गुजरातमध्ये मराठी साहित्य अकादमी स्थापन करण्यात यावी !

मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याकडे हेमराज शाह यांची आग्रही मागणी

मुंबई  (विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्रामध्ये आम्ही अत्यंत नेटाने प्रयत्न करुन महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीची स्थापना करवून घेतली आहे. अशाच पध्दतीने गुजरात मध्ये गुजरात राज्य मराठी साहित्य अकादमी स्थापन करण्यात यावी, अशी जोरदार मागणी बृहन्मुंबई गुजराती समाज चे अध्यक्ष हेमराजभाई शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याकडे केली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी मुंबईत आलेल्या गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून थेट अंधेरीतील ‘गुजरात भवन’ येथे येऊन मुंबई मधील प्रतिष्ठित गुजराती बांधवांची भेट घेतली. बृहन्मुंबई गुजराती समाज चे अध्यक्ष हेमराज शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा शाल, पुष्पगुच्छ, पुस्तके, सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान केला. आपल्या प्रास्ताविक भाषणात सर्व राज्यांत गुजरात भवने आहेत परंतु मुंबई मध्ये गुजराती भवन नव्हते. गेल्या पस्तीस वर्षांपासून बृहन्मुंबई गुजराती समाज या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गुजराती बांधवांसाठी विविध प्रकारचे विधायक कार्य करण्यात येत आहे. गुजराती बांधवांमधील ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. महाराष्ट्रात गुजराती साहित्य अकादमी स्थापन करवून घेतली अशाच रीतीने गुजरात मध्ये मराठी साहित्य अकादमी स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी पावले उचलावीत. गुजरातमध्ये मराठी बांधव मोठया प्रमाणावर आहेत आणि महाराष्ट्र गुजरात हे दोघे भाऊ भाऊ आहेत, गुजराती साहित्य मराठीत अनुवादित करुन दोन्ही भाषांची सेवा करता येईल, असेही हेमराजभाई शाह यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी महाराष्ट्राच्या उद्योजक आणि व्यापाऱ्यांना गुजरात मध्ये व्यवसाय करण्यासाठी आमंत्रण देतांनाच आपण आधी उद्योग सुरु करा, तीन वर्षांत सर्व प्रकारच्या परवानग्या देऊ, असे सांगून दिलासा दिला. गुजरात चे माजी गृहमंत्री गोवर्धन झडपिया तसेच अनेक मान्यवर यावेळी आवर्जून उपस्थित होते. राजेश दोशी यांनी स्नेहमेळाव्याचे सूत्रसंचालन केले तर महासचिव महेंद्र एन. शाह यांनी आभारप्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!