गडकिल्यांवर वाढत्या प्रश्नांवर महाराष्ट्रातील दुर्गमित्रांचे एल्गार आंदोलन 

महाराष्ट्रातील गौरवशाली गड किल्ले व त्यांची विविध प्रकारची दुरवस्था, त्यावरील गैरप्रकार यांत गेल्या काही वर्षांत कमालीची वाढ झालेली दिसून येते. विविध दुर्गसंवर्धक संस्था, दुर्गमित्र, अभ्यासक, संशोधक, इतिहास संकलक विविध माध्यमातून गडसंवर्धनासाठी सातत्याने श्रमदान मोहिमा राबवत झटत आहेत. सद्या गडकिल्यांवर कायमस्वरूपी दारूबंदी, अश्लील प्रि वेडिंग, अश्लील छायाचित्रे, कायमस्वरूपी दारूबंदी, प्रेमी युगलांचे बेताल चाळे, किल्ल्याच्या प्रवेशद्वारात तपासणी केंद्रांचा अभाव, रात्री अपरात्री किल्ल्यात होणारे गैरप्रकार इत्यादी प्रश्नांवर पुरातत्व विभाग निव्वळ मौन पाळून गप्प आहे. दुर्गमित्रांनी महाराष्ट्रातील गडकोटांवरील विभागवार दिलेली निवेदने व विनंतीपत्रे यावर केंद्रीय पुरातत्व विभागाने कोणतीही कारवाई केलेली दिसून येत नाही. महाराष्ट्रातील गडकोटांवर सुरू असलेले गैरप्रकार व दुर्दैवी परिस्थिती यावर ठोस उपाययोजना करावी या एकमेव मागणीने समस्त दुर्गमित्र महाराष्ट्र एकत्रितपणे येऊन जंजिरे वसई किल्ला जिल्हा पालघर येथे दिनांक १५ व १६ डिसेंबर २०१८ शनिवार रविवार रोजी एल्गार आंदोलन करणार आहेत. दोन्ही दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत समस्त दुर्गमित्र, अभ्यासक केंद्रीय पुरातत्व विभागाच्या वसई किल्ल्यातील कार्यालयासमोर बसून आपल्या मागण्या, निवेदने, प्रतिक्रिया, विनंती पत्रके इत्यादी बाबी मांडणार आहेत. नाशिक, मुंबई, भाईदर, शिरगाव, माहीम, पुणे येथून सदर आंदोलनासाठी समस्त दुर्गप्रेमी संघटनांचे प्रतिनिधी सहभाग नोंदवून आपले जाहीर म्हणणे मांडणार आहेत. महाराष्ट्रातील गडकोटांवर वाढती अश्लीलता, विनापरवाना छायाचित्रणे, प्रेमीयुगलांचे थैमान, पुरातत्व विभागाची अनास्था, कार्यपद्धती इत्यादी बाबत ठोस उपाययोजना करण्यासाठी समस्त दुर्गमित्र दोन दिवस जंजिरे वसई किल्ल्यात ठाण मांडून बसणार आहेत. सद्या विविध किल्ल्यातील अनेक कर्मचारी वर्ग प्रेमीयुगलांकडून, छायाचित्रकारांकडून अनधिकृत आर्थिक स्वार्थ साधत असल्याचे सातत्याने समोर येत आहेत. गडकिल्यांवर वाढत्या समस्या व प्रश्नांवर दुर्गमित्रांनी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी उचलेले हे आंदोलन स्वरूपी पाऊल अत्यंत महत्वाचे ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!