उठ शशी, तुला लढावंच लागेल ! – योगेश वसंत त्रिवेदी

“अरे योगेश, काय चाललंय या देशात ? एकटे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय काय करणार ? आपल्या लोकांना काही वाटत कसं नाही ? सर्वकाही सरकारने करायचे, मग आमची काही जबाबदारी आहे की नाही ? आम्ही आमची मानसिकता कधी बदलणार ? हक्काची जाणीव प्रत्येकाला आहे पण कर्तव्याची जाणीव का नाही ?” हे उद्गार, ही प्रश्नांची सरबत्ती आहे अंबरनाथ येथील प्रथितयश वकील शशीकला रामकृष्ण रेवणकर यांची.

२० एप्रिल १९५५ रोजी वेर्णेकर या कारवार जवळच्या सुंकेरी गावच्या सर्वसाधारण कुटुंबात जन्माला आलेली शशी. लहानपणीच रामकृष्ण रेवणकर या युवकाशी विवाहबद्ध होऊन अंबरनाथ येथे आली. बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदरसह कर्नाटकातल्या ८६५ मराठी भाषिक क्षेत्राला महाराष्ट्रात यायचंय. आणि १९५६ सालापासून हा लढा सुरु आहे. पण आमची शशी आधीच महाराष्ट्रात अंबरनाथ येथे आली आणि ती अंबरनाथकर झाली. तसं तिचं गांव जरी सुंकेरी असलं तरी ती महालक्ष्मी करवीर निवासिनी या कोल्हापूरची म्हणून ओळगण्यात येते. लहानपणीच लग्न झाले. शशी आणि रामकृष्ण यांच्या वंशवेलीवर दीपक आणि मनोज ही गोंडस फुलं आली. पण देवाला शशीचं सुख काही पहावलं नाही. रामकृष्ण रेवणकर यांना काळाने हिरावून नेले. शशीचा संसार अर्ध्या वर सोडून रामकृष्णाने इहलोकीची यात्रा संपविल्याने शशीच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. पदरात दोन तान्हुल्यांना घेऊन ती कोहोज खुंटवली भागात राहू लागली. बाप्पा सुळे आणि त्यांचे कुटुंबीय शशीच्या मदतीला धावून आले. बाप्पा सुळे यांची मुलगी लता हिचा शशीबरोबर सावलीसारखा वावर असतो. शशीनं कंबर कसली. एकटी तरणीताठी पोर आणि समाजातल्या वखवखणाऱ्या नजरा यातून अग्निदिव्यातून तावून सुलाखून निघालेल्या शशीनं नववीइयत्तेतून अर्धवट सोडलेलं शिक्षण पूर्ण केलं आणि चक्क वकीलीची परीक्षा उत्तीर्ण झाली. ‘सद्गुरु सारिखा असता पाठिराखा’ या उक्तीप्रमाणे साक्षात धर्मवीर आनंद दिघे शशीच्या पाठीशी भरभक्कम पणे उभे राहिले आणि मग शशीने मागे वळून बघितले नाही. शशीच्या यशस्वीतेची घोडदौड सुरु झाली. मोठा मुलगा दीपक इंजिनिअर झाला आणि धाकट्या मनोजने वंशपरंपरागत सोनाराचा व्यवसाय सुरु केला.

