ऐतिहासिक वस्तूंच्या संग्रहातील विज्ञान प्रमेयाचे प्रदर्शन दालन मार्गदर्शक ठरले – शिशुमंदिर शिक्षण संस्था

विरार (वार्ताहर) : दिनांक १८ फेब्रुवारी २०२० मंगळवार रोजी शिशुमंदिर शिक्षण संस्थेचे विद्यानिकेतन (विरार पश्चिम) शाळेत शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून ऐतिहासिक वस्तु संग्रहाचे प्रदर्शन भरविण्यात आलेले होते. मोडी लिपी अभ्यासक व दुर्गमित्र प्रतिनिधी दिव्या वराडकर मुंबई यांच्या बहुमोल संग्रहातील वस्तू व त्यातील विज्ञान गणिते समजून घेण्याची अनमोल संधी यानिमित्ताने उपस्थित विद्यार्थी, शिक्षक वर्ग व मान्यवरांना उपलब्ध झाली.

सकाळी ११ ते ४ या वेळेत झालेल्या या मार्गदर्शनपर ऐतिहासिक वस्तू संग्रह प्रदर्शनात विविध जुन्या वस्तू व त्यामागील विज्ञान प्रमेय, गणिते यावर दिव्या ताई वराडकर यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर उपक्रमात जुनी भांडी, कुलुपे, नाणी, मोडी पत्रे, वजन मापे, लाकडी चिपळया, दिवे, अडकित्ते, खलबत्ते इत्यादी ३० हुन अधिक वस्तू मांडण्यात आलेल्या होत्या. महाराष्ट्रातील गडकोटांची भटकंती वरील मार्गदर्शक लेख व मोडी लिपी प्रशिक्षण मार्गदर्शन क्षेत्रात सक्रिय कार्यरत असणाऱ्या दिव्या ताई यांनी मार्गदर्शनपर व्याख्यानात ऐतिहासिक वस्तूंकडे पाहण्याची दृष्टी, त्यामागील विज्ञान, येणाऱ्या काळातील इतिहास दृष्टीने महत्त्व इत्यादी विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.

शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे दिव्या ताईचे सदर प्रदर्शन उपक्रम पहिलाच होता. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात हिरा विद्यालय विरार येथील विद्यार्थी व शिक्षकांनी प्रदर्शनास भेट दिली. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात शिक्षिका वर्ग व दिव्या ताई यांनी विद्यार्थी वर्गासोबत शिवस्मरण प्रार्थना घेतली. शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांना ऐतिहासिक संदर्भ व त्याकाळात उपयोगात आणलेल्या वस्तू यामागील वैज्ञानिक प्रमेय सोप्या पध्दतीने कळावी हा मुख्य उद्देश होता. सदर उपक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रश्मी चौधरी, शिक्षिका कु मोनिका घरत, सौ नंदिनी चाफे, सौ सुवर्णा पितळे, सौ हिमाली राऊत सक्रिय योगदान दिले. शिक्षण संस्थेचे कार्यवाहक जयप्रकाश चौधरी, संस्थेचे सदस्य दीपक राऊत, सौ.सुरेखा वर्तक यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थी मित्रांनी विविध ऐतिहासिक व्यक्तींच्या वेशभूषा सादर केल्या.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.रश्मी चौधरी यांच्या मते ‘विद्यार्थी मित्रांनी इतिहासाची मार्गदर्शनपर ओळख व्हावी व ऐतिहासिक वस्तूंचे महत्व कळावे या उद्देशाने सदर प्रदर्शन मार्गदर्शक ठरले.’

मोडी लिपी अभ्यासक दिव्या ताई वराडकर यांच्या मते ‘शालेय शिक्षिका वर्ग, मुख्याध्यापिका, संस्था प्रतिनिधी यांनी दिलेल्या संधीमुळे सदर उपक्रम विद्यार्थी वर्गापर्यंत पोहोचवणे शक्य झाले.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!