ऍक्सिस बँकेच्या वसईतील २५ ग्राहकांची गाजियाबादेतून लूट

वसई (प्रतिनिधी) : ऍक्सिस बँकेच्या वसईतील पंचवीस ग्राहकांच्या खात्यातील लाखो रुपये गाजियाबाद एटीएम मधून हडप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

वसईच्या पश्चिमेकडील ऍक्सिस बँकेच्या शाखेतील ग्राहकांना त्यांच्या खात्यातून रक्कम काढण्यात आल्याचे मेसेज आले. सदर रक्कम गाजियाबाद येथील ए.टी.एम मधून काढण्यात आल्याचे समजल्यावर सर्व ग्राहकांनी बँकेच्या शाखेत धाव घेतली. त्यावेळी एकूण २५ जणांची अशा प्रकारे फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. ३८ हजार, ४० हजार, १ लाख १० हजार, २१ हजार, १२ हजार असे सरासरी ४० हजार रुपये २५ जणांच्या खात्यातून हडप करण्यात आले आहेत. तर कोणाच्या खात्यातून सव्वा लाख रुपये काढण्यात आले आहेत.या सर्वांनी बँकेच्या व्यवस्थापकाला धारेवर धरले त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे या ग्राहकांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र तक्रार न नोंदवता त्यांना सायबर सेल कडे जाण्याचा सल्ला पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिला.

 

 

ऍक्सिस बँकेच्या एकाच शाखेतील २५ जणांच्या खात्यातून आणि गाजियाबाद येथील एकाच एटीएम मधून पैसे हडप करण्यात आल्यामुळे ग्राहकांनी बँकेच्या व्यवस्थापनावर संशय व्यक्त केला आहे. बँकेतील एखादी व्यक्ती गुन्हेगारांच्या संपर्कात असावे आणि त्यांनीच आमच्या अकाउंट ची माहिती दिली असेल असा संशय या खातेदारांनी व्यक्त केला आहे.तसेच आमची गेलेली रक्कम पुन्हा खात्यात जमा करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. फसवणूक झालेल्या ग्राहकांमध्ये राहुल सेहगल, तनाज पटेल, अमित पाडवी यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: