कुटुंबाच्या आर्थिक जडण-घडण आणि निर्णय प्रक्रियेतही महिलांनी कौशल्य दाखवावे – सौ. ब्रिजदिना कुटिन्हो

वसई, दि.१३ (वार्ताहर) : घर आणि कुटुंबाची जबाबदारी अंगावर असल्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्याबाबत सतत जागृत राहणे आवश्यक आहे. दुय्यम मानसिकता न बाळगता कुटुंबाच्या आर्थिक जडण-घडण आणि निर्णय प्रक्रियेतही महिलांनी आपल्या कौशल्याची चुणूक दाखवावी, त्यातून आत्मविश्वास वाढीस लागतो. असे प्रतिपादन बॅसीन कॅथॉलिक सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. ब्रिजदिना कुटिन्हो यांनी निर्मळ येथे महिलांना मार्गदर्शन करतांना केले. 

येथील जीवन विकास मंडळाच्या महिला विभागातर्फ़े मंडळाच्या जीविका संकुलात महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सौ कुटिन्हो बोलत होत्या. त्यासोबतच याप्रसंगी  ‘स्त्रियांची सामाजिक व कौटुंबिक जबाबदारी आणि त्यात येणाऱ्या अडचणीवर उपाय’ या विषयावर डॉ. संगिता सिरेजो यांनी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी सौ ब्रिजदिना कुटिन्हो, जीवन विकास पतपेढीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लता फोस व सामाजिक कार्यकर्त्या रेजिना आल्मेडा आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मंचावर प्रमुख विश्वस्त सिल्वेस्टर परेरा व महिला विश्वस्त मार्गारेट फर्नांडीस हेही उपस्थित होते.

करमणुकीच्या कार्यक्रमात सचिन सायमन रॉड्रिग्ज यांनी बहारदार एकपात्री नाट्य सादर केले. तसेच ‘कादोडी माई कवतीकाई’ या काव्य वाचन ग्रुपतर्फे ख्रिस्तोफर रिबेलो, सिरील मिनेझिस, एमेल आल्मेडा व एडवर्ड डिसोजा यांनी कादोडी भाषेतील कविता सादर केल्या. महिला विभाग प्रमुख रेजिना क्रास्टो ह्यांनी स्वागत व शांती रुमाव यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ख्रिस्तोफर रिबेलो व जेनेट निग्रेल ह्यांनी केले व आभार प्रदर्शन आग्नेस डाबरे ह्यांनी केले.या कार्यक्रमात चारशेहून अधिक  महिला सहभागी झाल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!