कामगारांनीच एसटी वाचवण्याच्या लढ्याला व्यापक स्वरूप द्यावे – विवेक पंडित

वसई (वार्ताहर) : जोपर्यंत महाराष्ट्रात गोरगरीब जनता आहे तोपर्यंत एसटी ची बससेवा चालूच राहिल कारण की, ती राज्याची जीवनवाहिनी आहे. एसटी ही प्रवाशांच्या सेवेसाठी चालते, नफ़ा कमावणे उद्देश्य नव्हता. मात्र एसटी महामंडळ तोट्यात जाण्याला सरकारची धोरणेच जबाबदार आहेत. 

एसटी तर्फे ज्या वेगवेगळ्या सवलती दिल्या जातात त्याचा परतावा शासनाकडून मिळत नसल्याने आणि कंत्राटदार धार्जिण्या धोरणामुळे एसटी तोट्यात गेली असे उद्गार आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पंडित ह्यांनी १ जून २०१९ रोजी वसई येथे एसटी कामगार संघटनेतर्फे आयोजित एसटी च्या ७१ व्या वर्धापनदिन सोहळ्यात बोलताना काढले. यावेळी विवेक पंडित यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाल्याबद्दल कविवर्य सायमन मार्टिन व भरत पेंढारी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 
विवेक पंडित त्यांच्या भाषणात म्हणाले की, सामान्य माणसाला जगायचे असेल तर खाजगी करणावि पेटून उठलेच पाहिजे. एसटी राज्याच्या  कानाकोपऱ्यात जात असते. म्हणून कामगारांनीच जनतेचं प्रबोधन करुन एसटी वाचवण्याच्या लढ्याला व्यापक स्वरूप द्यावे. सरकारच्या कामगारविरोधी धोरणावर बोलताना कामगार नेते भरत पेंढारी म्हणाले की, कामगारांना उध्वस्त करुन कुठलेही राज्य प्रगति करू शकत नाही, कष्टकरीच देश घडवत असतात. मात्र दुर्दैवाने सध्याची सरकारी धोरणं कामगार विरोधीच असल्यामुळे सर्वत्र अस्वस्थता आहे. 
कविवर्य सायमन मार्टिन आपल्या भाषणात म्हणाले की, राज्यातील बहुजन समाजाच्या विकासात एसटीचं मोलाचं योगदान आहे. खेडी आणि शहरांना जोडण्याचं काम करीत असताना एसटीने गोरगरिबांना जिवंत ठेवण्याचं काम केलं. म्हणून सर्वसाधारण जनतेच्या मनात एसटी बद्दल अपार कृतद्न्यता आहे. एसटी च्या कर्मचाऱ्यांनी तुटपुंजा वेतनात आपलं घर चालवलं आणि समाजाचे संसार उभे केले. ही एक अनोखी लोकसेवेची चळवळ होती. आमच्या विद्यापीठांनी ह्या विषयाचं सखोल अभ्यास करुन मागील सत्तर वर्षांचा आढावा घ्यावा. एसटी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना मानवंदना द्यावी असे शेवटी कवी सायमन मार्टिन म्हणाले. 
यावेळी जनआंदोलनाच्या नेत्या डॉमनिका डाबरे, वसई संघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता नर एसटी महामंडळाचे दिलीप मोरे आदींची भाषणे झाली.
एसटी महामंडळाच्या सेवानिवृत्त झालेले शावरोक डाबरे, प्रभाकर सातवीं, ए. के. कवडे, एस. के. राठोड यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!