खानिवडयाच्या प्रतिबंधित क्षेत्रात नवनीत कंपनी राजरोस सुरु !

वसई (वार्ताहर) : खानिवडे ग्रामपंचायत क्षेत्रात व  नवनीत कंपनीत कोरोना बाधित रुग्ण सापडू लागल्याने ग्रामपंचायती मार्फत ग्रामपंचायत हद्ध प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहे. मात्र या काळात नवनीत कंपनी सुरूच असल्याने येथील रहिवाश्यांसह ग्रामस्थ महिलांनी प्रतिबंध पुकारण्यात आलेल्या वेळेत कंपनी बंद ठेवण्याची मागणी करत कंपनीच्या गेटवर ठिय्या मांडला. यामुळे ग्रामस्थ आणि कंपनी यांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. याबाबत पोलिस ग्रामस्थांना कायदा हातात न घेता विधायक पद्धतीने आपले म्हणणे शासकीय स्तरावर पोहचवण्यासाठी समजावत होते.   
कोरोना या जागतिक महामारीचा विळखा हा वसईतील ग्रामीण भागालाही मोठ्या प्रमाणात बसत  असून खानिवडे सारख्या गावात  सुद्धा कोरोना बाधित रुग्ण सापडू लागले आहेत. यामुळे स्थानिक ग्राम पंचायत  प्रशाननाने  खानिवडे परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला असून १४ ते २० जुलै या दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळून बाहेरील व्यक्तींना, फेरीवाल्यांना प्रवेश बंद केला असून  ग्रामस्थांना  सुद्धा विनाकारण बाहेर पडण्यास मज्जाव केला आहे. मात्र तरीही नवनीत कंपनीत वसई, नालासोपारा, विरार, ठाणे, मुंबई या भागातून कामगारांच्या बसेस येत जात आहेत. तर अनेक बाहेरील कामगार आपल्या मोटार बाईकने गावातूनच ये जा करत आहेत. तसेच  गावाला  लागूनच असलेल्या नवनीत कंपनीत आतापर्यंत चार बाधित रुग्ण सापडले असून कंपनीच्या आवारात जाणारा रस्ता हा गावाच्या भर वस्तीतून जातो. यामुळे गावाला एक न्याय व कंपनीला दुसरा न्याय मिळत असल्याचा आरोप करत कंपनी विरोधात गावकऱ्यांत रोष निर्माण झाला असून गावातील महिला यासाठी पुढे सरसावल्या आहेत, व त्यांनी शनिवारी दुपारी कंपनीच्या गेटवर निदर्शन केल्यानंतर गावाच्या वेशीवर असलेल्या मुख्य रस्त्यावर जमून प्रतिबंध असेपर्यंत कंपनी बंद करण्याची मागणी केली आहे.
एक कोरोनाग्रस्त हा गावात असलेल्या नवनीत कंपनी मध्ये कामाला होता. नवनीत कंपनी मध्ये ह्या आधीही कोरोनाग्रस्त सापडले आहेत. कंपनीमधील बरेच कर्मचारी हे गावाबाहेरील (वसई, विरार, ठाणे) येथील आहेत. कोरोना प्रादुर्भाव रोखन्यासाठी कंपनी काही दिवस बंद ठेवावी, अशी ग्रामस्थांची विनंती आहे. त्या करिता आज गावातील महिला, ग्रामपंचायत कार्यालय व नवनीत कंपनी बाहेर गेले होते. गाव हे निषिद्ध परिसर असून बाहेरील व्यक्ति व वाहने गावात येतात. त्यामुळे गावकर्यांना भीती वाटत आहे. – ऍड.भक्ती चव्हाण-तरे  (ग्रामस्थ, खनिवडे) 
ग्रामस्थांचे म्हणणे व त्यांच्या विनंती अर्जानुसार त्यांच्या  असलेल्या  मागणीसाठी ग्राम पंचायतींमार्फत जिल्हाधिकारी,प्रांत, पोलीस ठाणे व तहसीलदार यांच्यासह कंपनी व्यवस्थापनेला विनंती अर्ज करण्यात आले आहेत. – निलेश देवरे (ग्रामविकास अधिकारी, खनिवडे) 
आम्ही शासनाच्या सर्व नियमांचे व अध्यादेशाचे पालन करून कामकाज सुरु केले आहे. कामगारांची गेटवरच स्क्रीनिंग टेम्प्रेचर, ऑक्सिजन लेव्हल व स्थिती तपासली गेल्यानंतर आत सोडले जाते. सामाजिक अंतर व मास्क कंपलसरी करण्यात आला आहे. – महेश गुजर (व्यवस्थापक, नवनीत कंपनी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!