कोळीवाड्यातील ख्रिस्ती मच्छिमारांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न

वसई (वार्ताहर) : नियोजित वधुवरांची रक्ततपासणी, विवाहपूर्व मार्गदर्शन शिबीर, विवाहपूर्व नोंदणीवेळचे समुपदेशन आदी सोपस्कार पार पाडत रविवारी वसईतील ख्रिस्ती मच्छिमार तरुण-तरुणींचा सामूहिक विवाह सोहळा कोळीवाड्यातील संत पीटर चर्चमध्ये हजारोंच्या उपस्थितीत पार पडला. विवाहविधीवेळी पवित्र वेदीवर आरोग्यात, आजारात, संकटांत एकमेकांशी एकनिष्ठ राहण्याची वचने दिल्यानंतर चर्चमधून बाहेर पडलेले वधुवर आणि वर्‍हाडी मंडळींना पाहण्यासाठी चर्चपासून पाचूबंदरच्या वेशीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी गर्दी केली होती.
कोळीवाडा म्हणजे समुद्राच्या फेसाळत्या लाटांसारखा ओसंडून वाहणारा उत्साह. कोळीवाड्यातील सोहळा म्हटले की, सगळा कोळीवाडाच रंगबेरंगी पोशाखात, ढोल ताशाच्या तालावर नाचला नाही तर आश्‍चर्यच! कोळीवाड्यातील मच्छिमार वर्षभर ढोरमेहनत करतात. त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा जमिनीऐवजी समुद्रात जातो. अशा स्थितीत दीर्घ सुट्टीचा काळ असतो तो सामुदायिक विवाहसोहळ्याचा.  एरवी केवळ काम नि फक्त काम यामध्ये गुरफटलेला मच्छिमार सामुदायिक लग्नसोहळ्यावेळी सारं काही विसरून बेभान होऊन हर्षोल्हासाने नाचू लागतो, आनंद व्यक्त करतो. बहुतेक कोळीवाड्यांत सामुदायिक लग्नसोहळे साजरे केले जातात. उत्तन, उत्तनपाली, चौक, वसई, अर्नाळा आणि मनोरी या ठिकाणी दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात तेथील चर्चमध्ये ख्रिश्‍चन कोळ्यांचे सामुदायिक विवाहसोहळे पार पडतात. त्यातील एक कोळीवाडा म्हणजे वसई कोळीवाडा! या ठिकाणचा सामूहिक लग्नसोहळा २ फेब्रुवारीस पार पडला.
वसई स्टेशनपासून पश्‍चिमेला आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या पाचूबंदर, लांगेबंदर, वायाबंदर आणि किल्लाबंदर या परिसरात जवळपास १५ हजार मच्छिमारांची वस्ती आहे. त्यांचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे मासेमारी. ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंतच्या काळात मासेमारी केल्यानंतर डिसेंबर-जानेवारी महिन्यात सर्व बोटींचे आर्थिक हिशेब होतात आणि मच्छिमारांच्या खिशात दोन पैसे खुळखुळू लागतात. अशा वेळी त्याला वेध लागतात ते फेब्रुवारी महिन्यातील सामुदायिक लग्नसोहळ्याचे. या महिन्यात भांगाच्या रविवारचा दिवस ठरवला जातो. भांग म्हणजे समुद्रात मासे न मिळण्याचा कालखंड. या काळात समुद्राच्या पाण्याला प्रवाह नसतो. त्यामुळे कोणी मासेमारीला जात नाही. त्यामुळे कुणाला आपला व्यवसाय बंद ठेवून लग्नासाठी ’रजा’ घ्यावी लागत नाही. यावर्षी २ फेब्रुवारीच्या रविवारी वसई कोळीवाड्यातील ख्रिस्ती मच्छिमारांचा सामूहिक विवाहसोहळा पार पडला. यावेळी ४० तरुणतरुणी विवाहबद्ध झाले. या विवाहसोहळ्यासाठी संत पीटर चर्चचे धर्मगुरू फादर थॉमस लोपीस, फादर टोनी कोरिया, फादर निलेश तुस्कानो, फादर जोएल कोरिया यांनी वधुवरांच्या आध्यात्मिक तथा मानसिक तयारीसाठी विशेष मेहनत घेतली.
रविवारी पहाटे ४.०० वाजल्यापासूनच पाचूबंदर-किल्लाबंदर परिसरात बॅण्डच्या सुरावटी कानावर पडत होत्या. मच्छिमारांमधील पारंपरिक प्रथेनुसार बॅण्ड सोबत घेऊन साग्रसंगीत वधुवरांच्या मामाकडील मंडळींना पहाटेच विवाहास येण्याची विशेष निमंत्रणे देण्यात आली. सकाळी ८.३० वाजता वधू-वर सजून तयार झाले. वरमंडळींनी काळ्या रंगाची पॅण्ट आणि सूट तर वधू पांढरा शुभ्र रंगाचा पायघोळ गाऊन परिधान करून चर्चमध्ये सकाळी ९.००च्या मुहूर्तावरील प्रार्थनेसाठी बॅण्डबाजासह निघाल्या. त्यांच्यासोबत रंगीबेरंगी पोषाखात सजलेली वर्‍हाडी मंडळीही दिसत होती. दोन तासांच्या विवाहविधीनंतर वधुवरांनी एकमेकांना आरोग्यात, आजारात, सुखदुखात, संकटात परस्परांशी एकनिष्ठ राहण्याची वचने दिली आणि सहजीवनासाठी परमेश्‍वराचा आशीर्वाद घेतल्यानंतर पुन्हा चर्चमधून घरचा प्रवास सुरू झाला. यावेळी चर्च ते पाचूबंदर या एक किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा वधुवरांना पाहण्यासाठी लहानथोरांची गर्दी उसळली होती. पहाटे चार वाजल्यापासून सुरू झालेली वाजंत्री आणि डिझेचा दणदणाट रात्री दहा वाजता शांत झाला.

