उल्टा ‘चोर’ ‘चौकीदार’ को डांटे ! मोदींवरचा विश्वास शतगुणित झाल्याने भाजपामध्ये `इनकमिंग’ जोरात !! -योगेश वसंत त्रिवेदी

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी मुंबईच्या नगरसेवकांना पूर्वी नगरपिते म्हणत असताना 3`नगरसेवक’ संबोधण्याची सूचना केली. शहरातला लोकप्रतिनिधी हा नागरिकांचा सेवक असतो म्हणून प्रभागातून निवडून आलेले हे नगरसेवक संबोधण्यात येऊ लागले. हाच धागा थेट भारताच्या पंतप्रधानपदापर्यंत नरेंद्र मोदी यांनी नेला आणि मी पंतप्रधान/प्रधानमंत्री नव्हे तर `प्रधानसेवक’ आहे, असे विनम्रपणे नमूद केले. पण एकदा डोळ्यांवर पिवळ्या रंगाचा चष्मा घातला की सर्व पिवळंच दिसणार ! तसेच भारतातल्या विरोधी पक्षांचे झाले आहे. विशेषतः काँग्रेस पक्षाचे झाले असल्याचे दिसुन येत आहे. ऐतिहासिक वारसा मिरवणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांबद्दल काय बोलणार ? या राष्ट्रीय अध्यक्षांपासून जाणत्या राजांपर्यंत साऱ्यांना मोदी विरोधाची कावीळ झाली आहे आणि हे सारे जण सरबरीत असल्यासारखे वागू लागले आहेत. आता त्यात राजीव राहुलच्या सल्लागार पित्रोदांपर्यंत भर पडली आहे. अभ्यास नसला, माहिती नसली आणि समयसुचकतेचा, समंजसपणाचा, समनवयाचा अभाव असला की वरच्या राष्ट्रीय अध्यक्षांपासून खालच्या प्रवक्त्यांपर्यंत वाट्टेल ते बोलत असतात आणि मग ते आपले हसे करुन घेत असतात. एकदा एका प्रदेशाध्यक्षाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती पुण्यतिथी याची माहिती नसतांना आपल्या अकलेचे तारे तोडण्याचे वृत्त आले होते. बरे ! लोकमान्य टिळक हे काँग्रेसचे अध्यक्ष होते याचीही माहिती यांना आहे का? एका प्रवक्त्यानेतर जिवंत / हयात असलेल्या सर्वश्रेष्ठ अभिनेत्याला श्रध्दांजली वाहण्याचा प्रताप केला. इतकेच काय तर कुख्यात ओसामा बिन लादेनला `ओसामाजी’ म्हणून संबोधून आपली संस्कृती दाखवून दिली असल्याचेही सांगण्यात येते. तद्वतच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मसुदजी म्हणायला धजावले. राफेल घोटाळ्याच्या नावाने बोंबाबोंब  करतांना आपण कुणाच्या विरोधात बोललो याचेही भान राहिले नाही. ज्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव घेऊन, ज्यानी भारताला संविधान दिले त्या संविधानाच्या माध्यमातून घटनात्मक पद असलेल्या पंतप्रधानपदाची शपथ घेऊन भारताचे राज्यशकट… हाकणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्यावर ज्या खालच्या पातळीवर एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष टीका करतो तेव्हा त्या राष्ट्रीय अध्यक्षाची कीव करावीशी वाटते. आपण एखादी टीका करताना आपल्या देशाची प्रतिमा जगात मलीन होईल, आपल्या देशाचे शत्रू आपल्यादेशाबद्दल विखारीपणाने बोलताना आपल्याच वक्तव्याचा आधार घेतील याचे साधे भान या राष्ट्रीय अध्यक्षाला असू नये ? पुलवामाच्या घटनेनंतर बालाकोटवर आपल्या वायुसेनेने हल्ला चढवला आणि अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले. मसूद अझरचे भाऊ आणि मेव्हणा यांना यमसदनी धाबले ज्या  वीर विंग कमांडर अभिनंदन वर्धमानने बहादुरीचे दर्शन साऱ्या जगाला घडवले. या पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या भारतीय लष्कराचे कौतुक तर सोडून द्या पण एअर स्ट्राईकचे पुरावे मागताय? आपल्या लष्कर प्रमुखाने सणसणित उत्तर देतांना हल्ला करतांना ‘आम्ही आमचे काम करतो, मुडदे मोजण्याचे काम आमचे नव्हे’ अशी चपराक लगावली. पण सतत चपराक खाणाऱ्या आणि कोणताही विधिनिषेध न बाळगणाऱ्यांना त्याचे काय ?   
