आविष्कार मुंबई निर्मित दीर्घांक भूमिकन्या सीता एक प्रयोग अनुभवण्यासारखा – संभाजी सावंत

भूमिकन्या सीता – मामा वरेरकर – आविष्कार – विश्वास सोहोनी – संभाजी सावंत

वसई : वरेरकरानी हे नाटक १९५७ साली लिहिलं. पौराणिक कथेमुळेच हे नाटक अभिजात शैलीतलं आहे, असं नाही; तर त्याचा आशय (किमान ह्या भूमीत तरी) सार्वकालिक आहे. आजची एक सामाजिक जाणीव ह्या नाटकात आहे. चार अंकांचं हे गीतयुक्त नाटक सहा दशकांनंतर विश्वास सोहोनी ह्यानी ‘आविष्कार’च्या मंचावर आणलं आहे. गीतं वगळून दीड तासांची द्विस्तरीय रचना रंगावृत्ती करताना विश्वास सोहोनी ह्यानी मूळ नाटकाची द्विस्तरीय रचना अत्यंत जबाबदारीने सांभाळली आहे. रामायणातील व्यक्तिरेखांचा मनोव्यापार आणि रामायणपश्चात रामायणकर्त्याचा मनोव्यापार, हे दोन्ही स्तर रंगावृत्तीत प्रभावीरित्या मांडले आहेत, हे नाटक पाहाताना जाणवतं. उत्तम रंगभाषा असलेल्या ह्या दीर्घांकी नाटकातून कमालीचं अंतमुर्ख करणारा टोकदार अनुभव देण्यात विश्वास सोहोनी यशस्वी झाले आहेत. अर्थात कलाकारांची सकस कामगिरी सुद्धा तितकीच पूरक आहे. मानसी कुलकर्णी ह्या गेली अनेक वर्षे विश्वास सोहोनींच्या नाटकांतून समांतर रंगभूमीवर लक्ष वेधून घेत आहेत. त्यानी सीतेचं अंतर्मन दर्शविताना ‘संवेदनशील मार्दव’ ते ‘कठोर निर्धार’ हा प्रवास उत्तम केला ! उर्मिला झालेल्या अभिनेत्रीचं ‘फुटवर्क’ आणि शारीर डौल प्रशंसनीय ! सर्वच कलाकारानी नाटक श्रीमंत केलं. सूचक नेपथ्य, लोकमनातील दृढ प्रतिमांनुसार पौराणिक पात्रांना प्रत्यक्ष दाखवणारी रंगभूषा-वेशभूषा, अभिजात शैलीला साजेशा पात्रांच्या हालचाली, आकृतीबंध, अभिनय आणि प्रेक्षकांपर्यंत ठोस पोचणारं नाट्यविधान, हे सारंच उत्तम जमून आलं आहे. माणसाचा ज्ञानसाधनेचा जन्मजात हक्क नाकारून सुविद्य अभिजनांनी यद्वत् शुद्रांवर अन्याय केला, तद्वत् तो वसाहतवाद्यानी मूळ भूमिपुत्राना निर्वासित करून केला. आजही तसं होत आहे, हे शास्वत सत्य ! ह्या नाटकात किंचित उणेपणा जाणवला तो, वाचिक अंगात. काही कलाकारांकडून शब्दांवरील आघातांच्या जागा दुर्लक्षिल्यामुळे काही संवाद निष्प्रभ ठरले. (अनुभवी कलाकाराकडून हे झालं म्हणून खटकलं) ह्या नाटकाची भाषा बोलीभाषा निश्चितच नाही. परंतु ती (अभिजनांची पौराणिक ह्या अर्थाने) अभिजातही नाही. केवळ प्रमाण मराठी भाषा आहे. तरीही वाचिकातील उत्स्फूर्तता आणि सहजता जाणवली नाही. काही प्रयोगांनंतर ती जाणवेल, अशी अपेक्षा करूया.
मात्र विश्वास सोहोनींचं ‘भूमिकन्या सीता’ हे मला आवडलेलं आणि प्रत्येकाने पाहावं असं नाटक आहे. पुराणातील सुपरिचित आणि प्रातःस्मरणीय व्याक्तिरेखांच्या गोष्टीत सर्वसामान्य माणसांच्या जगण्याचे संदर्भ माडणार्या मामा वरेरकराना त्रिवार वंदन आणि त्याच गोष्टीच्या रंगावृत्तीत दिग्दर्शकीय विधान मांडणार्या विश्वास सोहोनी ह्यांचं त्रिवार अभिनंदन !
नुकताच ‘आरती आर्ट अकादमी’ प्रस्तुत सदर नाटकाचा प्रयोग बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात पाहिला. ‘आरती आर्ट अकादमीची’च्या शेकडो रसिक सदस्यांनी प्रयोगाचे कौतुक केले. अशा समांतर नाटकाना लोकाश्रय मिळणे, ही काळाची गरज आहे. पश्चिम उपनगरात ‘आरती आर्ट अकादमी’सारख्याच ‘अवतरण अकादमी’, ‘कलासुगंध’ ‘प्रेरणा थिएटर’, ‘प्रयोग मालाड’ ह्या संस्था समांतर नाट्यधारेत सातत्त्याने कार्य करून प्रायोगिकता वाढीस लावीत आहेत. अशा संस्थांच्या नाट्योपक्रमांना लोकाश्रय हा नाट्यसंस्कृती समृद्ध करणारा असतो.
‘भूमिकन्या सीता’ हे नाटक अवश्य पहा – संभाजी सावंत
संभाजी सावंत यांनी केलेल्या आवाहनाला पालघर जिल्ह्यातील नाट्य संस्था व नाट्य रसिकांनी मनःपूर्वक प्रतिसाद द्यावा आणि हा आगळा नाट्यानुभव घ्यावा अशी विनंती ज्येष्ठ रंगकर्मी व आविष्कार च्या या विशेष नाट्य प्रयोगासाठी पुढाकार घेणारे प्रदीप कबरे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!