कासव पुढे गेला, शेलार अजूनही सशाच्या भूमिकेत ! – जयंत करंजवकर

‘कासव आणि सशाची शर्यत’ ही गोष्ट  सर्वांना ठाऊक आहे. निदान त्या शर्यतीत ससा आपला पराभव झाल्याबद्दल खजील होतो आणि स्वत:ची चूक मान्य करतो. पण अमित शहा यांचे लाडके आमदार आशिष शेलार यांना शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार महाराष्ट्रात आहे, हे ते त्यांना मान्य नाही. त्यामुळे ते महाविकास आघाडीवर सातत्याने टोकाची टीका करत आहेत. महाविकास आघाडीच्या कोणत्याही मंत्र्यांनी एखादी घोषणा, निर्णय किंवा विधान केले की, आशिष शेलार त्यावर ताबोडतोब प्रत्युत्तर देतात. नुकतेच त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांसमोर राणाभीमाच्या थाटात  हातात तलवार नसल्याने जीभ  फिरवली आणि त्यातून नको ते शब्द बाहेर पडले. त्यांची जीभ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर घसरली.

शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांनी पाच दशकाहून अधिक मुंबईवर राज्य केलं. त्यांच्या हातात हात घालून प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी हिंदुत्व मुद्दयावर महाराष्ट्रात युतीचे सरकार आणले. हा चमत्कार घडला तो केवळ बाळासाहेब या सम्राटामुळेच… आपलं हिंदु नाणं चालतय हे लक्षात आल्यावर महाजन, मुंडे  दुकलीने महाराष्ट्रात कमळ फुलविण्याची एकही संधी सोडली नाही. लोकसभेत फक्त दोन खासदार असताना हिंदुत्वाच्या मुद्दयावर महाराष्ट्राबरोबर देशही भाजपामय केला. गुजरातमधील गोध्रा प्रकरणी भाजपाची देशात व जागतिक स्तरावर पूर्णत: इभ्रत गेली होती. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी  वाजपेयी यांनी त्यावेळचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला होता. ही माहिती बाळासाहेब ठाकरे यांना कळल्यानंतर त्यांनी वाजपेयी यांना सांगितले की, ‘नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री पदावरून हटवू नका, जर गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरुन त्यांना हटविल्यास गुजरातमध्ये भाजप शिल्लक राहणार नाही.’ हा लाखमोलाच सल्ला ऐकल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी नरेंद्र मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर ठेवले. त्यावेळी वाजपेयी यांनी नरेंद्र मोदी यांना हटविले असते तर ते आज पंतप्रधान म्हणून दिसले नसते. हे भाजप विसरला कासरं त्यासना केंडतात ‘पाशवी’ बहुमत मिळसले म्हणून… भाजपाची एक मानसिकता आहे मित्राबरोबर गळयातगळा घालायचा आणि मित्र पक्षाचाच गळा आवळायचा… शिवसेनेच्या हे लक्षात आल्यानंतर उध्दव ठाकरेंना टोकाची भूमिका स्वीकारून अनैसर्गिक काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर जाणे भाग पडले. त्याला कारणीभूत भाजपाची नीतीच आहे.

‘गर्वसे कहो हम हिंदू है’… असा नारा शिवसेनाप्रमुखांनी दिला आणि महाराष्ट्रात व देशात हिंदुत्वाचा अंगार चेतावला. त्यावेळी भाजपाने सेनेच्या घोषणेला साथ दिली. अयोध्येत बाबरी मशीद पाडली तेव्हा ती मशीद पाडल्याची सांगण्यास कोणीही पुढे आले नाही. फक्त बाळासाहेबांनी पुढे येऊन ‘हो जर ती मशीद माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे…’ असे हे बाळासाहेब व त्यांची शिवसेना जे पोटात, तेच ओठावर अशी भूमिका घेऊन पाच दशकाहून अधिक काळ कायम ठेवली.

मुंबईत मराठी माणसाचा श्वास म्हणजे शिवसेना, हे कोणालाही नाकारता येत नाही. प्रत्येक मराठी माणूस हा मनाने शिवसैनिक असतो हे आशिष शेलारांना कसे कळणार? उध्दव ठाकरे यांनी सीएए कडाडून विरोध केला म्हणून शेलारांनी सीएए लागू न करायला ‘अरे तुझ्या बापाचे राज्य आहे का?’, असे विधान करून शिवसेनाप्रमुखांचा पाणउतारा केला. ज्या बाळासाहेबांच्या ताकदीवर भाजपाने राज्यात सत्ता भोगली त्या बाळासाहेबांचा एवढया खालच्या पातळीवर जाऊन उध्दार आतापर्यंत कधीच झाला नाही, त्यांच्या उपकाराची परतफेड या प्रकारे करावी, याची दखल महाराष्ट्र घेईलच. पण आता आणि भविष्यात आशिष शेलार व त्यांच्या भाजपाला एक ना एक दिवस शिवसेना आपल्याबरोबर येईल हे स्वप्न उराशी  बाळगले होते ते भविष्यात अशक्य आहे. बाळासाहेबांची अवेहलना यापूर्वी त्यांच्या शत्रूनेही केली नव्हती ते  महापाप शेलार पर्यायाने भाजपाने केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी यांची मैत्री अधिक घट्ट करण्यास मदत झाली आहे. वैफल्यग्रस्त भाजपा नेते काहीही बडबडत आहेत. आशिष शेलार यांच्या विधानाने सेना व भाजपामध्ये कायमची मोठी भिंत उभी राहिली आहे. एकतर केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात समसमान वाटपाचा शब्द फिरवला होता आणि उध्दव ठाकरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते म्हणून तर त्यांना टोकाची भूमिका घ्यावी लागली.

श्री.शेलार यांच्या विधानाने भाजपा व सेना भविष्यात एकत्र येणे महाकठीण आहे. शिवसैनिक चिडले आहेत आणि काँग्रेसचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तर राष्ट्रवादी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तर शेलारांची सालपटे काढलीत. एक मात्र खरं आहे, शिवसैनिकांच्या एखादी व्यक्ती डोक्यात गेली तर त्या व्यक्तीचं भविषयच उध्वस्त होते. उदाहरण द्यायचे झाले तर नारायण राणे आणि दुसरे भाजपाचे किरीट सोमय्या यांचं उदाहरण देता येईल. किरीट सोमय्या यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली होती. मातोश्री हा माफियाचा अड्डा आहे असे आरोप करून त्यांनी नाराजी ओढवून घेतली होती. शेवटी लोकसभा निवडणुकीत त्यासना तिकीट मिळू नये म्हणून आणि दिल्यास त्यांचा पराभव निश्चित होणार या हेतूने शिवसैनिक उतरले होते. त्यावेळी शिवसेना एकटी होती आतातर त्यांच्या सोबत काँग्रेस,  राष्ट्रवादी आहेत. पुढील विधानसभा निवडणुकीत आशिष शेलारच्या विरोधात महाविकास आघाडी एक उमेदवार उभा करून शेलार यांचा पराभव करतील, ही काळया दगडावरची रेष आहे. शेलारांना बापमाणुस काय असतो हे पुढील विधानसभा निवडणुकीच्या प्रसंगी दिसून येईल. सावधान आशिष शेलारजी, पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर पडा, कासव जिंकला आहे हे मान्य करा…

जयंत करंजवकर (ज्येष्ठ पत्रकार व स्तंभ लेखक/८३६९६९६६३९)
(jayant.s.karanjavkar@gmail.com/)                    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!