एका झंझावाताची गोष्ट ! – संजय डहाळे

तेंडुलकरांचं नाटक म्हणजे एखाद्या रंगकर्मीसाठी नाटकाची कार्यशाळाच….. तेंडुलकरांचे संवाद, त्यातले छुपे स्तर अचूक पकडणं हे दिग्दर्शकीय दृष्टीनंही मोठं आव्हान…. पण एका तरुण नाटकवेड्यानं हे आव्हान नुसतं स्वीकारलंच नाही, तर आपल्या दमदार आवाजावर आणि दिग्दर्शनातील हुकूमतीवर एका सुंदर नाटकाचं सोनं केलं….. नाटक होतं मित्राची गोष्ट आणि तो अभिनेता – दिग्दर्शक होता विनय आपटे….. शब्दफेक, आवाज आणि अभिनय या त्रिसूत्रीच्या जोरावर विनय आपटेंनी या नाटकातला तरल आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आणि आपल्या चतुरस्त्र प्रतिभेची चुणूक दाखवून दिली….. विनय आपटे…. रंगभूमी, टीव्ही आणि चित्रपट या तिन्ही क्षेत्रांत समर्थपणे वावरलेलं एक ज्वलंत वादळ….. १७ जून १९५१ या दिवशी जन्म घेतलेल्या या वादळानं आपल्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत स्वतःचं ध्रुवपद स्वतःच्या हिंमतीवर मिळवलं आणि आजन्म सांभाळलं. विद्यार्थीदशेतच राज्य नाट्य स्पर्धेच्या “मॅन विदाऊट शॅडो” या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण करणारा हा हरहुन्नरी कलाकार त्या नाटकाच्या नावाप्रमाणेच कोणत्याही सावलीचा आधार न घेता स्वच्छंदपणे रंगभूमीवर रुजला,बागडला आणि बहरला. अभिनेता, दिग्दर्शक, पुढे ‘गणरंग’ संस्थेच्या माध्यमातून नाट्यनिर्माता आणि टेलिव्हिजनच्या प्रांगणातला एक सतत नावीन्याचा ध्यास घेतलेला सृजनशील कलावंत अशा विविध ओळखींमधून विनय आपटे हे नाव गाजत राहिलं. आवाजाची निसर्गदत्त देणगी, अत्यंत उठावदार व्यक्तिमत्व, अभिनयाची थक्क करायला लावणारी झेप आणि दिग्दर्शनातील अजोड प्रतिभा यांतून मराठी मनोरंजन क्षेत्रात विनय आपटे नावाचा झंझावात जवळजवळ चार दशकं फिरत होता….. तेंडुलकरांपासून ते आत्ताच्या प्रदीप दळवींपर्यंत अनेकांच्या उत्कृष्ट संहितांना हा परिसस्पर्श लाभला….. मित्राची गोष्ट, अँटिगनपासून रानभुल, डॅडी आय लव्ह यू, तुमचा मुलगा करतो काय?, कबड्डी कबड्डी अशा अनेकविध नाटकांमधून, खबरदार, लालबाग परळ, धमाल, कॉर्पोरेट, टार्गेट, इट्स ब्रेकींग न्यूज, चांदनी बार, एक चालिस की लास्ट लोकल अशा अनेक मराठी – हिंदी चित्रपटांमधून आणि एका लग्नाची दुसरी गोष्ट, दुर्वा, वहिनीसाहेब, आभाळमाया, अशा मालिकांमधून विनय आपटेंनी आपली चमक दाखवून दिली….. कुसुम मनोहर लेले किंवा नथुरामसारख्या नाटकांचे हजारो प्रयोग होऊनही हाऊसफुलचा बोर्ड शेवटच्या प्रयोगापर्यंत झळकत राहिला, याचं श्रेय अर्थातच विनय आपटेंच्या संवेदनशील आणि समर्थ दिग्दर्शनाला जातंच…. असा हा झंझावात ‘७ डिसेंबर २०१३’ ह्या दिवशी शांत झाला….. पण आजही त्यांचा आवाज रंगमंचावरच्या अंधारात घुमत राहातो….. पुन्हा पुन्हा म्हणत राहातो, “मी विनय आपटे बोलतोय…”
अशा ह्या चित्रपट, रंगभूमी, आकाशवाणी किंवा दूरचित्रवाणी माध्यम प्रत्येक ठिकाणी आपला वेगळा ठसा आणि ओळख निर्माण केलेल्या, भारदस्त आवाजाची देणगी लाभलेल्या अभिनेत्याला, मानाचा मुजरा.

संजय डहाळे 9820355603 (लेखक ज्येष्ठ नाट्य समीक्षक आहेत.)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!