कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पालघर जिल्हा मंडळाची पुनर्रचना

वसई, दि.३१ (प्रतिनिधी) : कोकण मराठी साहित्य परिषद पालघर जिल्हा मंडळाची सर्वानुमते पुनर्रचना करण्यात आली असून त्यात प्रदीर्घकाळ केवळ पदे अडकवून बसलेल्या नामधारी पदाधिकाऱ्यांना नारळ देण्यात आला. जिल्हा प्रतिनिधीपदी अनिलराज रोकडे, जिल्हा कार्यवाहपदी उमाकांत वाघ , जिल्हा कोषाध्यक्षपदी जयेश शेलार तर जिल्हा कार्याध्यक्षपदी सुधाकर ठाकूर यांची नव्याने निवड करण्यात आली. तसेच नालासोपारा व वाडा शाखेच्या प्रभारी अध्यक्षपदी अनुक्रमे रविंद्र माने व जयेश शेलार याच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.
दि.३१ मार्च रोजी कोमसाप पालघर जिल्हामंडळाच्या कार्यकारणीची महत्वपूर्ण बैठक जिल्हाध्यक्ष प्रवीण ना. दवणे यांच्या अध्यक्षतेखाली पालघर येथे संपन्न झाली. या सभेत जिल्हा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते पुनर्रचना करण्यात आली. वर्षभरापासून मोठ-मोठी पदे मागून घेऊन केवळ चौफेर मिरविणाऱ्या कामचुकार  पदाधिकाऱ्यांबद्दल या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. येत्या काळात आपण सर्वांनी सक्रिय राहून शाखा बरखास्ती वा मंडळाची पुनर्रचना करण्याची वेळ येऊ नये, अशी अपेक्षा मंडळाचे अध्यक्ष दवणे यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी फेररचना करण्यात आलेल्या   जिल्हा कार्यकारिणीवर जिल्हा प्रतिनिधी म्हणून वसई शाखेचे अध्यक्ष अनिलराज रोकडे , जिल्हा कार्यवाह म्हणून विरार शाखाध्यक्ष उमाकांत वाघ, कार्याध्यक्ष म्हणून सुधाकर ठाकूर व कोषाध्यक्ष म्हणून जयेश शेलार यांची निवड करण्यात आली. तसेच या सभेत नालासोपारा शाखेच्या बरखास्त करण्यात आलेल्या कार्यकारणी सदस्यांच्या जागी नवीन कार्यकारणी-पदाधिकारी निर्माण करण्यासाठी प्रभारी अध्यक्ष म्हणून रविंद्र माने यांची निवड करण्यात आली, तर वाडा शाखेच्या बरखास्त केलेल्या कार्यकारणी सदस्यांच्या जागी नवीन कार्यकारणी-पदाधिकारी निर्माण करण्यासाठी प्रभारी अध्यक्ष म्हणून जयेश शेलार यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा मंडळाच्या नव्या पुनर्रचनेचे, तसेच नव्या पदाधिकाऱ्यांचे कोमसापच्या केंद्रीय शाखेचे अध्यक्ष डॉ महेश केळुसकर यांनी अभिनंदन केले असून, मराठी भाषा व साहित्यासाठी सतत उपक्रमशील राहण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!