भारतीय लष्कर देशाचे संरक्षण करीत असते, डोळ्यात तेल घालून सीमेवर जवान रक्षण करीत असतात, म्हणून आपण शांतपणे झोप घेऊ शकतो. पण या लष्करावरच शंका घेण्याचे महापाप विरोधक करताहेत? अरे कुठे फेडाल ही पापं ? नरेंद्र मोदी यांनी आपण देशाच्या 125/130 कोटी जनतेचे चौकीदार असुन डोळ्यात तेल घालून आपण देशातल्या नागरीकांच्या हिताचे रक्षण करतो असे म्हटले आणि विरोधकांची कोल्हेकुई सुरु झाली. राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या सर्व जाहीर सभांमधून `चौकीदार चोर है।’ च्या घोषणा देऊ लागले. हे बोलताना आपण देशातल्या कोट्यवधी चौकीदार, सुरक्षा रक्षकांचा अपमान करीत आहोत हे ही यांच्या ध्यानी मनी नाही ? प्रत्येक सहकारी, गृहनिर्माण संस्था, बँका अशा सर्वच व्यवस्थापनांकडे सुरक्षा रक्षक असतो. त्यालाच `चौकीदार’ म्हणतात. त्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी स्वतःला देशाचा चौकीदार म्हणून संबोधणे हा देशातल्या समस्त सुरक्षा रक्षकांचा सन्मान, बहुमानच केला आहे. या नरेंद्र मोदी यांना ज्यांनी जगात सर्वत्र भारताची प्रतिमा उंचावली असतांना `चौकीदार चोर है’ अशा पध्दतीने टीका करुन काँग्रेसवाल्यांनी या देशातल्या तमाम सुरक्षा रक्षकांचा अपमानच केला आहे. त्यामुळे देशातले सुरक्षा रक्षक काँग्रेसवर अत्यंत संतप्त झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या सुमारे पंचवीस लाख सुरक्षा रक्षक / चौकीदार यांच्याशी एकाच वेळी संवाद साधला आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या. मैं भी चौकीदार या मोहिमे अंतर्गत या पंचवीस लाख चौकीदारांशी संवाद साधतांना काँग्रेसवाल्यांच्या चुकीबद्दल स्वतः पंतप्रधानांनी या सुरक्षा रक्षकांची माफी मागितली. जगभरातील सर्व भाषेतील लोकांना आता चौकीदार या शब्दाचा अर्थ माहित झाला आहे. त्यांनी मनापासून हा शब्द स्वीकारला आहे. गेल्या काही दिवसापासुन तुम्हा लोकांचीच चर्चा देशात सुरु आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जुन नमूद केले. दूरदर्शन, खाजगी दूरचित्रवाहिन्या, समाजमाध्यमे, भारत देश असो वा परदेशात सर्वत्र प्रत्येक  भारतीय आपल्याला ‘मै भी चौकीदार’ असे म्हणून अभिमानाने हा शब्द मिरवीत आहे. शाळेत विद्यार्थ्यांना शिकविणारा शिक्षक हा शाळेचा चौकीदार, दवाखान्यात रुग्णांना तपासून त्यांना बरे करणारा डॉक्टर हा आरोग्य सेवेचा चौकीदार, घरातला कुटुंबप्रमुख हा घराचा चौकीदार अशा पध्दतीने या देशातला प्रत्येकजणच चौकीदाराच्या भुमिकेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचवीस लाख सुरक्षा रक्षक चौकीदारांशी संवाद साधताना प्रत्येकाला इतका अभिमान वाटत आणि जाणवत होता की सर्वांमधली उच्चनीचतेची दरी संपुष्टात आली होती, भेदभाव संपून सारे एकत्रच पअसल्याची भावना वाढीला लागली होती. यावेळी पंतप्रधानांनी चांगल्या गोष्टी सांगताना विरोधकांचा सणसणित समाचारही  घेतला आणि एअर स्ट्राईकचे पुरावे मागणारे हे पाकिस्तानची भाषा बोलताहेत, त्यांना हे माहित नाही की यांची देशाच्या लष्कर व पंतप्रधानांवरची टीका हा पाकिस्तानात सर्व वृत्तपत्रे, प्रसार माध्यमात महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. टीका जरुर करा पण ती टीका विधायक असली पाहिजे. माझ्यावर टीका