शशी स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि मुलांना पण तिने त्यांचे संसार थाटून दिले. गोरगरिबांच्या अन्याय आणि समस्या पाहून शशीचं ह्रदय पिळवटून जातं आणि मग तिच्यातली अन्यायाविरुद्ध पेटून उठणारी रणरागिणी वकिलीच्या माध्यमातून न्यायालयात जाऊन न्यायासाठी झगडते आणि न्याय मिळवून देण्यासाठी जीवाच्या आकांताने लढा देते. अशावेळी गोरगरिबांच्या न्यायासाठी ती एक पैसाही घेत नाही. मुलुंडच्या बाळकृष्ण जोशी, डोंबिवली चे शशिकांत ठोसर यांचा कायदेविषयक कामात शशीनं मोलाचा सल्ला घेतांना त्यांना शशीनं गुरुस्थानी मानलं. शिवसेना नेते माजी खासदार मधुकरराव सरपोतदार, धर्मवीर आनंद दिघे यांच्यासाठी शशीकला रेवणकर या रणरागिणींने कायद्याच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या मलंगगडाच्या प्रकरणात तर शशीने मला जामीनदार म्हणून कल्याण च्या रेल्वे कोर्टात उभें केले होते. अंबरनाथ नगरपालिके तर्फे शशीकला रेवणकर यांनी अनेक प्रकरणे न्यायालयात लढा देत विजय मिळवून दिला आहे. अंबरनाथ पूर्व येथील शिवमंदिर मार्गावर आज कुणाला विचारले की इथे मारुती चे मंदिर होते, तर मूर्खात काढतील. पण रेल्वे स्टेशन हून काही अंतरावर मारुतीचं मंदिर होतं, ते नगरपालिकेत मुख्याधिकारी सुदामराव गायकवाड असतांना शशीकला रेवणकर यांनी अशा शिताफीने प्रकरण हाताळले आणि मंदिर हटवून रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न लीलया सोडविला.  माझ्या पेक्षा बरोब्बर सहा महिने मोठी असल्याने शशीची माझ्यावर ‘दीदी(दादा)गिरी’ चालते आणि पाठच्या भावाप्रमाणे तिची माझ्यावर निरतिशय ‘माया’ आहे. शशीकला रेवणकर यांच्या न्यायालयीन कामकाजामुळे तसेच त्यांच्या साईभक्तीमुळे त्यांच्या परिचितांचे आणि माझ्या परिचितांचे चांगले संबंध प्रस्थापित झाले आहेत. मग त्यात भाऊसाहेब केतकर महाराज, विजय वैद्य, जयंत करंजवकर, प्रा. नयना रेगे (माझी मानसकन्या), आमची लाडकी जिजाऊ माँसाहेब यांची प्रतिकृती रेखाताई बोऱ्हाडे, डोंबिवली चे साईभक्त रवी पाटील, विधीज्ञ जैमिन व्यास, जुक्तीभाभी व्यास, चित्रा वाघमारे, नागराज होस्केरी, कल्पना पत्की, शायदा अशी असंख्य मंडळी आमच्या परिवारात जोडली. तशा कल्पना पत्की या माझे १९७५ पासूनचे मित्र प्रदीप मसुरेकर यांची नातलग असल्याने आणि अंबरनाथ चे नगराध्यक्ष प्रभाकर नलावडे यांनी डॉ. भुजंगीलाल छाया स्मृती बाह्य रुग्णालय सुरु करतांना पहिले वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. उदय आणि डॉ. कल्पना पत्की या दांपत्यांना अंबरनाथ ला आणल्याने तेंव्हापासून आमचे संबंध होते आणि शशीकला रेवणकर यांच्या मुळे  या नात्यांची वीण घट्ट झाली. चित्राताई या जळगाव येथे न्यायमूर्ती असून त्या शशीसमवेत वाराणसीच्या दौऱ्यावर गेल्या असतांना तेथून परततांना माझ्या घरी येऊन भेटल्या. पारिवारिक संबंध अधिक द्रुढ झाले.

