आमची वसई ची “मानव सेवा मोहीम” ! ; १५०० गरजूंना केले साहित्य वाटप

वसई : “आमची वसई” संगठनेने थंडीच्या दिवसांमध्ये पालघर जिल्ह्यातील गरजू व्यक्तींची वस्त्राची मुलभूत गरज भागवण्यासाठी वसईकर जनतेस सर्व वयोगटातील व्यक्तींचे वापरण्यायोग्य कपडे जमा करण्यास आवाहन केले होते. नेहमीप्रमाणे वसई-विरारकरांनी “आमची वसई” च्या मोहिमेस उदंड प्रतिसाद देत भरपूर कपडे, खेळणी, पादत्राणे, चादरी, भांडी  इ “आमाची वसई ” कडे जमा केले.
आमची वसई सभासदांनी जमलेले कपडे वयोगटाप्रमाणे वर्गीकरण केले. वर्गीकरण केल्यावर कपड्यांच्या ३०० मोठ्या गोणी, ५ गोणी खेळण्यांच्या, ५ बॉक्स चॉकलेट-बिस्किट व ३ गोणी पादत्राणांनी भरल्या. हे जमा झालेले साहित्य खर्या अर्थाने गरजू असलेल्या लोकांपर्यंत पोहोचावे हा  “आमची वसई” चा उद्देश्य असतो.
त्यानुसार आमची वसई टीम रविवार दिनांक ९ डिसेंबर रोजी पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात पोहोचली. साहित्य वाटप जव्हार तालुक्यातील अश्या दुर्गम भागात करण्यात आले जे मुख्य रस्त्यापासून १६ किलोमीटर आत होते. २१व्या शतकात वसई/मुंबई पासून हाकेच्या अंतरावर अशी परिस्थिती बघुन फार वाइट वाटले. एकीकडे एकेका राजनेत्याने, व्यापाऱ्याने व सरकारी कर्मचारी/अधिकार्याने कोट्यावधी रुपये दाबून ठेवल्याचे उघड होत आहे तर दुसरीकडे काही कष्टकरी लोक अन्न- वस्त्र , निवार्याच्या मुलभूत सुविधा मिळवण्यासाठी  झटत आहेत.
आजपर्यंत या गावकर्यांना अनेक संस्थांनी फक्त आश्वासने दिली होती पण आजपर्यंत प्रत्यक्षात इतक्या दुर्गम भागात येवून कोणी कधीच मदत केली नाही असे गावकर्यांनी सांगितले. सर्वांनी आमची वसई सभासदांचे उत्साहात व मनापासून स्वागत केले. गावात शहराला व सुशिक्षित लोकांना लाजवेल अशी स्वच्छता व शिस्त बघायला मिळाली. अंदाजे ५०० लहान मुले, ८०० युवक व ३०० वृद्ध लोकांना ” आमची वसई” च्या सभासदांनी कपडे, चादरी, खेळणी, बिस्कीट, पादत्राणे, स्वेटर इत्यादी साहित्य वाटले. गावाची  परिस्थिती व गावकर्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आपण योग्य ठिकाणी साहित्य वाटल्याचे समाधान सभासदांना झाले. वाटप झाल्यावर सगळ्यांनी आमची वसई ला सद्गदित कंठाने व आनंदाश्रूंनी निरोप दिला व पुन्हा येण्याचे आमंत्रण ही दिले.
मोहिम यशस्वी करण्यासाठी असंख्य लोकांचा हातभार लागला. त्यापैकी प्रामुख्याने हर्षद  वर्तक, कुनाल गुप्ता, गौरज पाटील, हर्षल जोगळे, प्रजित पाटील, आनंद नाईक, देवेंद्र कांबरे, पराग तोडणकर, अमेय तावडे, कुलदीप मलिक, दीपक चौधरी, संजय आच्छीपाल्या, विजय जांभेकर, शैलजा जांभेकर, देवेंद्र गुरव, अनिल पाटील, शुभम राऊत, संगिता सुर्वे, मरिअम्मा थेवर, मधुबाला सिंग, हेमराज घरत, जिग्नेश जगताप, मयूर ठाकूर, मनोज मोरे, श्रीकांत जाधव, अनुश्री पै, गौरी जांभेकर, संध्या जतकर, निलेश राउत, धिरज पाटील, ॲड.योगेश दास, समिधा तोडणकर, जितेंद्र मोरघा यांनी कपडे जमा करणे, नियोजित जागी पोहोचवणे व सॉर्टिंग करण्यास मोलाचा हातभार लावला. कपडे साठवण्याची  व्यवस्था करणारे ॲड. देवेंद्र राऊत यांच्या मुळे शक्य झाली, मोहिमे दरम्यान गरमा गरम पिठलं भाकरी चे जवण खाऊ घालणाऱ्या सर्व माता भगिनींचे, टेंपो-बस- वाहन चालकांचे व साहित्य दान करणाऱ्यां सर्वांचे मनापासून धन्यवाद !
टीम आमची वसई या समाजकार्यास हातभार लावणाऱ्या समस्त वसईकरांचे आभार मानते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!