कवितेचे बाळसं की सूज म्हणून चर्चा करणे हे कवीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यासारखे – सुप्रसिध्द कवी अरूण म्हात्रे

उस्मानाबाद (प्रतिनिधी) : सोशल मीडिया सारख्या प्रवाही आणि प्रसारी माध्यमातून उथळपणे होणाऱ्या कविता लेखनाच्या वापरामुळे आणि वृत्तपत्रातून केवळ पानपूरक दृष्ठीने कवितेकडे पाहून दिल्या जाणाऱ्या सहज प्रसिध्दीमुळेकविता वाड.मय प्रकाराचे मोठे नुकसान केले असून, प्रसिध्दीच्या हव्यासातून, तसेच मिरवण्याचा प्रवृत्तीतून वारेमाप कविता आणि कवींची निर्मिती होत गेल्याचे सुप्रसिध्द कवी अरुण म्हात्रे यांनी मान्य करतांनाच, मात्र ‘आजचे भरमसाठ कवितालेखन : बाळसं की सूज’ असा परिसंवाद घेणे म्हणजेकवीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यासारखे असल्याचा आरोप त्यांनी येथे केला आहे.

शुक्रवार पासून येथे सुरु असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आज दुसऱ्या दिवशी झालेल्या’आजचे भरमसाठ कवितालेखन : बाळसं की सूज’ या विषयावरील परिसंवादात म्हात्रे बोलत होते. माजी संमेलनाध्यक्ष अक्षयकुमार काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या यापरिसंवादात डॉ.कैलास अंभुरे, डॉ.समिता जाधव, श्रीकांत पाटील व श्रीमती सीमा शेटे-रोटे यांनी अतिशय अभ्यासू आणि महत्वाची निरीक्षणे नोंदवत हा परिसंवाद रंगतदार केला.

कवी अरुण म्हात्रे पुढे म्हणाले, ”पंढरीच्या लाखो भक्तांच्या सहभागाने निघणाऱ्या वारीचे जसे तरुण की म्हातारी? सूज की बाळसे? असे मूल्यमापन करता येणार नाही, तसेच कवी आणि रसिकांतील कवितेचा होणारा संवाद हा भक्तिभावासारखाच आहे. कविता येते तशी येऊ द्या, चालेल तशी चालू द्या. टाकाऊ असेल तर ते टिकणार नाही, रसिकांचा तो अधिकार आहे. त्यांना त्यांचं ठरवू द्या. नवकवींनी लिहिलेली कविता आहे कि नाही? हे त्यांना आधी सांगा. किती नवकवी आणि कवितांचे मूल्यमापन आपण करतो?” असा सवालही म्हात्रे यांनी यावेळी समीक्षकांना केला.

आजची भरमसाठ निर्माण होणारी कविता ही सूज असल्याचे सांगून, डॉ.समिता जाधव यावेळी म्हणाल्या, ”सृजनशीलता आणि बौध्दिकता एकत्र आल्यावर कसदार कविता जन्म घेते. मात्र आजचा नवकवी आणि नवे काव्य लेखन हे उथळ स्वरूपाचं असून ते अल्पजीवी आणि मिरवून घेण्यापुरतं केलं जातं. या उलट श्रीमती सीमा शेटे-रोटे यांनी नवकवींच्या बाजूने सूर आळवला. त्यांनी आजचे काव्यलेखन हे बाळसं असल्याचे स्पष्ट करतांना सांगितले की, या लेखनामुळे नवी पिढी सततच्या लेखनातून नव्या शब्दांद्वारे मराठी भाषेशी जोडून आहे.त्यांची कविता बाळसेदार होण्यासाठी वाचक आणि समीक्षकांनी पुढाकार घेतला पाहिजे.”

श्रीकांत पाटील यांनीही आजची कविता बाळसेदार असल्याचे ठाम मत मांडून, ”नवकवींच्या या कवितेकडे मानव्य दृष्टिकोनातून पाहण्याची गरजप्रतिपादित केली. छंदाच्या आणि वृत्ताच्या जोखडातून मुक्त झाल्याने कवितेची मोठी निर्मिती होत असल्याचे दिसते.ती जर सूज असेल तर त्यावर चिकित्सा, परीक्षणातून योग्य मार्गदर्शन आणि संस्कारातून उपचार होऊ शकेन.”

यावेळी डॉ.कैलास अंभुरे यांनी मात्र आजची कविता नेमकी सूज किंवा बाळसं? असं काही स्पष्ट मत न नोंदवता आजचा कवी आणि नवकवितेच्या विद्यमान अवस्तेचे त्यांनी अभ्यासपूर्ण विेषण आपल्या भाषणात केले. ते म्हणाले, मुक्त शैलीमुळे कविता सहज आणि सोपी झाली असली तरी कवीने भान आणि भूमिका घेणे गरजेचे आहे.कवी भाषा जिवंत ठेवतात. कवितेचा सुज किंवा बाळसं असा निष्कर्ष न काढता ते वेळेला ठरवू द्या, थोडा संयम बाळगा.

आजच्या व्यक्त झालेल्या मत-मतांतरामधून आणि एकंदरीतही कविता नेमकी सूज किंवा बाळसं? अश्या निष्कर्ष पर्यंत पोहचण्याची आवश्यकता वाटत नसल्याचे सांगून, आपल्या अध्यक्षीय समारोपात अक्षयकुमार काळे म्हणाले की, ”कवितेकडे सहानुभूतीने जरूर पाहिले पाहिजे, पण कवितेचे आज फुटलेले पेव लक्षात घेऊन या कवितेच्या अवस्थेचा अंतर्मुख होऊन विचार होणे सुध्दा गरजेचे आहे.काव्यलतिकेवर आज कृत्रिम कागदी फुले आल्याने तिला गंध राहिला नाही. आघात आणि साक्षात्कारातून चांगली कविता जन्म घेते. कवींनी अनुभवांना अनुभूतीची जोड देणे गरजेचे आहे.”

सूत्रसंचालन डॉ.रुपेशकुमार जावळे यांनी तर आभारप्रदर्शन गजानन चौगुले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!