ऍड.नोएल डाबरे यांनी ‘मायाजाल’ मधून प्रभावीपणे शब्दबद्ध केले आहे – ज्येष्ठ वकील ऍड. उदय वारुंजीकर

वसई, दि.१ (वार्ताहर) : न्यायालयीन व्यवहारातील आणि प्रकरणातील वेदना वकीलांनाही जाणवत असतात. वेदना ही साहित्य निर्मितीचे बीज असते. या आणि समाजातील अन्य क्षेत्रातील अश्या वेदना, तसेच जाणवणारी विसंगती आणि अनुभवलेले वास्तव ऍड.नोएल डाबरे यांनी आपल्या ‘मायाजाल’ या पुस्तकातून प्रभावीपणे शब्दबद्ध केले आहे. गेल्या १५ वर्षातील वसईतील स्थित्यतराचे प्रतिबिंबच ‘मायाजाल’मध्ये उमटले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र आणि गोवा बार कॉन्सिलचे सदस्य, तथा मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील ऍड.उदय वारुंजीकर यांनी वसईत केले. 
वसईतील जेष्ठ वकील, तथा ‘बार असोशिएशन ऑफ वसई’चे अध्यक्ष ऍड.नोएल डाबरे यांच्या ‘मायाजाल’ या पहिल्या लेखसंग्रहाचे प्रकाशन शनिवारी सायंकाळी  मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील ऍड. उदय वारुंजीकर यांच्या हस्ते पापडी येथील टी.बी. कॉलेज सभागृहात संपन्न झाले. यावेळी पुण्याचे बिशप थॉमस डाबरे, माजी खासदार बळीराम जाधव, माजी आमदार डॉमणिक घोन्सालविस, सिस्टर मारिया स्क्रिमिन, जिल्हा काँग्रेसचे नेते विकास वर्तक,डॉ.संतोष पिल्लई, जनआंदोलन समितीच्या डॉमनिका डाबरे, शिवसेनेचे कमळाकर पाटील, भाजपचे शेखर धुरी, स्वाध्याय परिवाराचे छगन नाईक, को.म.सा.प वसईचे अध्यक्ष अनिलराज रोकडे, ज्येष्ठ वकील ऍड.दिगंबर देसाई, डॉ.ओमप्रकाश दुबे, डॉ.जोजेफ डिसोजा, विजय डाबरे यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

वसईतील सामाजिक संघर्ष, चळवळीतून आलेले अनुभव, तसेच परिवर्तनाचे लढे वेग-वेगळ्या लेखांमधून चित्रित करण्याचे काम एक संवेदनशील लेखक म्हणून वकील ऍड नोएल डाबरे यांनी यशस्वीपणे केले असल्याचेही ऍड.वारुंजीकर यावेळी म्हणाले.

लोकशाही सशक्त होणसाठी मतदान विचाराने झाले पाहिजे झेंड्याचा रंग बघून होता कामा नये, असे मत प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष आमदार बच्चु कडु यांनी यावेळी अध्यक्षीय भाषण करताना व्यक्त केले. आ.कडु यांनी सद्यस्थितीतील राजकारणाबाबत चिंता व्यक्त केली.राजकारणा प्रमाणेच मतदारांचीही पातळी घसरली आहे. यथा प्रजा तथा राजा अशी उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. मतदारांची भिती नेत्यांना राहिली नाही.आमदार पंचतारांकित हॉटेलात राहतो आणि त्याला निवडून देणारा मतदार आपल्याच झोपडीतील भिंतीखाली दबून मरतो. बाळाला पेटीत ठेवायला पैसे नसल्या मुळे माता त्याच हॉस्पीटल मध्ये आत्महत्या करते. जितके लोक काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या गोळ्यानी मरत नाहीत, तितके शेतकरी आत्महत्या करून जीवन संपवतात.
तत्व, विचार संपले आहेत. चांगले लिहिल्या जाते, बोलल्या जाते आणि ते वाचल्या-ऐकल्याही जाते पण तशी कृती मात्र होत नाही, अशी खंत आ.कडु यांनी यावेळी व्यक्त केली.
अभागी अशील, सामान्यांचे दुःख, कुष्ठरोग्यांची वेदना, गरिबांचे अश्रू आणि प्रशासनातील दिरंगाई अश्या अनेक विषयातून विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचा तात्कालिक प्रयत्न ‘मायाजाल’ मधून करण्यात आला असल्याचे,  पुण्याचे बिशप डॉ. थॉमस डाबरे यांनी यावेळी सांगितले.
पर्यावरणाची जगातील पहिली चळवळ वसईतून सुरु झाली. वसईतील ‘हरित वसई’ चळवळी मुळेच फा.फ्रान्सिस दिब्रिटो यांना अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या अध्क्षपदाचा सन्मान मिळाला, असे स्पष्ट करून ऍड. नोएल डाबरे पुढे म्हणाले, वसईतील परिवर्तनाच्या संघर्षात जमेल तसे आपण योगदान देत आलो, त्यातूनच निर्माण झालेल्या विचारांचा आणि अनुभवाचा धांडोळा शब्दबद्ध करीत राहिलो.त्यास आज पुस्तकाचे स्वरूप लाभल्याचे समाधान वाटते. ऍड.डाबरे यांनी पुस्तकाच्या विक्रीतून आलेले ५० हजार रुपये आ.बच्चु कडु यांना त्यांच्या वंचितांसाठी सुरु असलेल्या कार्यासाठी देणगी म्हणून प्रदान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड.अजय कोरिया यांनी तर सुत्रसंचालन ऍड.धनंजय चव्हाण यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: