कोरोना योद्ध्यांचे तारणहार ; अन्नपूर्णेचे वारसदार ! – योगेश वसंत त्रिवेदी

“मुलांनो, जेवणासंबंधी पुढील सूचनांचे पालन करा !
१. भोजनाची जागा व जेवणासाठी वापरावयाची भांडी स्वच्छ ठेवा.
२. जेवायला सुरुवात करण्यापूर्वी हात, पाय व तोंड स्वच्छ धुऊन जेवायला बसा.
३. टेबल-खुर्चीवर किंवा नुसत्या जमिनीवर न बसता आसन घेऊन किंवा पाटावर बसा.
४. जेवायला सुरुवात करण्यापूर्वी पुढील श्लोक म्हणा.
वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।
जीवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥१॥
जनीं भोजनी नाम वाचे वदावे ।
अती आदरे गद्यघोषे म्हणावे ।
हरीचिंतने अन्न सेवित जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥२॥
५. अन्नग्रहण करण्यापूर्वी करावयाची प्रार्थना – `हे देवा, हे अन्न तुझ्या चरणी अर्पण करून तुझा प्रसाद या भावाने मी ग्रहण करत आहे. या प्रसादातून मला शक्‍ती व चैतन्य मिळू दे.’
६.अन्न देवाला अर्पण करा व नंतर देवाचा प्रसाद म्हणून नामजप करत ग्रहण करा.
७. एकमेकांचे उष्टे अन्न खाल्ल्यामुळे वाईट शक्‍तींचा त्रास होऊ शकतो; म्हणून उष्टे अन्न खाऊ नका.
८. अन्न पायदळी तुडवले जाऊ नये, यासाठी जेवणानंतर ताटाभोवती सांडलेले अन्नकण उचला.”
या सर्व गोष्टी आपण लहानपणी ऐकत होतो. आताही घरातली वयस्कर मंडळी आवर्जून या गोष्टी लक्षात आणून देतात. ‘कशासाठी पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी !’ हे गाणेसुद्धा आपण ऐकले आहे. सारंकाही पोटासाठीच चाललेले आहे. मग कुणी म्हणतात पोटाची खळगी भरायची आहे. कुणी म्हणतात हातावर ‘पोट’ आहे. या सगळ्या गोष्टींचा संबंध हा पोटाशीच येतो. विवाह जुळवितांना, मुलगी/मुलगा पहायला जातांना कांंदेपोहे हा कार्यक्रम हमखास ठेवण्यात येतो.  माणसाच्या सुखाचा मार्ग पोटातून जातो, असेही म्हणतात. याचाच अर्थ ‘पोट’ हाच केंद्रबिंदू असतो. महाराष्ट्रातील सुमारे बारा कोटी जनतेच्या हिताचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाची जागा आहे मंत्रालय. या मंत्रालयातील उपहारगृह सुद्धा ‘पोट’माळ्यावर आहे. आहे की नाही योगायोग ?  हे मंत्रालयातील उपहारगृह सध्या कुणाच्या लक्षात आले आहे कां ? अजिबात नाही. पण आपण जसा मागे मंत्रालयात कार्यरत असणाऱ्या राष्ट्रभक्ती चे  पंचरत्न अर्थात मंत्रालय इमारतीवर डौलाने, अभिमानाने फडकणाऱ्या आपल्या लाडक्या तिरंगा राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण आणि ध्वजावतरणाचे कार्य निष्ठेने करणाऱ्या गणेश मुंज, विशाल राणे, जयसिंग मकवाणा, सूर्यकांत कसबे आणि संजय वाघेला यांच्या कार्याचे कौतुक करीत त्यांच्या पाठीवर शाबासकी ची थाप दिली/मारली. त्याचप्रमाणे आज आपण मंत्रालयातील दुसरे पंचरत्न म्हणजेच ‘कोरोना योद्ध्यांचे तारणहार ; अन्नपूर्णेचे वारसदार’ यांचे ऋण व्यक्त करणार आहोत. मंत्रालयात तशी प्रत्येक मजल्यावर चहा कॉफी ची गाडी असते. पोटमाळ्यावर उपहारगृह आहे. चौरस आहार उपहारगृह आहे. पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर, बेसमेंट मध्ये चहा/कॉफी, नाश्ता, भोजन यांची व्यवस्था आहे.  वीस मजल्यांची नवीन प्रशासकीय इमारतीतही उपहारगृह आहे. अर्थात ही नेहमीच्या वेळी. परंतु आता काय ? चीन मधून आलेल्या आणि जागतिक पातळीवर थैमान घालणाऱ्या कोरोना या विषाणूने भारताला आणि महाराष्ट्रातील जनतेला आपल्या कवेत घेतले आहे.
