कोमसाप, वसई शाखेचा ‘मराठी भाषा दिन’ सोहळा !

‘शुध्दलेखन कसे कराल?’ या विषयावर खास व्याख्यानाचे आयोजन !!

वसई (वार्ताहर) : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वसई शाखेतर्फे बॅसिन कॅथॉलिक सहकारी बँकेच्या सहकाऱ्याने दि. २७ फेब्रुवारी २०१९, बुधवारी ‘मराठी भाषा दिना’ निमित्त वसईत ज्येष्ठ  नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कार्यक्रमाचे आयोजन बंगली,वसई(प) येथील लोकसेवा मंडळ सभागृहात सायंकाळी ४:३० वाजता करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे यावेळी मराठी भाषा अभ्यासक, तथा व्याकरणतज्ज्ञ डॉ. उषा रामवाणी-गायकवाड यांचे’मराठी शुध्दलेखना’ वर आधारित खास व्याख्यान होणार आहे.

बॅसिन कॅथॉलिक सहकारी बँकेचे अध्यक्ष ओनील आल्मेडा यावेळी विशेष अतिथी म्हणून, तर प्रमुख पाहुणे म्हणून कोमसापचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रवीण दवणे आणि दै.पुढारी चे पालघर जिल्हा आवृत्ती प्रमुख मंगेश तावडे उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाची माहिती देतांना शाखेचे अध्यक्ष, संयोजक अनिलराज रोकडे म्हणाले की, वसईतील न्यू इंग्लिश स्कुल, आर. पी. वाघ हायस्कुल,सेंट थॉमस हायस्कुल, एम. जी. परुळेकर हायस्कुल, सेंट एलीझाबेथ कॉन्व्हेंट, सेंट अलॉयसियस कॉन्व्हेंट व जी.जे.वर्तक विद्यालय या सात माध्यमिक शाळांमधून गेल्या ‘वाचन प्रेरणा दिना’ निमित्त ऑॅक्टोबर २०१८ मध्ये मराठी साहित्य आणि भाषा यावर आधारित १०० प्रश्नांची लेखी स्वरूपाची ‘प्रश्नमंजुषा’ स्पर्धा शाखेतर्फे घेण्यात आली होती. या स्पर्धेत तब्बल २५०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. प्रत्येक शाळेतून इ.८ वी व इ. ९ वी च्या प्रत्येकी पहिल्या पाच क्रमांकांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली असून या विजेत्या ७० स्पर्धकांना आकर्षक स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते यावेळी गौरविण्यात येणार आहे.

मराठी भाषा ही खूप लवचीक आहे. तिला शुध्दलेखनाच्या अनेक नियमांनी जखडून टाकले आहे. तसेच बोलीभाषा व प्रमाणभाषा यांत बराच गोंधळ असल्याने शुध्दलेखनाचा प्रांत हा किचकट असल्याची भावना लिहिताना कित्येकदा निर्माण होते. आपण गोंधळतो, अडखळतो,चुकतो. अभ्यासक्रमात या विषयाशी फारसा संबंध आलेला नसतो. सभोवती योग्य मार्गदर्शक नसतो. क्वचित, मार्गदर्शनपर पुस्तके हाताशी असली तरी नुसते वाचून फारसा उपयोग होत नाही. त्यामुळेच आपल्या लेखन-व्यवहारात शुध्दलेखनाबाबत एकूणच उदासीनता, अनास्थाच आढळते. अनेक उच्च्च पदस्थ, लेखक, प्राध्यापक आणि पत्रकारांच्या लेखनातही अशुध्दता पाहायला मिळते. शुध्दलेखनाचे 18 नियम आणि काही उपनियमही आहेत. ते काही अंशी शिकून, समजून घेण्याची इच्छा असणाऱ्या लेखक, पत्रकार, विद्यार्थी, साहित्याचे अभ्यासक आणि कोणत्याही वयोगटातील जिज्ञासू व्यक्तींसाठी शुध्दलेखन आत्मसात करणे, तथा सोप्या पध्दतीने जाणून घेण्यासाठी प्रस्तुतचे अतिशय उपयुक्त व्याख्यान ही एक सुवर्णसंधी आहे!

मराठी साहित्य आणि शुध्दलेखनाच्या प्रांतात गेली सुमारे तीस वर्षे मुशाफिरी केलेल्या डॉ. उषा रामवाणी गायकवाड यांनी मराठी साहित्यात मार्गदर्शकाच्या मदतीशिवाय पीएचडी केले आहे. तसेच अनेक नामांकित प्रकाशन संस्थांत संपादन सहाय्यक व मुद्रित शोधकाचे काम केले असून त्या ‘मराठी शुध्दलेखना’ वर कार्यशाळा घेतात. अश्याच त्यांच्या व्याख्यानाचा लाभ वसईकरांसाठी या कार्यक्रमातून करून देणार आहोत. या कार्यक्रमाचा सर्वांनी मोठया संख्येने लाभ घ्यावा,असे आवाहन को.म.सा.प वसई शाखेतर्फे कार्यवाह रेमण्ड मच्याडो, विजय पाटील,संदीप राऊत व कार्यकारी समितीने केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!