ऊसगाव हे श्रमजीवीचे  विद्यापीठ ! – विवेक पंडित

वसई : ” समाजातील शोषित-वंचित-अन्यायपीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्त्यांची  फौज निर्माण करणारे ऊसगाव हे  श्रमजीवींचे विद्यापीठ असून या विद्यापीठातून तयार झालेले कार्यकर्ते समाजातील शोषित व दुर्बल घटकांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम मोठ्या जोमाने करतील.” असा विश्वास  श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्य शासनाच्या आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे  अध्यक्ष विवेक पंडित यांनी संघटक प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी व्यक्त केला.    

स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही घटनेने दिलेल्या मुलभूत हक्कांपासून वंचित असणाऱ्या समाजाला मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी व त्यांना त्यांचे न्याय्य  हक्क मिळवून देण्यासाठी श्रमजीवी संघटना  गेल्या ३६ वर्षापासून महाराष्ट्रात काम करीत आहे. श्रमजीवी वंचितांचे प्रश्न सोडविण्यासाठी  संघटनेला नेहमीच कार्यकर्त्यांची गरज भासत असते. या गरजेतून श्रमजीवी संघटनेचे संस्थापक यांच्या पुढाकारातून स्थानिक नेतृत्व विकसित करून  प्रशिक्षित कार्यकर्ते घडविण्यासाठी गेल्या तीन महिन्यापासून ऊसगावच्या साने गुरुजी प्रशिक्षण संकुलात सलग प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या सहअध्ययन स्वरूपाच्या संघटक प्रशिक्षण शिबीर साखळीतील शेवटचे तिसरे शिबीर नुकतेच ऊसगावमध्ये संपन्न झाले. या शिबिरांतून ४०० सक्रीय कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून हे कार्यकर्ते आता समाज बदलाच्या कामासाठी सज्ज झाले आहेत.

या शिबिरातून राज्यघटना, पोलीस विषयक कायदे, जमीन विषयक प्रश्न, भारतीय स्वातंत्र्याचा लढा व स्वतंत्र्यपूर्व चळवळी , विज्ञान, ग्रामपंचायत व पेसा कायदा , संघटना बांधणी , नेतृत्व कौशल्य, इ. विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून संघटनेचे संस्थापक मान. विवेक पंडित, विविध विभागातील शासकीय अधिकारी, संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, जनरल सेक्रेटरी श्री. बाळाराम भोईर, विजय जाधव, पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेन्जड, जिल्हा सरचिटणीस  राजेश चन्ने, दशरथ भालके, उल्हास भानुशाली, रुपेश डोळे, कैलास तुंबडा,गणेश उंबरसाडा,  महिला विभागाच्या संगीता भोमटे , जया  पारधी  इ. नी काम पाहीले. तर प्रशिक्षणाच्या शेवटी या सर्व विषयांवर प्रशिक्षणार्थींची लेखी परीक्षा घेण्यात आली. परीक्षक म्हणून जेष्ठ पत्रकार मान. रामकृष्णन , मान. शरद पाटील यांचेसह संघटनेचे प्रदिप खैरकर, किसन चौरे , जया पारधी , उल्हास भानुशाली, रुपेश डोळे , कैलास तुमडा , महेश धांगडा, पुजा सुरूम , ममता परेड यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!