मच्छिमार समाजातील सामूहिक विवाहाचे वैशिष्ट्य

मच्छिमार समाजात ख्रिस्ती विवाहेच्छुक तरुण-तरुणींची जूनअखेरपर्यंत चर्चमध्ये नोंदणी केली जाते. त्यानंतर प्रबोधनास सुरुवात होते. वधूवरांच्या सभा घेतल्या जातात. त्यांच्या पालकांच्याही सभा घेतल्या जातात. वैवाहिक जीवन म्हणजे काय? वैवाहिक जीवनाच्या जबाबदार्‍या, जबाबदार पालकत्व, मुलांची जडणघडण, कौटुंबिक समस्या, लैंगिक जीवन, विवाहसंस्थेचे पावित्र्य, प्रेम आणि विवाह अशा विविध विषयांवर त्यांचे प्रबोधन केले जाते. पालकांना त्यांच्याशी संबंधित विषयांवर वधुवरांचे प्रबोधन केले जाते. तर मुलांचे सौख्य आणि पालकांची जबाबदारी, मुलांच्या नवजीवनातील पालकांचा सहभाग, लग्न व कर्जबाजारीपणा, लग्न व हुंडापद्धती वगैरे विषयांवर पालकांना मार्गदर्शन केले जाते.  वसईच्या मच्छिमार समाजातील लग्नाचे आणखी एक खास वैशिष्ट्य असे की, येथे एचआयव्ही चाचणी सक्तीची असते. एड्‌सविषयी संशय असलेल्या तरुण-तरुणींचा विवाह टाळला जातो. त्यासाठी त्यांना ’कृपा फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेतील मानसोपचार तज्ज्ञ समुपदेशन करतात. एड्‌सची चाचणी पूर्ण झाल्यावर तरुण-तरुणींसाठी जीवन दर्शन केंद्र, गिरीज येथे दोन पूर्ण दिवसांचे विवाहपूर्व मार्गदर्शन शिबीर आयोजित केले जाते. त्यानंतर चर्चमध्ये नियोजित वधुवरांचे लग्नाचे अर्ज भरून घेतले जातात. अर्ज भरण्यापूर्वी लग्नासाठी काही जबरदस्ती करण्यात आली आहे का? इच्छेविरोधात लग्न करण्यासाठी भाग पाडले जात आहे का? याचीही चाचपणी समुपदेशनाच्या माध्यमातून केली जाते. चर्चमध्ये लग्नाचे अर्ज भरून घेतल्यानंतर विवाहाच्या एक महिना अगोदर लग्नाची घोषणा केली जाते. या लग्नास कोणाचा काही आक्षेप असल्यास चर्चमध्ये कळविण्याचे आवाहन केले जाते. कोणाची हरकत असल्यास धर्मगुरू वधुवरांच्या पालकांशी चर्च करून वरिष्ठ धर्माधिकार्‍यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील निर्णय घेतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!