उद्धवजी, तुम्ही सुद्धा ! – जयंत करंजवकर

अर्थसंकल्प हा सर्वस्पर्शी असला तरी  सर्वसामान्यांचा तो क्लिष्ट विषय आहे. पेट्रोल, डिझेल, इंकम टॅक्स, सेल्स टॅक्स, शेतकऱ्यांसाठी बी बियाणे, खत सवलती, नोकरदारांच्या वेतनावरील कर निर्बंध एवढे विषय सामान्य जनतेशी निगडित असतात, उर्वरित विषय हे राज्य व राष्ट्रीय पातळीवरचे असल्याने ते यातील मुद्द्यावर विचार करण्याचे टाळतात. असले विषय अर्थतज्ञ, उद्योगपती, उच्चभ्रू आणि अर्थविषयक अभ्यासकांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर स्वतःचे मत मांडावेत एवढी माफक अशी अपेक्षा सर्वसामान्य करत असतात. त्यामुळे अर्थसंकल्प व त्यातील शब्दच्छल याचा ते नेहमीच काडीमोड घेत असतात. तरीही आजच्या समाजमाध्यमामुळे ज्ञानार्जन मोठ्या प्रमाणात होत असले तरी अर्थसंकल्प विषयाला मर्यादित बगल दिली जाते. डोक्याला ताप नको, हाच दृष्टीकोन समोर ठेवून अर्थसंकल्प समजून घेण्याच्या भानगडीत सर्वसामान्य जनता दूर राहण्यातच धन्यता मानते. मात्र माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सामान्य जनतेला कळावे म्हणून ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे पुस्तक लिहिले. त्याचे प्रकाशन बुधवारी विधिमंडळाच्या मुख्य सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.
अर्ध शिकलेल्या लोकांना अर्थसंकल्प समजण्यास अनेक अडचणी असल्याने ते ‘अर्थसंकल्प वंचित’ गटात मोडतात. परंतु जे स्वतःला सुशिक्षित व विचातवंत समजतात ते ‘अर्थसंकल्प परिसंवाद’ कार्यक्रमास आवर्जून जातात. सुप्रसिद्ध अर्थतज्ञ नानी पालखीवाला यांचे अर्थसंकल्पावरील विचार ऐकण्यास अभ्यासक जात. परंतु अशा प्रसंगी कोणीही मंत्री, राजकीय नेते उपस्थित असल्याचे आठवत नाही. ही आपल्या राजकीय नेत्यांची विचारसरणी व वर्तणूक असल्याचे अनेक वेळा आढळून येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे पुस्तक लिहून सर्वसामान्यांची तसेच राजकीय नेत्यांची चिंता दूर केली. या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाच्या प्रसंगी  मुख्यमंत्री ठाकरे, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी त्या पुस्तकातील संदर्भाबद्दल उल्लेख केला नाही.  ज्यांच्या हातात राज्य कारभार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, ते जर अर्थसंकल्प विषयी बोलण्याचे टाळून वेगळ्याच विषयाला प्राधान्य देऊन अर्थसंकल्प विषयी त्यांची असलेली अनास्था दाखविण्यातच धन्यता मानानासर असतील तर राज्यातील राजकीय संस्कृती उध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार त्या पुस्तकाविषयी चार शब्द बोलतील असे वाटले होते. पण होळी सणाच्या अगोदर एकमेकांवर कुरघोडी आणि शब्दांच्या कोट्या करत अर्थसंकल्प विषयी ते किती गंभीर नाहीत हे दाखवून दिले. देवेंद्र फडणवीस यांच्यात साहित्यिकाचे गुण असून त्यांनी राजकारण सोडून पुढील दहा वर्षे असेच लिखाण करत राहावे अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. येत्या दहा वर्षांत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार राज्यकारभार करणार असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी यापुढे पुस्तके लिहिण्यात समाधान मानावे, असे संकेत श्री. ठाकरे यांनी दिले. श्री. देवेंद्र फडणवीस यांना यावेळी काय वाटले असेल याचा सारासार विचारही  सर्वश्री ठाकरे, नाना पटोले व अजित पवार यांनी केला नाही. मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाषणात तर कहरच केला. मोठ्या आदराने श्री. फडणवीस यांनी श्री. ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन घडवून आणि  देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहून प्रकाशन सोहळा कार्यक्रम दुसऱ्याच्या खर्चांने कसा करावा हे तुमच्यासारख्या (फडणवीस) शिकण्यासारखे आहे. म्हणजे जेवणाच्यावेळी आलेल्या पाहुण्याला जेवणाच्यावेळी कसं हजर राहायचं हे तुमच्याकडून शिकण्यासारखे आहे, असंच उद्धवजीना सुचवाव्याचे होते आणि अमृता फडणवीस यांनी केलेल्या टीकेची वसुली करण्याचा त्यांचा प्रयत्न हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. त्यांच्यातील विनम्रता व विनयशीलतेत बदल होत असल्याचे हे लक्षण आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण सोडून लेखक व्हायला हरकत नाही. तेवढेच आम्हाला शांतपणे जगता येईल. त्यांनी दिल्लीत जावे अर्थात तसे झाल्यास सर्वात जास्त आनंद हा सुधीर मुनगंटीवार यांना होईल, असे बेभान वक्तव्य अर्थमंत्री अजित पवार यांनी केले. परंतु काकाला फसवून सकाळी पहाटे  फडणवीस यांचाच हात पकडून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. हे मात्र ते सोयीस्कर विसरतात. राजकारण्यांच्या लेखी तारतम्यतेला सोडचिठ्ठी दिलेली असते, त्याच हे उत्तम उदाहरण आहे. तर विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी तर  फडणवीस यांची कामगिरी विरोधी बाकांवर जास्त खुलत असल्याने त्यांनी दीर्घकाळ विरोधी पक्ष नेतेपदावर राहावे असा सल्ला दिला. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे अशा शेलक्या मारून भाजपामध्ये असताना झालेला अपमान ठाकरे यांनी चुकता केला.
प्रत्येक वक्त्याने प्रकाशन कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांची येथेच्छ धुलाई करण्याचे काम केले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांची मात्र अभिमन्यूसारखी अवस्था झाली. महाराष्ट्राच्या राजकारणात यशवंतराव चव्हाण यांच्यापासून जी सभ्यता होती ती आता उरली नाही. त्यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांचा नेहमीच आदर करण्यावर लक्ष असायचे, आता विरोधी पक्षाला लक्ष्य केले जात आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला धक्का बसण्यास सुरवात झाली आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी विधानसभा केंद्रीय ग्रंथालयातील विविध नेत्यांची भाषणे वाचावी आणि गरज भासल्यास ग्रंथालय प्रमुख बाबा वाघमारे यांची मदत घ्यावी, असे सुचवावेसे वाटते. महाराष्ट्राची राजकीय संस्कृतीला कुठे आहोटी लागली आहे, ती थांबण्यास बाबा वाघमारे यांची मदत मोलाची ठरेल.

जयंत करंजवकर (ज्येष्ठ पत्रकार व स्तंभ लेखक/८३६९६९६६३९/jayant.s.karanjavkar@gmail.com/)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!