गावं वगळण्याच्या बाबत युतीकडून पुन्हा दिशाभूल !

ख्रिस्ती वस्तीत अपप्रचार, निवडणूक अधिकारी लक्ष देतील ?

वसई (वार्ताहर) : महापालिका क्षेत्रातून २९ गावं वगळून तिथे पुन्हा ग्रामपंचायती अस्तित्वात आणणे या मागणीसाठी चाललेला न्यायालयीन लढा अंतिम टप्प्यात आहे. उच्च न्यायालयाने या मंगळवारी कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही. आणि ३० एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

मात्र जणू काही ‘गावं वगळण्याचा निर्णय झाला’ अशा आविर्भावात युतीचे नेते व माजी आमदार विवेक पंडीत वसई च्या पश्चिम भागात निर्मळ परिसरात अपप्रचार करीत आहेत.

निर्मळ येथील उष:काल या हॉटेलमध्ये त्यांनी परवा एक मिटिंग अटेंड केली. या मिटिंगमध्ये त्यांनी २९ गावं वगळली, आपला ऐतिहासिक विजय झाला आहे, उत्सव साजरा करा, शासनाचे आभार माना ‘ असे गैरसमज पसरवणारे विधान केले. एवढेच काय येथील महापालिका सत्ताधीश ख्रिस्ती समाजाला फसविण्याचे काम करीत आहेत असेही दिशाभूल करणारे विचार पंडितांनी येथे मांडले आहेत.

निर्मळ येथील या मिटिंगसाठी निवडणूक निर्णय अधिकारी वा पोलीस खात्याची परवानगी घेण्यात आली नव्हती. वास्तविक त्या २९ गावांचा अंतिम निर्णय मा.उच्च न्यायालयात व्हायचा बाकी आहे. तो लगेच ३० एप्रिल रोजी होईलच असे आजही ठामपणे सांगू शकत नाही. शिवाय गावं वगळून पुढे करायचे काय ? या बाबतीत शासनाकडे अन्य कोणत्याही प्रकारचा पर्याय तयार नाही. अशा परिस्थितीत केवळ या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात युतीला पूरक मुद्दा होईल आणि पश्चिम भागात विशेषत: ख्रिस्ती वस्तीतून समर्थन मिळेल या हेतूने नेते विवेक पंडीत प्रयत्न करीत आहेत.

१३३ वसई विधानसभा क्षेत्रात हा प्रकार सुरू झाला आहे. या विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी या गैरप्रकाराची नोंद घेतील, चौकशी करतील आणि योग्य ती कारवाई करतील अशी अपेक्षा व मागणी निर्मळ परिसरातील नागरिकांनी केली आहे. सध्या जमाव बंदीची व निवडणूक आचारसंहिता बंधनांची परिस्थिती असताना सुध्दा पंडित यांच्या या मिटिंगमध्ये सत्तरच्या वर नागरिक, कार्यकर्ते एकत्र येतातच कसे ? आणि आत्ता तालुक्यातील वातावरण इलेक्शन फिवर चे असूनही शांतता व सलोख्याचे आहे ते या पंडितांना बघवत नाही काय ? अशी चिंताही काही ज्येष्ठ निर्मळ वासियांनी व्यक्त केली आहे. आता या बाबत वसई विभागाचे संबंधित अधिकारी काय भूमिका घेत आहेत हे पाहणे औत्सुक्याचे टरले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!