजी, आपण तसेच करु.
    देवेंद्र फडणवीस यांचा हा जबरदस्त युक्तीवाद नरेंद्र मोदी यांना पटला आणि नरेंद्र मोदी यांच्या डोक्यात देवेंद्र फडणवीस हे नांवही पक्के बसले. २६ मे २०१४ रोजी गोपीनाथराव मुंडे केंद्रात ग्रामविकास मंत्री झाले.
    देवेंद्र फडणवीस यांच्या योग्य आणि चपखल अशा युक्तीवादामुळे मुंडे केंद्रात मंत्री झाले. भाजपात देवेंद्र फडणवीस यांच्या अभ्यासू आणि वकिलीबाण्याच्या नेत्याची, नेतृत्वाची चुणूक पहायला मिळाली. दुर्दैवाने ३ जून २०१४ रोजी गोपीनाथरावांचा अपघाती मृत्यु झाला आणि सर्व राजकीय समीकरणे महाराष्ट्रासाठी बदलली. ऑक्टोबर २०१४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या. तोवर २५ सप्टेंबर २०१४ रोजी महाराष्ट्रात शिवसेना – भाजपा युती तुटली होती आणि अर्ध्या तासात काँग्रेस – राष्ट्रवादी हे राज्यातल्या सत्तेतले दोन पक्षही आघाडी तोडून स्वतंत्र लढण्यास सिध्द झाले होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षात असलेले भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे दोन पक्ष पहिल्या दोन क्रमांकावर आले होते आणि काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर फेकले गेले होते. भाजपाचे १२३ आमदार निवडून येऊन २८८ विधानसभा सदस्यांमध्ये पहिल्या व सर्वात मोठ्या पक्षाचा मानकरी ठरला. चतुर राजकारणी शरद पवार यांनी न मागता भाजपाला बाहेरुन सरकार बनवण्यासाठी समर्थन देत असल्याचे घोषित केले. भाजपा विधीमंडळ पक्षाच्या नेते पदी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांची एकमताने निवड झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला हिरवा कंदिल दाखविला आणि वानखेडे स्टेडियमवर ऐतिहासिक समारोहात देवेंद्र फडणवीस यांनी ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी महाराष्ट्राच्या बिगर काँग्रेसी अशा भाजपा सरकारचे मुख्यमंत्री म्हणुन शपथ घेतली. २८८ सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी किमान १४५ सदस्य असणे आवश्यक होते. पण देवेंद्र फडणवीस यांनी आपले अल्पमतातले सरकार बहुमतात आणण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील आणि धर्मेंद्र प्रधान या दोन नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चेसाठी धाडले.
भाजपाच्या १२३ सदस्यांना शिवसेनेच्या ६३ आमदारांची मजबुत साथ मिळाली आणि ५ डिसेंबर २०१४ रोजी भाजपा – शिवसेना युतीचे मजबुत सरकार वाटचाल करु लागले. देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे यांच्यात चांगला समन्वय साधला गेला होता. हां हां म्हणता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ४ वर्ष पूर्ण केली. या चार वर्षाच्या काळात १ मे १९६० रोजी स्थापन झालेल्या या महाराष्ट्रात कधी घडल्या नव्हत्या अशा सर्व महत्त्वाच्या घटना घडल्या. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकांची भूमीपुजने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घडवून आणली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी डांगोरा पिटणारे पण प्रत्यक्षात आणु न शकणारे काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या नाकावर टिच्चून महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा 89 लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना लागू केली. आजवर सुमारे ६० लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमाही झाली. जे आजवर कुणी केले नाही ते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केले. नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजना देवेंद्र फडणवीस यांनी पुढे नेण्याचे काम केले. मेक इन इंडिया प्रमाणे मेक इन महाराष्ट्र, प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत १९ लाख ते २० लाख लोकांनां परवडणारी घरे बनविण्यासाठी महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण मंडळाची स्थापना, मेट्रोचे संपुर्ण महाराष्ट्रात जाळे, कोस्टल रोड, मुंबई – नागपुर समृध्दी महामार्ग अशा एक ना अनेक प्रकल्पांची रांग देवेंद्र फडणवीस यांनी उभी केली.
    महाराष्ट्रात आजवर यशवंतराव चव्हाण यांच्यापासुन देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत मुख्यमंत्र्यांची कारकीर्द महाराष्ट्राने पाहिली. यशवंतराव चव्हाण १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. १९६२ साली ते नवी दिल्लीला केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून गेल्यानंतर मारोतराव कन्नमवार मुख्यमंत्री झाले. पण त्यांची कारकीर्द  अल्पायुषी ठरली अल्पकालीन ठरली. त्यानंतर वसंतराव फुलसिंग नाईक हे ५ डिसेंबर १९६३ रोजी मुख्यमंत्री झाले.
२० फेब्रुवारी १९७५ पर्यंत वसंतराव नाईक यांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द ११ वर्ष २ महिने १५ दिवस होती. त्यानंतर अनेक मुख्यमंत्री झाले.
पण विलासराव देशमुख यांनी वसंतराव नाईक यांच्या खालोखाल जास्त काळ मुख्यमंत्री पदावर राहण्याचा ४ वर्षे १ महिना ३ दिवस असा विक्रम केला. पण देवेंद्र फडणवीस या बिगर काँग्रेसी मुख्यमंत्र्यांनी विलासरावांना मागे टाकून ४ वर्ष १ महिना ४ दिवस असा कालावधी पुर्ण करतांना वसंतराव नाईक यांच्या खालोखाल जास्त काळ मुख्यमंत्री पदावर राहण्याचा विक्रम प्रस्थापित केला. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा संपूर्ण वरदहस्त असल्याने देवेंद्र फडणवीस हे आपला पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करतील आणि महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांचा विक्रम सर्वाधिक कालावधी पुर्ण करणारे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून कायम राहील. हे निःसंशय ! देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण असले तरी यशवंतराव चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत अनेक मराठा मुख्यमंत्री होऊनही ते मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत ते देवेंद्र फडणवीस हे मराठी समाजाला आरक्षण देणारे ठरले आहेत.
    समाजाला सोबत घेऊन काम करणारे विक्रमादित्य चाणक्य म्हणून नावलौकीक देवेंद्र फडणवीस यांनी मिळविला असून त्यांच्या शिरपेचात विक्रमी मानाचा तुरा खोवला गेलाआहे. देवेंद्रजी, मनःपूर्वक अभिनंदन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!