आर्चबिशप एलायस ह्यांचा पदग्रहण सोहळा

वसई : वसईचे सुपुत्र आणि अमरावती धर्मप्रांताचे बिशप एलायस घोन्सालवीस ह्यांची नागपूर सरधर्मप्रांताचे आर्चबिशपम्हणून नियुक्ती झालेली आहे. त्यांचा पदग्रहण सोहळा रविवार 27 जानेवारी 2019 रोजी संध्या 3.30 वा. नागपूर येथे संपन्न होत आहे.

देशातील ख्रिस्ती चर्चचे प्रमुख यावेळी उपस्थित राहणार असून मुंबईचे कार्डिनल ऑजवल्ड ग्रेशस ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या सोहळयासाठी वसई, मुंबई येथून शेकडो भावीक उपस्थित असतील. सहा वर्षापूर्वी फादर एलायस यांची अमरावती धर्मप्रांताच्या बिशपपदी नियुक्ती झालेली होती. पाच जिल्ह्यात विस्तार असलेल्या अमरावती धर्मप्रांतामध्ये चर्च तर्फे शिक्षण, आरोग्य, शेती, समाजसेवा ह्या क्षेत्रात मोलाचं कार्य केलंजात आहे. ह्या सगळया कार्याला दिशा देण्याचं काम बिशप एलायस यांनी अल्पावधीत केलं,त्यासाठी त्यांनी देशभरातील नामवंतांची मदत घेतली. आत्महत्याग्रस्त विदर्भाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चर्च करीत असलेल्या प्रयत्ना मागे ते ठामपणे उभे राहिले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पोप फ्रान्सिस यांनी देशाच्या महत्वाच्या नागपूर सरधर्मप्रांताच्या आर्चबिशप पदी त्यांची नियुक्ती केली.

मुंबई, पुणे, दिल्ली, नागपूर हे ख्रिस्ती चर्चचे महत्वाचे धर्मप्रांत समजले जातात. महाराष्ट्रासह मध्यभारतात विस्तार असलेल्या नागपूरच्या संत चार्ल्स गुरुविद्यालयाच्या कुलगुरुपदी देखील त्यांची नियुक्ती झालेली आहे. याच गुरुविद्यालयातून देशभरातले ख्रिस्ती आध्यात्माचे अभ्यासक संशोधन करीत असतात. वसईच्या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचे विद्यार्थी असलेले फादर एलायस यांनी वसई आणि मुंबई येथे पूर्वी सेवाकार्य केलेले आहे. अतीशय विनम्र स्वभाव,गोरगरीबांबद्दल कणव, नवनवीन शिकण्याची उमेद,सर्वधर्मियाबद्दल आस्था आणि प्रेम असलेले आर्चबिशप घोन्सालवीस हे मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत. नागपूर सरधर्मप्रांताच्या आर्चबिशपपदी झालेली नियुक्ती हा वसईचा प्रथमच बहुमान ठरलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!