गास-भुईगांवात भाजीपाला मार्केट होणार !

वसई (वार्ताहर) :  वसई  तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गास-भुईगांवातील शासकिय जागेवर स्थानिक शेतकऱ्यांसाठी भाजीपाला मार्केट उभारण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.तशी मागणी शिवसेनेचे विधानसभा समन्वयक हरिश्चंद्र पाटील यांनी केली होती.

वसई-अर्नाळा या ब्रिटीशकालीन रस्त्यालगत असलेल्या निर्मळ-कळंब मुख्य रस्त्यावर निर्मळचा दैनंदिन बाजार भरतो.पहाटे पाच वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत आणि सायंकाळी पाचपासून रात्री नऊ वाजेपर्यंत हा बाजार असतो.त्यात कळंब, वाघोली, नवाळे, गास, भुईगांव, गिरीज, रानगांव, होळी, निर्मळ येथील शेतकरी भाज्या आणि मच्छिमार मासे विक्रीसाठी येत असतात.तर त्या खरेदी करण्यासाठी ग्रामस्थ व दलालांची गर्दी होत असते.मुख्य रस्त्यावर असलेल्या बाजारात येणाऱ्यांच्या गाडया कडेला पार्क केल्या जात असल्यामुळे अर्धाअधिक रस्ता व्यापला जातो.त्यामुळे वाहतुकीची मोठया प्रमाणात कोंडी होवून दररोज हाणामाऱ्या होत असतात.

या बाजाराची जागा फक्त तीन हजार स्क्वे.फुट असल्यामुळे पहाटे चार वाजल्यापासून बसण्याच्या जागेवरून शेतकऱ्यांमध्ये बाचबाची होत असते.त्यातच परप्रांतीयांच्या हातगाडया बाजाराच्या तोंडावर लागत असल्यामुळे आतल्या बाजुला बसणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत ग्रामस्थ पोहचत नाहीत. परिणामी त्यांना त्यांच्या भाज्या कमी दराने विकाव्या लागतात.महापालिकेचा बाजार कर भरणाऱ्या तसेच पहाटे चार वाजल्यापासून 8-9 तास भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या बाजारात शौचालय आणि पाणपोईची कोणतीही सुविधा नसल्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेवून कळंबचा बाजार गास-भुईगांव रस्त्यावर हलवावा अशी मागणी हरिश्चंद्र पाटील यांनी महापौरांकडे केली होती.

गास-भूईगांव या जोड रस्त्यावर सद्या दहा-बारा भाजीपाला आणि फळे विक्रेते बसलेले असतात, त्यांच्याकडील माल खरेदी करण्यासाठी झुंबड उडालेली असते.भुईगांव सर्वे नं.204 अ,1 आणि गास सर्वे क्र.472 ही सलग 140 गुंठे शासकिय जागा  तालुक्याच्या मध्यावर आहे.त्यावर पालिकेने भाजीपाला मार्केट उभारून शेतकऱ्यांना स्टॉल उपलब्ध करून द्यावेत.त्यामुळे त्यांच्या मालाला योग्य दर मिळेल,शौचालय,विज या सुविधा मिळतील, ग्रामस्थांच्या गाडयांना पार्कींगची जागा मिळेले आणि महापालिकेलाही स्टॉलचे भाडे,बाजार कराचे मोठे उत्पन्न मिळेल.आणि निर्मळ-कळंब रस्त्यावरची वाहतुक कोंडीही कायमची सुटेल.असे पाटील यांनी पटवून दिले होते.त्यावर महापौर रुपेश जाधव यांनी लागलीच कार्यवाही सुरु केली असून,या जागेचा सर्वेही करण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे मार्केट उपलब्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!