किल्ले वाचवा एल्गार आंदोलनात शेकडो दुर्गसंवर्धक सहभागी

वसई : महाराष्ट्रातील एकूण सर्वच गडकोटांवर व परिसरात संपूर्ण दारुबंदी व्हावी, गडकिल्ले शौर्यभूमी, धारातीर्थे आहेत येथे अश्लील फोटोग्राफी, प्रि-वेडिंग छायाचित्रण कायमचे बंद व्हावे, गडकिल्ल्यांचे मूळ प्रतीक असलेल्या भगव्या ध्वजाला गडांवर पुरातत्व विभागाने घातलेली बंदी कायमची रद्द व्हावी, किल्ल्यांवर येणाऱ्या जाणाऱ्यांची नावे नोंदणी संबंधित खात्याने करावी, त्याकामी गडकिल्ल्यांच्या पायथ्याला कायमस्वरूपी तपासणी, नोंदणी चौकी बांधावी, किल्ल्यांवर विकृत लोकांकडून सुरू असलेले अश्लील चाळे बंद करावे, किल्ले संरक्षणासाठी वाढीव कुमक असावी, गडकिल्ल्यांचा परिसर संपूर्ण कचरामुक्त व्हावा, याभागात संपूर्ण प्लास्टिक बंदी व्हावी, निसर्ग प्राणी पक्षी यांना घातक असलेल्या किल्ल्यांच्या परिसरात लागणारे वणवे कायमचे थांबवावे, गडकोटांच्या नावाचा निधी ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनात वापरावा, नष्ट होणाऱ्या गडकिल्ल्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करणारे, गडमित्रांना आंदोलन करण्यास आडगाव करणाऱ्या केंद्र व राज्य पुरातत्व विभाग, वन,पर्यटन विभाग यांच्या गलथान व भ्रष्ट कारभार विरोधात जंजिरे किल्ले वसई जिल्हा पालघर येथे दिनांक १५ व १६ डिसेंबर २०१८ रोजी राज्यभरातील ३५ हुन अधिक दुर्गसंवर्धन संस्था, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष व व्यक्ती यांच्या उपस्थितीत व लेखी पाठिंब्यात दोन दिवसीय “किल्ले वाचवा राज्यस्तरीय एल्गार आंदोलन” पार पडले, यावेळी आम्हाला लेखी हमी पत्र मिळावे याबाबत ठाम संकल्प करून बसलेल्या दुर्गमित्रांना अखेर केंद्रीय पुरातत्व व राज्य व केंद्र सरकारच्या विविध विभागांना दिलेल्या निवेदनाच्या उत्तरात दिलेल्या मुख्य मागण्यांवर संबंधित अधिकाऱ्यांनी १५ दिवसांत मार्ग काढू असे लेखी लिहून दिले, तर बाकी मुद्द्यांवर वरिष्ठांशी बोलून मार्ग काढू असे आश्वासन लेखी पत्र केंद्रीय पुरातत्व विभागाने आंदोलकांना दिले. दुर्गमित्रांच्या या एल्गार आंदोलनाचे यश दुर्गमित्रांनी श्री राजा शिवछत्रपतींच्या पायी अर्पण केले आहे.
    वसई किल्ल्यावरील केंद्रीय पुरातत्व विभागाच्या कार्यालयासमोर किल्ले वसई मोहिम परिवाराच्या संयोजनातून दोन दिवसांचे महाराष्ट्रातील दुर्गसंवर्धक संस्थांचे उपस्थितीत “किल्ले वाचवा एल्गार आंदोलन” झाले, महिन्यापूर्वीच या आंदोलनाची पूर्वतयारी व स्थानिक परवानगीचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले होते. राज्यातील गडकिल्ल्यांची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत आहे, गडकोट डोळ्यासमोर भग्न नष्ट होत असताना राज्यातील दुर्गसंवर्धक संस्था किल्ल्यांचे अस्तित्व अबाधित राहावे म्हणून श्रमदान व जनजागृत्ती करीत आहे. ज्या गडकिल्ल्यांच्या माध्यमातून शौर्य, त्याग ,प्रेरणा घ्यायची, जिथे जाऊन अभ्यास व संशोधन करायचे, अश्या गडकोटांवर दुर्गसंवर्धक संस्थांना मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या व मद्यपी बऱ्याच ठिकाणी आढळतात, या गडकिल्ल्यांवर भगवा ध्वज लावला तर केंद्रीय व राज्य पुरातत्व विभाग तो काढून टाकते, म्हणे राष्ट्रीय स्मारकांवर भगवा ध्वज लावता येत नाही, किल्ल्यांवर दुर्गसंवर्धन करण्यास ही परवानग्या लागतात, तिथे मात्र दारुडे व अश्लील चाळे करणारे व प्रि-वेडिंग सारखे प्रकार कसे चालतात? भगवा ध्वज चालत नाही मग कुठला ध्वज लावायचा? सध्यस्थितीत गडकोटांचे