किरवलीची स्मशानभुमी देतेय मृत्यूला आमंत्रण

वसई (वार्ताहर)  ः  नायगांव-किरवली येथील स्मशानभुमी अंत्यविधीकरीता येणाऱ्या नागरिकांसाठी  कर्दनकाळ ठरत असून,मृत्यूला आमंत्रण देणाऱ्या या स्मशानाच्या दुरुस्तीसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

नायगांव पश्चिमेला असणाऱ्या किरवली स्मशानात अंत्यविधीसाठी जायला ग्रामस्थांना मृत्यूशी सामना करावा लागतोय.तडे गेलेले,मोडकळीस आलेले बांधकाम,ठिकठिकाणी वाढलेल्या झाडी-झुडपांत सरपटणारे नाग,साप,विंचु,पाल सारखे विषारी प्राण्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.या स्मशानात कर्मचारीही नसल्यामुळे चिता रचण्यासाठी ग्रामस्थांना गोदामातून स्वतःलाच लाकडे आणावी लागतात.या लाकडांच्या ढिगाऱ्याखालून विषारी प्राण्यांचे फुत्कार ऐकायला येत असल्यामुळे अनेकदा लाकडे तशीच टाकून पळ काढायची पाळी येते असे भयभित ग्रामस्थ सांगतात.तसेच वापरायला पाणी,दिवाबत्ती,बसायला बाकडे,विधी फरशी अशा कोणत्याही सुविधा या स्मशानात अस्तित्वात नाहीत.

त्यामुळे अंत्ययात्रेला निघताना रॉकेलच्या कॅनसह पाण्याचे डबेही सोबत घ्यावे लागत आहेत.तसेच रात्रीच्या वेळी मोबाईल टॉर्चच्या झोतात अंत्यविधी उरकावे लागत आहेत.त्यातच फुटलेले बाकडे, उखडलेली फरशी,तडे गेलेली शेगडी ग्रामस्थांच्या जीवावर उठली आहे.स्मशानात तीरडी घेवून येताना तुटलेल्या,उखडलेल्या फरशांमुळे ग्रामस्थांचे पाय आणि फेऱ्या मारताना मृतांच्या नातलगांचे पाय रक्तबंबाळ होत आहेत.प्रेताला अग्नि दिल्यानंतर उष्णतेने तडे गेलेले बांधकाम कोसळत असल्यामुळे जायबंदी होण्याची भितीही निर्माण होत आहे.परिणामी मोठी दुर्घटना घडण्यापुर्वी या स्मशानाची ताबडतोब दुरुस्ती करण्यात यावी.अशी मागणी काँग्रेसचे नालासोपारा ब्लॉक अध्यक्ष कुमार काकडे,युवक काँग्रेसचे संजय मीणा आणि प्रतिक वर्तक यांनी महापालिकेचे आयुक्त सतीश लोखंडे यांच्याकडे केली आहे.

या प्रकरणी महापालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांच्याशी संपर्क साधला असता,लवकरच टेंडर काढून किरवलीतील स्मशानभुमी अद्यावत करण्यात येणार आहे.अशी माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!