कोकण भूमी प्रतिष्ठान आयोजित कोकणातील पहिला ‘व्हिलेज टुरिझम फेस्टिवल’

वसई (मनिष म्हात्रे) : कोकण भूमी प्रतिष्ठान आयोजित कोकणातील पहिला ‘व्हिलेज टुरिझम फेस्टीवल’ येत्या २२ ते ३१ डिसेंबर २०१८ रोजी अर्नाळा येथे आयोजित करण्यात येत आहे.ग्रामीण जिवनाचा अनुभव व पारंपारिक खाद्य पदार्थांची चव घेण्यासाठी या महोत्सवाला पर्यटकांची मोठी गर्दी उसळणार आहे.
 कोकण हा प्रदेश पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भागात असलेला भूमीचा पट्टा आहे. ७२० कि.मी. लांबीचा सूंदर समुद्रकिनारा या भूमीला लाभलेला आहे. हि भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे.कोकण म्हणजे निसर्गाने सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण केलेली भूमी. त्यामुळे पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या भूमीत मनसोक्त  भटकंतीबरोबरच विटीदांडू,आबाधुबी, लगोरीसारख्या पारंपारिक  खेळांमध्ये रमण्याची संधी कोकण भूमी प्रतिष्ठानने आपल्याला दिली आहे. त्यांच्या २२ ते ३१ डिसेंबरमध्ये अर्नाळा येथे होणाऱ्या आठव्या ग्लोबल कोकण महोत्सवांतर्गत पहिला “व्हिलेज टुरिझम’मध्ये ही संधी मिळणार आहे. त्यानंतर नवीन वर्षात आंबिवली (पालघर), ऐनशेत (वाडा) आणि चौल (अलिबाग) येथे असे उत्सव भरविण्यात येणार आहेत.
वसई तालुक्यातील  अर्नाळा गावात “व्हिलेज टुरिझम फेस्टिव्हल’ची सुरुवात वर्षाच्या अखेरीस होत असली तरी,या महोत्सवानिमीत्त मोठ्या संख्येने पर्यटकांची गर्दी उसळणार आहे. या ठिकाणी पर्यटक ग्रामीण जीवनाचा अनुभव घेऊ शकतील. खेड्यांतील जीवन अनुभवण्याची संधी हे त्याचे वैशिष्ट्य ठरणार आहे. खाद्यसंस्कृतीतही कोकण समृद्ध आहे.महोत्सवात ते खाद्यपदार्थही पर्यटकांना मनसोक्त चाखायला मिळणार आहेत.विस्तीर्ण दाट सुरूची बाग, निसर्ग-जंगल भ्रमंती, बैलगाडीतून गावाचा फेरफटका, नदीत डुंबणे यांच्याबरोबरच स्थानिक वाडवळ, भंडारी,आगरी,कोळी ,कुपारी, सामवेदी यांची भाषा, परंपरा, लोककला यांची माहितीही घेता येणार आहे. आबाधुबी, लगोरी, विटीदांडू, भोवरा अशा अस्सल ग्रामीण खेळांचा बच्चेकंपनींना मनसोक्त  आनंद घेता येणार आहे. गावातील जेष्ठांसोबत गप्पा, ग्रामीण अर्थव्यवस्था समजून घेणे, ग्रामदैवतांची भेट अशीही या महोत्सवाची काही खास वैशिष्ट्ये असणार आहेत. त्यामुळे हा महोत्सव एक वेगळीच  पर्वणी ठरणार असल्याचा दावा आयोजक करत आहेत.
जगभर प्रसिद्ध असलेला एअर स्पोर्टस्‌ पर्यटन  हे अर्नाळा किनाऱ्यावर महोत्सवातून सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये पर्यटक पॅरा मोटारिंगचा आनंद घेऊ शकणार आहेत.या सफरीतून पर्यटकांना आकाशातून मनसोक्त अर्नाळा परिसराचे विहंगम द्रुष्य पहाता येणार आहे.विशेष म्हणजे महोत्सवाचे आयोजन कोकणातील व्यवसाय आणि व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने केले जाणार असल्यामुळे स्थानिक लोकांच्या विविध खाद्यपदार्थ्यांचेही स्टाॅल या महोत्सवात लावण्यात येणार आहेत.इतकेच नव्हे तर रूपेरी वाळू,सोनेरी लाटांवर नौकासफर करत अर्नाळा किल्ला पाहायला मिळणार आहे.याबाबत या महोत्सवाचे आयोजक संजय यादवराव यांनी शनिवारी पत्रकार परीषदेत याची माहिती दिली.या व्हिलेज टुरिझम फेस्टिवल आयोजन कोकणातील व्यवसाय आणि व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने केले गेले आहे. कोकणभूमी प्रतिष्ठान नेहमीच कोकणच्या विकासासाठी व तिथला वारसा जपून राहावा यासाठी प्रयत्नशील असल्याचे संजय यादवराव यांनी सांगितले.
अर्नाळा येथे कुठे भरणार महोत्सव ..पर्यटकांचे स्वागत सोनचाफा व फूलांच्या गजरा देऊन करणार…
अर्नाळा मुक्काम पाडा बिचजवळील ‘मामाची वाडी ‘ या निसर्गरम्य  ठिकाणी हा महोत्सव भरविण्यात येणार आहे.’ मामाची वाडी’ म्हणजे एक अप्रतिम अॅग्रिकल्चर टुरिझम सेंटर म्हटल्यास वावगं ठरणार नाही.या ठिकाणी सोनचाफा, मोगरा, लिली, झेंडू, गुलाब आदी फुलांची बागा पाहायला मिळणार आहेत.इमू पक्षी व कुकुट्टपालन  जवळून पाहता येणार आहे.झाडावरील घरे हे या ‘मामाच्या वाडीतील ‘ खास अप्रूप आहे.संपूर्ण दिवसात गावातील दैनंदिन जीवनासह वेगवेगळे अनुभव अनुभवता येणार आहेत. रोमांचक खेळाची आवड असणा-यांसाठी खास 200 मीटर लांबीची झिप लाईन वॅली क्राॅसिंग व आकाशातील सायकल असे धाडसी खेळ पर्यटकांना अनुभवता येतील.या महोत्सवास येणा-या पर्यटकांचे सोनचाफ्याचे फूल  तर महिलांना गजरा देऊन स्वागत करण्यात येणार आहे.
ग्लोबल कोकण ‘व्हिलेज टुरिझम फेस्टिवल ‘ , मामाची वाडीत कसे सहभागी होणार….
या महोत्सवात सहभागी होण्यासाठी प्रत्येकी 1500 रूपये  खर्च करावे लागणार असून  अधिक माहितीसाठी  022-24324260   या नंबरवर संपर्क तर www.kokanbhumitourism.com वर नोंदणी करावी लागणार आहे. विरार पश्चिम येथून एसटी बस ,रिक्षा किंवा खाजगी वाहनातून अर्नाळा ज्योती चर्च जवळून मामाची वाडी पर्यंत पर्यटक जाऊ शकतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!