घोडबंदर किल्ल्याची १८ व्या शतकातील अमूल्य आठवण – डॉ.श्रीदत्त राऊत

प्राचीन कालखंडातील साष्टी ठाणे प्रांताचा मागोवा घेताना कल्याण, वसई, शुपार्र्क, डहाणू बंदरांच्या रक्षणासाठी सागरी व्यापारी मार्गावर उभारण्यात आलेले लहान मोठे जंजिरे, कोट, एकाकी बुरुज लक्ष वेधतात. या प्रांतातील इतिहास प्रसिध्द जंजिरे वसई, जंजिरे धारावी, नागलाकोट, गायमुख कोट, ठाणे, जंजिरा, नागलाकोट, हिराकोट, नागलाकोट माडी, दुर्गाडी इत्यादी किल्ले आजही सविस्तर लिखाण वा इतिहास संकलनापासून वंचित आहेत. १६ वे शतक ते १८ वे शतकातील पोर्तुगीजांच्या आरमारी हालचाली व मराठयांच्या वसई मोहिमेच्या घटनांचा अबोल साक्षीदार असणारा घोडबंदर किल्ला ब्रिटिशांच्या लिखाणातून मोजकाच असला, तरी १८ व्या शतकातील ब्रिटिश अंमलात सदर किल्ल्याचे काढण्यात आलेले छायाचित्र जिज्ञासा वाढवते. सध्या इंटरनेट माध्यमातून ब्रिटिशांच्या १८ व्या शतकातील संकलित छायाचित्रांत काही भाग पाहण्यास मिळतो. यातच घोडबंदर किल्ल्याचे एक चित्र उपलब्ध झाले.

गेली १६ वर्षे किल्ले वसई मोहीम परिवार अंतर्गत घोडबंदर किल्ला अभ्यास सफर, पहिला राष्ट्रध्वज मानवंदना मोहीम, श्रमदान संवर्धन मोहीम, दारूबंदी मोहीम, घोडबंदर किल्ल्याचा नकाशा रेखाटने व आराखडा, मशाल व दिपपूजन मानवंदना, तर कधी वैयक्तिक अभ्यास संशोधन इत्यादी उपक्रमांत घोडबंदर कोटास पाहत आलोय. सद्या किल्ला बेवसाऊ व अत्यंत शेवटच्या घटका मोजत असल्याने त्याचे पुरातत्वीय दृष्टीने संवर्धन होणार का हा विशेष प्रश्नच आहे. १८ व्या शतकातील घोडबंदर किल्ल्याचे उपलब्ध असणारे छायाचित्र घोडबंदर किल्ल्यातील उपलब्ध वास्तूंचा मागोवा घेण्यास मदत करते. विशेषत: आज या छायाचित्राचा उपयोग किमान पुरातत्वीय दृष्टीने किल्ला संवर्धनासाठी करता येईल.

या चित्राचा एक संक्षिप्त मागोवा : सदर छायाचित्रावर कोणतीही तारीख नमूद नसून त्याचा इंटरनेट माध्यमातून १८ व्या शतकातील संग्रह यादीत समावेश व उल्लेख करण्यात आलेला आहे. या छायाचित्राच्या खाली इंग्रजी वळणदार लिखाणात view near collectors lodge, gorabunder, near bassein असा मजकूर लिहिलेला आहे. सदर चित्राकडे चिकित्सक पध्दतीने पाहताना हे छायाचित्र सध्याच्या प्रवेश मार्गाच्या दिशेनेच घेण्यात आलेले आहे. यात झाडीत बंदीस्त झालेला १० ते १५ पायऱ्यांचा कठडायुक्त प्रवेशमार्ग पाहता येतो. यातून पुढे जाताच लगेचच समोर जुन्या कमानीची दालने आडव्या ओळीने उभारण्यात आलेली दिसतात. अगदी कार्यालय पध्दतीने मांडणी.

सध्या सन २०२० मध्ये यातील बरीच दालने कमानी दुरावस्था प्राप्त असून संवर्धनाची पुरातत्व नजर न मिळाल्याने मूळ स्वरूप पूर्णपणे हरवून बसलेले आहे. चित्रात मुख्य प्रवेशद्वारातील कमानी युक्त दालनाच्या पायाकडील भागात उंचवटा युक्त चिरेबंदी बांधकाम पाहता येते. पुढे जाताच मुख्य बालेकिल्याची टेकडी व त्यावर चिरेबंदी दगडांनी बंदिस्त असणारा बालेकिल्ला (एकटा स्वतंत्र बुरुज) पाहता येतो. मुख्य बालेकिल्याच्या खालील अंगास असणारा संरक्षक तट आज पाहण्यास उपलब्ध नसला तरी या चित्रात पाहता येतो. बालेकिल्याच्या उजव्या अंगास झाडीत बंदिस्त झालेला संरक्षक तट खालील टेकडी उतारावर उतरत गेल्याचे दिसते. याचप्रमाणे मुख्य टेकडीवर बालेकिल्याच्या मागील अंगास तटबंदी व बांधकामाचे दर्शन घेते. बालेकिल्याच्या पायाजवळील मुख्य खडकही यात दिसतो. या खडकाच्याच खाली संरक्षक तट (सध्या उपलब्ध नसलेला) दिसतो. यावर मार्गक्रमण करता येत असावे. याच संरक्षक तटाच्या खालील अंगास गोलाकार तटबंदी व बुरूजाचे अवशेष पाहण्यास मिळतात. बालेकिल्ल्याच्या खालील अंगास असणारा संरक्षक तट बऱ्याच प्रमाणात बालेकिल्ल्याच्या भोवती विस्तारित गेल्याचे दिसते. आज मात्र चित्र बरेच विस्कळीत झालेले आहे. या संरक्षक तटास असणारे तिरपे आधारस्तंभ (supporters) पोर्तुगीज बांधणीची आठवण करून देतात. मुख्य प्रवेशद्वाराच्या पायरी मार्गाच्या पुढील पटांगणात खाजरीची झाडे व काटेरी झुडुपे पाहण्यास मिळतात. यात विशेष म्हणजे चित्रात डाव्या अंगास असणारा भक्कम तट निदर्शनास येतो. या तटबंदीचा काही भाग आज किल्ल्यास लागून बांधण्यात आलेल्या घरांत समावेश झालेला आहे. चित्रातील बालेकिल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर वसईच्या दिशेने मोकळी असणारी खार जमिनीचा भाग व खाडीचा प्रदेश दिसतो. चित्रातील बऱ्याच भागात गच्च झाडी व झुडुपे दिसत असली तरी पुरातत्वीय दृष्टीने सदर छायाचित्र महत्वाचेच ठरते. या चित्राच्या माध्यमातून गडावर हरवलेले अवशेष व सध्या किल्ल्याचे अस्तित्व नामशेष करणारे नवे अतिक्रमण यातील विषमता लक्षात येते. अर्थातच १८ व्या शतकात ब्रिटिशांनी सदर किल्ल्याची केलेली वाताहत व दुर्लक्षही स्पष्ट होते. सदर लेखाच्या पुढील भागात रेखाटने व अवशेष संपदा यावर विेषण करतो.

इति संक्षिप्त मागोवा : डॉ श्रीदत्त राऊत, किल्ले वसई मोहीम परिवार ९७६४३१६६७८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!