उपसंचालक रेड्डींच्या सेवेचा ठराव ९५ विरुध्द ४ ने मंजुर

वसई (वार्ताहर) : महापालिकेतील निलंबीत उपसंचालक रेड्डी यांच्या बाजुने ९५ विरुध्द ४ अशा मताने ठराव मंजुर करण्यात आल्यामुळे त्यांच्या सेवेचा आता मार्ग मोकळा झाला आहे.

सिडकोतून प्रतिनियुक्तीवर वसई-विरार महापालिकेत आलेले वाय.एस.रेड्डी यांच्यावर नगररचना विभागाच्या उपसंचालक पदाची महत्वपुर्ण जबाबदारी सोपवण्यात आली होती.त्यांच्या कार्यकालात झालेल्या बांधकांमाची माहिती नगरसेवक धनंजय गावडे यांनी मागितल्यामुळे रेड्डी यांनी गावडे यांना 25 लाखांची लाच देऊ केली होती.ही लाच देताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते.त्यानंतर रेड्डी यांना सिजकोने निलंबीत केले होते.मात्र,हे निलंबन बेकायदेशिर असल्याचे नमुद करून रेड्डी यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती.त्यावर रेड्डी हे महापालिकेच्या सेवेत असल्यामुळे सिडकोने केलेली कारवाई न्यायालयाने बेकायदेशिर ठरवून त्यांचे निलंबन रद्द केले होते.

त्यामुळे रेड्डी यांचा चेंडु महापालिकेच्या कोर्टात आला होता.त्यानुसार हे प्रकरण पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी महासभेत ठेवले होते.रेड्डी यांना सेवेत घेण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला होता.या प्रस्तावाला चार विरोधक नगरसेवकांनी विरोध केला.मात्र,सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या ९५ नगरसेवकांनी रेड्डी यांना ग्रीन सिग्नल दिला.त्यामुळे हा ठराव ९५ विरुध्द ४ अशा मतांनी मंजुर करण्यात आला.

रेड्डी यांना पुन्हा सेवेत घेवु नये आणि त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करावी.अशी मागणी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी केली होती.तरिही रेड्डी यांना बहुमताच्या जोरावर बेकायदेशिर रित्या पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे.महापालिका आयुक्तांनी त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना सेवेत घेण्याचा ठराव मांडून रेड्डींच्या कृत्याला समर्थन दिले आहे.त्यामुळे याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्यात येणार असल्याचे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!