शशीची भगवान शंकरावर प्रचंड श्रद्धा ! या श्रद्धेमुळे ती कैलास मानसरोवरला बऱ्याच वेळा जाऊन आली वाराणसीच्या काशी विश्वनाथ यांच्या दर्शनासाठी तर बहुतेक दर वर्षी शशीचा वाराणसी दौरा ठरलेलाच. वाराणसी येथे महाराष्ट्रातून जाणाऱ्या भाविकांसाठी रहाण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात यावी, यासाठी सुद्धा तिची धडपड सुरु असते. अंबरनाथ येथील बालाजी नगर येथून शिवधाम संकुलात रहायला आल्यावर शशीकला रेवणकर यांनी आपल्या मातोश्री प्रेमाताई वेर्णेकर यांना आपल्या घरी आणले. मातोश्रींच्या अखेरच्या श्वासापर्यंत शशीनं त्यांची अहोरात्र सेवा केली. इतकेच नव्हे तर २ फेब्रुवारी २०१२ रोजी मातोश्रींच्या देहावसानानंतर रुढी, परंपरा यांना बाजूला सारून शशीने स्व. प्रेमाताई यांच्या उत्तरक्रिया स्वतः पार पाडून या आधुनिक काळात नवा पायंडा पाडला. मोठा मुलगा दीपक हा स्वतः च्या पायावर उद्योजक झाला आणि रोटरी क्लब चा अध्यक्ष झाला. याचा आनंद तिला गगनात मावेनासा झाला. अंबरनाथ चे माजी नगराध्यक्ष प्रभाकर विठ्ठल उर्फ दादासाहेब नलावडे हे अंबरनाथ रोटरी क्लब चे १९७० च्या दशकात नेतृत्व करीत होते त्यामुळे ते वार्धक्यामुळे जेंव्हा पुण्याला रहायला गेले तेंव्हा तिथून दादांनी दीपकला शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केले. त्यावेळी ही शशीमाऊलीला गहिवरुन आले. तशी ती अत्यंत भावनाप्रधान आहे. वकीलीची जबाबदारी पार पाडत असतांना कणखर असलेली शशी भावनिक झालेली सुद्धा पहायला मिळते. माझा मुलगा प्रशांत चा विवाह झाला, सुनेच्या रुपाने देवांशी मुलगी बनून घरी आली आणि वेद हा नातू आमच्या कुटुंबात आला, याचे शशीला प्रचंड कौतुक. अंबरनाथहून ९ मे १९९७ रोजी मी बोरीवली येथे वास्तव्यास आलो, पण दोन दिवस जर संपर्क झाला नाही तर, “काय रे बाळा ? रागावलास ?” असे म्हणून लटक्या रागाने झापायलाही कमी करत नाही. आहुति, त्रिवेदी परिवार यांचा शशीकला रेवणकर हा एक अविभाज्य घटक आहे. प्रशांत असलेकरांनी शशीच्या जीवनावर कादंबरी लिहिली आहे. ती मूर्तस्वरुपात लवकर येवो, म्हणजे समाजाला एक चांगले मार्गदर्शन होऊ शकेल.

शशीकला रेवणकर हा खरोखरीच एक कादंबरी चा विषय असून त्यांचे जीवन हा नव्या पिढीसमोर निश्चितच आदर्श उभा करु शकेल. सध्याच्या परिस्थितीत सुद्धा शशीनं विजय वैद्य, नयना आणि रेखा यांची आपुलकीने चौकशी केली. काळजी घ्या, असा मायेचा सल्लाही दिला. शशी सध्या विमनस्क मनःस्थितीत आहे, यातून तिला बाहेर पडावेच लागेल. गोरगरिबांच्या न्याय्य हक्कांसाठी शशी, उठ शशी अनेक नामवंत विधीज्ञ लोकांच्या रांगेत जाऊन तुला मिळालेल्या नावलौकिकात आणखी भर घालावीच लागेल. नानी पालखीवाला, हरीश साळवे यांच्या पासून तर प्रभाकर हेगडे, सलामतराय पुरुस्वानी पर्यंत दिग्गज कायदेपंडित तुला खुणावत आहेत. उठ, शशी उठ, मरगळ झटकून, पदर खोचून कंबर कसून कामाला लाग. हा हिंदुस्थान आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या महाराष्ट्रात गोरगरीब जनतेला तुझ्या सच्च्या न्याय मिळवून देणाऱ्या विधीज्ञाची गरज आहे. करवीर निवासिनी आई जगदंबा, काशीविश्वेश्वरा या आमच्या शशीला उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य दे आणि तिच्या हातून असहाय्य, गोरगरिबांना न्याय मिळो, हीच मनोकामना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!