ऐतिहासिक वसई किल्ल्यातील इतिहास प्रसिद्ध सर्वच शिलालेख विद्रुप व नामशेष

पुरातत्व विभागाचे मौन

वसई : पुरातत्व विभागाची सोयीची नियमावली व पुरातत्वीय नियमावलीचा प्रत्यक्षात न होणारा वापर यामुळे ऐतिहासिक जंजिरे वसई किल्ल्यातील इतिहास प्रसिद्ध १५० हुन अधिक शिलालेख कायमस्वरूपी नामशेष व विद्रुप झालेले आहेत. जंजिरे वसई किल्ल्यातील जोसेफ ख्रिस्तमंदिर, फ्रान्सिसस्कन ख्रिस्तमंदिर, गोंसालो गार्सीया ख्रिस्तमंदिर यात सर्व मिळून किमान १५० हुन अधिक पोर्तुगीज कालखंडातील महत्वाचे व तारखावार शिलालेख आहेत. यातील बरेच शिलालेख पोर्तुगीज अंमलातील असून त्यात पोर्तुगीज अधिकारी, सेनानी, जलवर्दी सैनिक, दानशूर महिला  इत्यादी बाबत माहिती उपलब्ध होते. केंद्रीय पुरातत्व विभागाने यातील बहुतेक ख्रिस्तमंदिराचे जतनीकरणाच्या नावाखाली नूतनीकरण केल्याने काही शिलालेख चक्क रेतीच्या ढिगाऱ्याखाली तर काही मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले आहेत. यातच किल्ल्यातील फ्रान्सिसस्कन ख्रिस्तमंदिरातील १२५ हुन अधिक शिलालेख निव्वळ सातत्याने होणाऱ्या चित्रपट छायाचित्रण व विनापरवाना अश्लील प्रि वेडिंग यामुळे सपशेल पायदळी तुडवले जात आहेत. किल्ल्यातील बहुतेक वास्तूंच्या अंतर्गत भागात हिंदी मराठी चित्रपटांचे चित्रीकरण करताना सर्व साहित्य व नाच बैठका चक्क शिलालेखांवर केल्या जात असल्याने ऐतिहासिक शिलालेखातील मजकूर व शिळा पार उध्वस्त करण्यात येतात. पुरातत्व विभाग निव्वळ आर्थिक गणिते साधत सायन मुख्य कार्यालयातून लेखी परवानगी देत असल्याचे अनेकदा स्पष्ट झालेले आहे, कारण किल्ल्यातील बेबंद व पुरातत्वीय नियमावली जुगारून देणाऱ्या छायाचित्रणाच्या प्रसंगी एकही जबाबदार पुरातत्वीय अधिकारी उपस्थित नसतो. चित्रपट माध्यमातून प्रसारित होणारे दृश्य पाहून किल्ल्यातील विनापरवाना प्रि वेडिंग छायाचित्रण यास अधिक जोर चढत आहे. किल्ल्यातील फ्रान्सिसस्कन ख्रिस्तमंदिराच्या सभामंडपातील शिलालेखांवर खुद्द पुरातत्व विभागानेच मातीचा ढिगारा टाकला आहे. गेल्या किमान १०० वर्षात जंजिरे वसई किल्ल्यातील ऐतिहासिक शिलालेखांच्या संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाने एकही उपाययोजना केलेली नाही. पुरातत्वीय दृष्टीकोन व नियमावली ही निव्वळ कागदोपत्री असून जंजिरे वसई किल्ल्यातील सर्वच शिलालेख मानवी अतिक्रमण, ऊन, पाऊस, वारा इत्यादींचा सातत्याने प्रभाव सोसत भुईसपाट झालेले आहेत. सद्या वाढत्या क्रिकेटच्या प्रभावाने ऐतिहासिक फ्रान्सिसस्कन ख्रिस्तमंदिर व जोसेफ ख्रिस्तमंदिरात चक्क फुटबॉल, क्रिकेटचे सामने सुरू आहेत. एकंदरीत स्थिती पाहता वसईच्या किल्ल्यातील पोर्तुगीजकालीन शिलालेख केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाऱ्यावर सोडलेले आहेत. वसई पर्यटनाची स्वप्ने दाखवणारे किल्ल्यातील भुईसपाट व उध्वस्त शिलालेखच दाखवणार का ? असा प्रश्न इतिहास अभ्यासकांना पडला आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी किल्ले वसई मोहीम परिवार अंतर्गत १ मे रोजी जंजिरे वसई किल्ल्यातील शिलालेख संवर्धनासाठी पुढाकार घेण्यात आलेला होता पण पुरातत्व विभागाच्या अनास्थेमुळे सदर मोहिमेस योग्य पाठबळ उपलब्ध झाले नाही.

युवा शक्ती प्रतिष्ठान पालघरचे प्रमुख श्री प्रशांत सातवी यांच्या मते “ऐतिहासिक जंजिरे वसई किल्ला व त्यातील शेकडो इतिहाससंपन्न शिलालेख जतनीकरणाबाबत पुरातत्व विभाग स्पष्टपणे निष्क्रिय ठरलेले असून किल्ल्यातील इतिहास संदर्भ नामशेष झाल्यावर निव्वळ वास्तूंचे सांगाडे पाहण्यास मिळणार असे दिसते.”

किल्ले वसई मोहीम परिवारचे इतिहास अभ्यासक श्री श्रीदत्त राऊत यांच्या मते “सद्या अभ्यासकांचा बराचसा वेळ पुरातत्व विभागाची नेमकी नियमावली काय व कोणासाठी ? यातच अधिक खर्ची होत असल्याने भुईसपाट होणाऱ्या ऐतिहासिक शिलालेखांबाबत पुरातत्व विभागाचे आगामी धोरण काय असेल हे निश्चित सांगता येत नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!