पवित्र्य भंग करणाऱ्या प्रकारांत वाढ झाली असतांना वसई सह ज्या किल्ल्यांवर जिथे दुर्गसंस्था विकृतांना विरोध करतात त्याला किल्ले प्रशासन कायद्याचा बडगा दाखवते व दुर्गमित्रांवर नोटीस काढली जाते, कायदेशीर कारवाई करण्याचे प्रकार घडत आहे परिणामी गडकिल्ल्यांच्या जतन ,संवर्धन, संरक्षणाची जबाबदारी असताना मात्र केंद्रीय व राज्य, पुरातत्व विभाग, वन विभाग, पर्यटन खाते व दोन्ही सरकारे अजूनही गंभीर्याने लक्ष देत नसल्याने दुर्गसंवर्धक संस्थांना आंदोलन करण्याची वेळ आली असल्याची तीव्र भावना येथे असलेल्या दुर्ग संस्थांच्या प्रतिनिधींनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या पुरातत्व व वन खात्याच्या गैर कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात प्रशासन व निष्क्रिय सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या, अनेक सामाजिक राजकीय व व्यक्तींनी लेखी पत्रे देऊन पाठिंबा दिला, यावेळी किल्ले वसई मोहीम परिवार, शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था (नाशिक) ,युवाशक्ती प्रतिष्ठान (पालघर), शिवसेवा समिती (बोरिवली विरार), शिवशौर्य ट्रेकर्स (मुंबई), शिवसेना (पालघर), देवा ग्रुप फाउंडेशन (पालघर), बा-रायगड परिवार, मावळा प्रतिष्टान, आगरी समाज एकता (मिरा भाईंदर), राजा शिवछत्रपती परिवार, हिंदवी स्वराज्य समूह (शिरगाव), युवा प्रतिष्ठान (मीरा भाईंदर), स्वामी समर्थ केंद्र (सफाळे), किल्ले व जाणीव ग्रुप (ठाणे), संवर्धन मोहीम केळवे, समस्त दुर्गमित्र परिवार (जोगेश्वरी), मोहीम किल्ले संवर्धक, स्थानिक दुर्गमित्र (वसई), दीपस्तंभ प्रतिष्ठान (वसई), वेध सह्याद्री (खोपोली), स्वराज्य सेवा संस्था (वसई), भारतीय जनता पार्टी (वसई), ट्रेक क्षितिज संस्था डोंबिवली, जोगेश्वरी भटकंती  कट्टा, हिंदवी स्वराज्य, फायटर फॉर हयुमन राईट, बॉक्सर ग्रुप, ओ बी सी हक्क परिषद, कुणबी सेना पालघर, शिवसह्याद्री संस्था महाराष्ट्र, स्वराज्य युवा मंडळ, मी जागृत बंदरपाडेकर (अर्नाळा), कोळी एकता मंच वसई अश्या अनेक दुर्गमित्र संस्था व्यक्ती या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. किल्ले एल्गार आंदोलनाचे प्रास्ताविक किल्ले वसई मोहिमेचे प्रमुख डॉ श्रीदत्त राऊत यांनी केले तर आंदोलनाची सांगता श्री राजा छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व आरती शिवकार्य गडकोट संस्थेचे संस्थापक श्री राम खुर्दळ यांच्या हातून संपन्न झाली. आंदोलनच्या समारोपात शेवटी श्री राजा शिव छत्रपतींचा जयघोष करण्यात आला.

 

किल्ले वसई मोहिमेचे प्रमुख श्रीदत्त राऊत यांच्या मते “महाराष्ट्रातील गडकोटांवर होणारे सर्व गैरप्रकार पुरातत्व विभागाने येत्या काळात योग्य उपाययोजना करीत न थांबविल्यास दुर्गमित्रांपुढे आमरण उपोषण हा एकमेव पर्याय उपलब्ध राहील.”

युवा शक्ती प्रतिष्ठानचे प्रमुख प्रशांत सातवी यांच्या मते “किल्ले व ऐतिहासिक स्मारके यांचे योग्य प्रकारे जतनीकरण न झाल्यास येत्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक गडकोटांवर एल्गार आंदोलने होतील यात शंका नाही.”

शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे प्रमुख श्री राम खुर्दळ यांच्या मते “महाराष्ट्रातील दुर्गमित्रांच्या समस्त मागण्याबाबत पुरातत्व विभाग नेमकी काय भूमिका घेते, याबाबत समस्त दुर्गमित्रांचे लक्ष लागलेले असून आगामी काळातील दुर्गमित्रांची भूमिका लवकरच घोषित होईल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!