ऑनलाइन, ऑफलाईन परवानगीचे वसई प्रांत अधिकाऱ्यांचे अधिकार काढल्याने नाराजी !

# प्रवास परवान्यांचे धोरण पूर्ववत करण्याची मागणी
# परराज्यांत वसईतून अकरा ट्रेन रवाना, तर आज चार सुटणार !

वसई (वार्ताहर) : राज्य आणि परराज्यात जाऊ इच्छिणाऱ्या कामगार, मजूर अथवा अन्य नागरिकांना खासगी वाहने, तसेच बस, रेल्वेच्या प्रवासासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाईन पद्धतीने परवानगी देण्याचे प्रांत अधिकाऱ्यांचे अधिकार काढून ते अचानक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे घेण्यात आल्याने वसई-विरार मधील प्रवास उच्छुक नागरिकांनी वसई तहसील आणि प्रांत अधिकारी 

कार्यालयात गर्दी करून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी वसईतून परराज्यांत आठ ट्रेन सोडण्यात आल्या असून, काल आणखी तीन ट्रेन रवाना करण्यात आल्या. तर आज दिवसभरात चार आणि पुढील टप्प्यात आणखी चार ट्रेन, तसेच एका राज्यात १५ बसेस पाठविण्याची प्रक्रिया सुरु आहे.
गेली दोन आठवडे वसईचे प्रांत अधिकारी स्वप्नील तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर आणि तहसीलदार किरण सुरवसे यांनी अत्यावश्यकता आणि गरजेनुसार हजारो खाजगी वाहनधारकांना तात्काळ परवानग्या देऊ करून विविध कारणांनी अडकलेल्या प्रवाश्यांची सोय केली. या काळात उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे पाच, तर गोरखपूर येथे एक, तसेच राजस्थान येथे शिकर आणि फालना अश्या दोन मिळून एकूण आठ विशेष श्रमिक ट्रेन आणि तीन बसेस सोडण्यात आल्या आहेत.
काल दिवसभरात उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे दोन आणि बनारस येथे एक अश्या प्रतीक्षेत असलेल्या तीन श्रमिक ट्रेन वसईतून रवाना झाल्या. यासाठी संपूर्ण महसूल विभाग, महापालिकेचा आरोग्य विभाग आणि वसई पोलीस विभागाने दिवस-रात्र सपाटून काम केले. या मजुरांना जातांना पाण्याची बॉटल, जेवणाचा डबा आणि मास्क विरारच्या जीवदानी देवी मंदिर ट्रस्ट आणि साईधाम मंदिर ट्रस्ट यांनी पुरविले.
आज दिवसभरात गोरखपूर येथे एक व जौनपूर येथे दोन, तर उत्तराखंड येथील बदोई येथे एक अश्या एकूण चार ट्रेन वसईतून सोडण्यात येणार असून, त्यातील प्रवाश्याच्या याद्या आधीच अंतिम झाल्या आहेत. त्यामुळे ज्या प्रवाश्यांना भ्रमणध्वनीवर शासनाचा संदेश येईल, त्यांनीच केवळ सनसीटी मैदानावर तयारीनिशी यायचे आहे, असे आवाहन प्रांत अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी केले आहे.
मात्र दि.१७ मे पासून वसई तहसील आणि प्रांत अधिकारी कार्यालयाचे प्रवासाच्या परवानग्या देण्याचे अधिकार काढून घेतल्याने वसई विरार मधील हजारो प्रवाश्यांची नाराजी व्यक्त केली आहे. आधीची http://c19trformpalghar.webstag.net/ ही साईट बंद करण्यात येऊन, आता जिल्हाधिकारी कार्यालयाशी संलग्न असलेल्या http://covid19.mhpolice.in या साईट वर प्रवासासाठी आणि अन्य परवानग्यांसाठी collecterpalghar@gmail.com या मेलवर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे असून, ऑनलाइन प्रक्रिया किचकट असल्याने ऑफलाईन पद्धतच मोठ्या प्रमाणांत उपयोगी ठरत आली आहे. गेले २-३ दिवस वसई तहसील परिसरात गर्दी करीत असलेल्या गोंधळलेल्या शेकडो प्रवाश्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या या बदलांवर तीव्र नाराजी व्यक्त करून, ही सुविधा पूर्ववत करण्याची मागणी केल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुनील नवघरे यांनी सांगितले. 
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे गेल्या दोन -तीन दिवसांत मोठया प्रमाणांत गेलेल्या प्रवाश्यामुळे तेथील जिल्हा प्रशासनाने हरकत नोंदवल्याने परवानगी देण्याच्या धोरणात तात्पुरता बदल करण्यात आला आहे. खाजगी प्रवाश्यांच्या प्रलंबित अर्जांवर सर्वांनाच ई पास देण्यात आले असून, बाहेरील प्रवाश्यानाही गावी पाठविण्याची प्रक्रिया वेगात सुरु आहे. पालघर येथून उत्तर प्रदेशातील सहा शहरांसाठी काल तीन आणि आज तीन अश्या सहा ट्रेन सोडण्यात येत आहेत. – किरण महाजन,उप –जिल्हाधिकारी, पालघर 
प्रवाश्यांना प्रवासासाठी आता जिल्हाधिकारी कार्यालयातून परवानगी मिळेल. बिहार, ओरिसा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश येथील श्रमिक वर्गांसाठी अकरा रेल्वे गाड्या, तसेच मध्य प्रदेश येथे १५ बसेस सोडण्यासाठी त्या राज्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यानुसार वसईतून काल तीन ट्रेन रवाना झाल्या असून, आज चार आणि पुढील टप्प्यात बाहेरील राज्यांच्या मान्यतेशिवाय उपलबद्धतेनुसार ट्रेन आणि बस सोडण्यात येतील. – स्वप्नील तांगडे 
प्रांत अधिकारी,तथा उपविभागीय दंडाधिकारी, वसई 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!