‘आपणासाठी आपणच ज्येष्ठांनीच ज्येष्ठांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत’  – डॉ. रोहिणी पटवर्धन

र्वसई (प्रतिनिधी) – बॅसीन कॅथॉलिक बँक पुरस्कृत व लोकसेवा मंडळ आयोजित सहाव्या उपवासकालीन व्याख्यानमालेचे अंतिम पुष्प वाहताना विषय ‘मोठ्ठं व्हायचंय मला’च्या ‘प्रश्न- ज्येष्ठांचे व तरुणांचेही’ ह्या उपविषयावर प्रबोधन करताना वृध्दकल्याण शास्त्र तज्ज्ञ प्राचार्या डॉ. रोहिणी पटवर्धन ह्यांनी वरील उद्गार काढले.

त्या पुढे म्हणाल्या की, ”1 वर्षाच्या मुलापासून ते 90 वर्षांच्या वृध्दाला वाटत असते मोठ्ठं व्हायचंय मला. स्वातंत्र्य मिळाल्याच्या काळात स्त्री-पुरुषांचे सर्वसाधारण वयोमान 45 वर्षांचे होते. तेच आता 68 वर्षे झाले आहे आणि वाढत्या सोयी सुविधांमुळे ते 90 वर्षांपर्यंत पोहोचले आहे. आजपर्यंत निवृत्तीचे वय 60 वर्षे मानले जाते. आता पुढे 30 वर्षे आयुष्य वाढले आहे. त्या वयात आपण काय करायचे, ह्याचे आपण काही नियोजन केले आहे काय? उत्तर आहे- नाही. आपण आपल्यासाठी जगणं अपरिहार्य झालेले असते. आपण विचार केला आहे काय?आपल्या मुलांच्या 25 वर्षानंतर आपली मुलं आपल्या सोबत असतील काय ? तोपर्यंत आपली प्रकृती आपल्याला साथ र्देईल काय? अज्ञानातच जीवन रमते, अज्ञानातच आनंद मानणे हा माणसाचा स्वभावधर्म असल्यामुळे आपण त्याकडे विशेष लक्ष देत नाही. ज्येष्ठांनी आपल्या बदलत्या पुढील काळामध्ये कसे जगायचे ह्याचा विचार केलेला नाही. ज्येष्ठांच्या वाढत्या संख्येमुळे समाजावर काही ओझे झालेले नाही. उलट ज्येष्ठांच्या प्रवास सहली, गुंतवणुकीचे व्यवहार, वैद्यकीय उपचारांसाठी हॉस्पिटल्स, क्लिनिक अशा विविध ठिकाणी उद्योगांना चालना मिळते आहे. तसेच ज्येष्ठांच्या मालमत्तांच्या वाढत्या खटल्यांमुळे वकिली पेशा वाढला आहे. मात्र ह्याची जाणीव ज्येष्ठांना नाही हे दुर्दैव आहे.

ज्येष्ठांनी आयुर्मानानुसार मान-अपमानाकडे दुर्लक्ष केले पाहिजे. आपला मेंदू जाणीवपूर्वक सतेज राहील हे पाहिले पाहिजे. समृध्द जीवनाची संकल्पना अमलात आणावी व आपण आता जगतो आहोत ते कशासाठी? त्या जगण्याचा हेतू काय? मला कशात आनंद मिळेल? आज मी आहे, पण उद्या मी नसलो तर काय? आपण दुसऱ्यांची सुखदु:ख जाणून घेतली पाहिजेत. पण माझी सुखदु:ख दुसरा ऐकून घेर्उल का?आपल्या भावनांशी दुसरा कोणी सहभागी होईल का? हे प्रश्न स्वत:ला विचारले पाहिजेत. तसेच जे काही माझ्याकडे आहे, त्याचा उपयोग करून त्यातून मला आनंद कसा मिळेल हे पाहिले पाहिजे. आपलं मन व्यक्त करता येईल अशा सुविधा उपलब्ध करून घेणे गरजेचे आहे. मनामध्ये कोणाबद्दल नकारात्मक भावना निर्माण होता कामा नये. आपण बेसावधपणे जगतो. त्यामध्ये बेसावधपणे रिमार्क पास करतो. विचारपूर्वक बोलले पाहिजे. विचारपूर्वक प्रश्न केले पाहिजेत. आपण आपल्या मुलाचे वडील असलो आणि आपला मुलगा 60 वर्षांचा झाला तरी आपण त्याचे वडील आहोत ही भावना जपणे टाळावे. उतारवयामध्ये आपल्याला काही भूमिका स्वीकाराव्या लागतात. ती म्हणजे एखाद्याची काळजी घेणे. त्यावेळी सेवा करण्याची जबाबदारी स्त्रियांवरच येते. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ज्येष्ठांनीसुध्दा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर दुसऱ्याची काळजी घेण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आपण आजारी पडलो की जी कोणी व्यक्ती आपली काळजी घेते, त्याच्यासाठी प्रेमाचा एक कोपरा आपल्या हृदयात बाळगला पाहिजे. वृध्दापकाळात वृध्दांनी एकमेकाला प्रेमाची साथ देणे अत्यंत गरजेचे आहे. चढणीवर एक वेळ आधाराची गरज नसली तरी उतरणीवर आधाराची गरज नक्कीच असते ह्याचे भान ठेवावे.

आपल्या भारतीय राज्यघटनेत नमूद केलेला, जगण्याचा अधिकार ह्या संकल्पनेतून आपण आपले कुटुंबीय, आरोग्याबाबत आस्था बाळगणारी मंडळी आणि डॉक्टर यांच्यासाठी आपण वैद्यकीय उच्छापत्र लिहून ठेवू शकता. मी मरणाच्या दारात असेन किंवा गाढ बेशुध्दीत असेन तर माझा मृत्यू लांबवण्याकरिता कृत्रिम साधनांच्या मदतीने मला जगवण्याचा प्रयत्न कृपया करू नये. कारण अशा अवस्थेत आपल्या परावलंबित्वाचं ओझं उतरांवर टाकणं आणि जगत राहणं हे मला कीव करण्यासारखं आणि घृणास्पद वाटतं! अशा प्रकारे केवळ जगवण्यासाठी जर माझ्यावर उपचार सुरू झाले असतील आणि तेही सन्मानाचं जिणं जगण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार नसतील तर मला असं निरर्थक जीवन जगण्याची अजिबात उच्छा नाही. म्हणून हे उपचार ताबडतोब थांबवावेत अशी माझी अंतिम व आग्रहाची विनंती आहे. यानंतर ‘प्रश्न ज्येष्ठांचे व तरुणांचेही’ या विषयावर पत्रकार मधुकर काटकर, माजी आमदार डॉमणिक घोन्सालविस, रोहन घोन्सालविस, थॉमस नुनीस व जेम्स परेरा यांनी प्रश्न विचारले. त्याला डॉ. रोहिणी पटवर्धन यांनी समर्पक उत्तरे दिली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे साहित्यिक रेमंड मच्याडो आणि अध्यक्ष,उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते थॉमस ब्रिटो ह्यांनी वरील विषयावर आपले विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. जोन लोपीस ह्यांनी केले. पाहुण्यांची व वक्त्यांची ओळख संचालक फ्रान्सिस मिस्किटा व आभार प्रदर्शन संचालक लेस्ली डिसिल्वा ह्यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची व उपवासकालीन व्याख्यानमालेची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!