कोरोना बाबत गाफील राहू नका – व.पो.नि.वसंत लब्दे

नालासोपारा (प्रतिनीधी) : महाबिमारी कोरोना विरुद्धची आपली लढाई थांबलेली नाही कारण प्रादुर्भावाचा धोका अजून टळलेला नाही. म्हणूनच आपण गाफील न राहता अधिक गांभीर्याने या संकटाचा सामना करावा. शासनाकडून येणाऱ्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन नालासोपारा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे आणि सहकारी अधिकाऱ्यांनी नागरिकांना केले आहे.
या विभागात पोलीस आयुक्तांचा कारभार सुरु झाल्यानंतर पहिल्याच पोलीस- मोहल्ला कमिटीची बैठकीचे आयोजन परवा (२५ नोव्हेंबर) संध्याकाळी येथे करण्यात आले होते.
१९ ते २५ नोव्हेंबर हा आठवडा पालघर पोलीस विभागाने “कौमी एकता सप्ताह” म्हणून साजरा केला. त्या उपक्रमाचा समारोप या बैठकीत करण्यात आला.

या बैठकीत काही नगरसेवक, मोहल्ला कमिटी सदस्यांनी शहरातील विविध समस्यांवर उपस्थित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून काही मागण्या केल्या. माजी उपमहापौर सगीर डांगे, माजी नगरसेवक मार्शल लोपीस,प्रवीण म्हाप्रळकर, हर्षद राऊत,
समाजसेवक समीर वर्तक, अर्शद डबरे, वसिम खान यांनी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत तक्रारी आणि सूचना मांडल्या. शहरात सोपारा, गास, हनुमान नगर येथे व्यसनाधीन तरुणांचा सतत वावर असतो. ही टोळकी एवढी मोकळी कशी असतातयांना ना पोलीसांचा ना समाजसेवकांचा धाक. हनुमान नगर तर अंमली पदार्थांच्या विक्रीचे आणि सेवनाचे मोठे केंद्र बनले आहे. पोलीसांनी अशा टोळक्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत. अशी मागणी या वेळी अनेक सदस्यांनी केली. या मुद्यावर बोलताना व.पो.नि.वसंत लब्दे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. हनुमान नगर, सोपारा आणि श्री प्रस्थ विभाग अशी तीन बीट तयार करण्यात आली असून या बीट टीम मध्ये सक्षम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. शिवाय आता आयुक्तालय आले आहे. आपले बळ वाढणार आहे. केवळ गावठी दारू आणि मादक पदार्थांच्या संदर्भात नाही तर सर्व प्रकारच्या गुन्हेगारी वर आपण अंकुश ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या सहकार्याची आम्हाला गरज असते. या विशिष्ट परिस्थितीत या शहरातील नागरिकांनी आता अधिक सतर्क राहून शासनाला मदत करावी. येणारे सण, राष्ट्रीय महापुरुषांच्या जयंती- पुण्यतिथीच्या कार्यक्रमां निमित्ताने होणारी गर्दी करु नका. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी घ्यावी असेही ते म्हणाले.

या बैठकीत सर्वांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली. नगरसेविका शबनम शेख, ज्येष्ठ समाजसेवक आब्बास फौजी, नवनाथ पगारे सलीम शेख हे मान्यवर सुद्धा या बैठकीत उपस्थित होते. सुरुवातीला शहीद जवान, कामी आलेले कोरोना योद्धे आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली. पोलीस निरीक्षक भोये, उपनिरीक्षक तांबोळी आणि अधिकारी माचेवाल आदिंनी या नेटक्या बैठकीचे आयोजन केले होते. कमिटी सदस्य अड.रमाकांत वाघचौडे यांनी सूत्रसंचालन आणि व.पो.नि.वसंत लब्दे यांनी आभारप्रदर्शन केले. राष्ट्रगीत गायनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!