मुंबई ही जशी महाराष्ट्राची आणि भारताची आर्थिक राजधानी आहे तद्वतच ती दुर्दैवाने कोरोनाच्या विषाणू ची ही राजधानी होते की काय ? अशी शंका येण्याइतपत हा विषाणू पसरला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च २०२० रोजी जनता संचारबंदी लागू केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात टाळेबंदी जाहीर केली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सारे व्यवहार ‘जंयच्या थंय’ थांबले. पण राज्याच्या प्रशासनाचा गाडा तर सुरु राहिला पाहिजे म्हणून आधी मंत्रालयात उपस्थिती पंचवीस टक्के, मग दहा टक्के, त्यानंतर पाच टक्के अशी कर्मचारी अधिकारी यांची उपस्थिती ठरवून देण्यात आली. हे सगळं ठीक आहे. पण जेवढे अधिकारी कर्मचारी येतात त्यांच्या उदरभरण/पोटपूजा याचे काय ? हा सर्वात गहन प्रश्न. परंतु हा ही प्रश्न पाच जणांनी कर्तव्य भावनेने चुटकीसरशी सोडविला. आजमितीला मंत्रालयात केवळ एकच उपहारगृह सुरु आहे आणि त्यात फक्त पाचच व्यक्ती अन्नपूर्णेचे वारसदार या नात्याने कार्यरत आहेत. सुरेंद्र लोकप्पा अंबिलेपुरे हे महाव्यवस्थापक, श्रीधर यरगट्टीकर हे उपमहाव्यवस्थापक, संदीप चिकणे आचारी, भरत वाजे, परशुराम सितप हे सेवक असे पाच जण २३ मार्च २०२० पासून संपूर्ण मंत्रालयात येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या क्षुधाशांती/उदरभरण/पोटपूजा यांची अव्याहतपणे व्यवस्था पहात आहेत. केवळ मंत्रालय नव्हे तर विधान भवनातील वीस मजल्यांचा, तेथे असणाऱ्या सभापती रामराजे नाईक निंबाळकर, अध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यालयांपासून सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पोटपूजेची व्यवस्था विनातक्रार करीत आहेत. Mantralay 5 peसुरुवातीला हे पाचही जण मंत्रालयात मुक्काम करीत असत. आताशा घरी जाण्याची मोकळीक मिळते, पण लगेचच ते कर्तव्यावर हजर  राहतात. आळीपाळीने एकमेकांना घरी जाऊ देण्यात येते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई,  आरोग्य मंत्री राजेश टोपे, परिवहन मंत्री अनिल परब, गृहमंत्री अनिल देशमुख, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सह विविध मंत्री, मुख्य सचिव अजॉय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या सह विविध सचिव, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे विविध अधिकारी-कर्मचारी, छायाचित्रकार, द्रुकश्राव्य विभाग  अशा सर्वच कार्यालयात असलेल्या बैठका, समिती कक्षातील बैठका, उपहारगृहामध्ये सकाळी ९ वाजता चहा/कॉफी/ नाश्ता, दुपारी बारा नंतर भोजन, दुपारी तीन नंतर चहा/कॉफी/नाश्ता या सर्वच बाबतीत महाव्यवस्थापक सुरेंद्र अंबिलेपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीधर यरगट्टीकर, परशुराम सितप, भरत वाजे, संदीप चिकणे ही मंडळी चोख व्यवस्था ठेवीत आहेत. पद्माकर परवडी, यशवंत घोसाळकर हेही मदतीला धावून येतात.  ब्रुहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख आणि सरचिटणीस अविनाश धोंड यांनी या समाजातील तळागाळात कार्यरत असणाऱ्या महत्वपूर्ण घटकांचे विशेष आभार व्यक्त करुन ऋण मान्य केले आहे.  “सितप, चिकणे, वाजे, जरा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात जाऊन या, मुख्य सचिव कार्यालयात काय आहे, बैठक आहे, जरा तिथे काय काय हवंय ते घेऊन जा,  उपमुख्यमंत्री कार्यालयात चक्कर मारा, विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठका आहेत. तिथे चहा, नाश्ता बरोबर गेलाय की नाही हे पहा”, असे संवाद आवर्जून ऐकायला मिळतात. कोरोना च्या या वातावरणात सामाजिक, शारीरिक अंतर ठेवणे, सँनिटायझर, मास्क चा उपयोग या ठिकाणी चोखपणे करण्यात येत आहे. एवढेच नाही तर उपहारगृह मध्ये भोजन नाश्त्यासाठी ची जी टेबले लावली आहेत, तिथेही ‘सोशल डिस्टन्सिंग’ चे भान ठेवून एका टेबलावर समोरासमोर दोनच व्यक्ती बसू शकतील आणि उपहारगृहात प्रवेश करण्यापूर्वी सँनिटायझर चे, तसेच तापमापक यंत्र सुद्धा बसविण्यात आले आहे. सर्वार्थाने या अन्नपूर्णेच्या वारसदारांनी कोरोनायोद्ध्यांच्या तारणहाराची भूमिका बजावली आहे आणि बजावत आहेत. सुरेंद्र अंबिलेपुरे, मिलिंद सरदेशमुख, छायाचित्रकार सतीश कुलकर्णी आणि सूर्यकांत कासार, प्रवीण वाडे यांच्या अनमोल सहकार्यामुळे उपहारगृहाच्या सेवकांची छायाचित्रे उपलब्ध होऊ शकली. अन्नपूर्णा ही देवी आपण मानतो, या अन्नपूर्णेचे वारसदार सुरेंद्र अबिलेपुरे, श्रीधर यरगट्टीकर, परशुराम सितप, भरत वाजे, संदीप चिकणे, पद्माकर परवडी, यशवंत घोसाळकर आदी सहकऱ्यांना मानाचा मुजरा. या बांधवांच्या सेवेला कोटी कोटी प्रणाम ! अशीच अविरत सेवा यांच्या हातून घडण्यासाठी या सर्वांना उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो, या मनःपूर्वक शुभेच्छा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!