करा, शिव्या द्या, माझ्या व्यक्तिगत टीकेचा मी अवश्य स्वीकार करीन पण देशाच्या एकात्मतेवरचा हल्ला, देशाच्या सुरक्षेशी तडजोड कदापि स्वीकारणार नाही, खपवून घेणार नाही, आप मुझे गाली जरुर दो, हरेक गाली का मै मेरा गहना समझके स्वीकार करुंगा, मला दिलेली प्रत्येक शिवी ही माझा अलंकार म्हणून समजेन असे जेव्हा नरेंद्र मोदी बोलतात तेव्हा त्यांची अध्यात्मिक बैठक किती पक्की आहे, याचेच प्रत्यंतर आपल्याला येते. आपल्या ज्ञानेश्वर, तुकारामांपासूनच्या संत परंपरेतून आपल्याला हेच दिसून आले आहे. जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमुद केले. पण चौकीदार चोर है म्हणणाऱ्यांनी स्वतःकडे ढुंकून पाहण्याची गरज आहे. 15 लाख मिले क्या ? असे विचारणाऱ्या राहुल गांधी-प्रियंका गांधींपासून तळागाळातल्या काँग्रेसी नेत्यांना याची माहिती आहे का ? विदेशी बँकांतला काळा पैसा भारताकडे आला की 15/15 लाख प्रत्येकाला मिळतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 सालीच ठणकावून सांगितले होते. आणि काळा पैसा परत आणण्याची प्रक्रिया सुरु केली. पण अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या होणाऱ्यांना काय सांगणार ? डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी नँशनल हेरॉल्ड प्रकरणी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेतून भ्रष्टाचाऱ्यांचा बुरखा टराटरा फाडण्यात आला असुन या प्रकरणात जामिनावर असलेल्यांनी `चौकीदार चोर है’ म्हणणे म्हणजे `उल्टा चोर चौकीदार को डांटे’ असेच म्हणावे लागेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. वरपासून खालपर्यंत भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्यांनी `चौकीदार चोर है’ म्हणणे म्हणजे स्वतःचं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पहावं वाकुन अशीच गत म्हणावी लागेल. संपूर्ण यंत्रणा पक्ष एका कुटुंबासाठी वेठीस धरणाऱ्यांनी नरेंद्र मोदींवर टीका करणे हे हास्यास्पद आहे. ज्या नरेंद्र मोदी यांनी आपला स्वतःचा प्रपंच नवी दिल्लीतल्या आपल्या निवासस्थानी थाटलेला नाही. मातोश्री `हिरा बा’ सुध्दा स्वतंत्र राहतात आणि जो देशातल्या 130 कोटी नागरिकांच्या कुटुंबाला सुख, समृध्दी देण्यासाठी 20/20 तास अहोरात्र झटतो. एअर स्ट्राईकच्या वेळी पहाटे 2.30, 3.30, 5.30 वाजता डोळ्यात तेल घालून लष्कर प्रमुख, संरक्षण मंत्री, गृहमंत्र्यांशी, सुरक्षा सल्लागारांशी देशाच्या सुरक्षित भवितव्याबाबत चर्चा करतो त्याच्यावर टीका करुन `चौकीदार चोर है’ असे म्हणणाऱ्यांना ईश्वर सुध्दा माफ करणार नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 2014 चा विक्रम मोडून पुन्हा देशाचे नेतृत्व मोदी करणार ही खात्री पटल्यानेच विरोधकांच्या पायाखालची वाळु सरकू लागली आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास शतगुणीत होत असल्याने आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे यांची युती अभेद्य झाल्याने महाराष्ट्रातील आणि देशातील विरोधी पक्षातल्या दिग्गजांनी भाजपा शिवसेनेत प्रवेश केला. मतदान, मतमोजणी आणि निकाल आता केवळ उपचार म्हणून शिल्लक राहिल्याचे जाणत्या राजापासून मायावतीपर्यंत साऱ्यांना पटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!